वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥38॥
म्हणोनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें । पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥178॥ एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे । जैसें चैतन्य कां नोहे । दुसरे गा ॥179॥ या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥180॥ ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे । तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा ॥181॥ म्हणूनी बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढती निर्धारितां । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥182॥ जैसी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे । तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥183॥ आतां यावरी जे बोलणें । तें वायांचि वेळु फेडणें । तंव सांचचि जी हें पार्थु म्हणे । जें बोलत असां ॥184॥ परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥185॥ मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥186॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें परमात्मसुखनिधान, साधावया योगीजन…
अर्थ
ज्ञानासारखी पवित्र (करणारी) वस्तू या जगामध्ये कोणतीही नाही. योगाचरणाने स्वत: योग्यता प्राप्त झालेल्या (मुमुक्षूला) हे आत्मविषयक ज्ञान यथाकाळी प्राप्त होते. ॥38॥
असो, म्हणून असे घडणे अशक्य आहे. यावर विचार केला तरी हे अशक्य आहे, असे दिसते. एकंदरीत पहाता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. ॥178॥ इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे (ज्ञानाइतके उत्तम) दुसरे कोठे आहे? ॥179॥ या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल ॥180॥ अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल तरच अर्जुना, या ज्ञानाला उपमा सापडेल. ॥181॥ म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता आणि पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की, ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. ॥182॥ अमृताची चव कशासारखी आहे, हे निवडू जाता, ती अमृतासारखीच आहे, असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. ॥183॥ आता (यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी) जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे. ॥184॥ पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे? असे अर्जुन विचारणार तोच, ते त्याचे मनोगत देवाने जाणले. ॥185॥ मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. ॥186॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें विश्वभ्रमाऐसा, जो अमूर्ताचा कवडसा…
क्रमश:


