वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥12॥
मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥71॥ तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥72॥ वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥73॥ जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥74॥ नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥75॥ तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥76॥
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्यम् ॥13॥
आतां याचिपरी जाण । चार्ही आहेती हे वर्ण । सृजिले म्यां गुण – । कर्मभागें ॥77॥ जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ॥78॥ एथ एकचि हे धनुष्यपाणी । परीं जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ॥79॥ म्हणोनि आईकें पार्था । वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥81॥
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥14॥
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसें जेणे जाणितलें । तो सुटला गा ॥81॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तैं पापाचा अचळु फिटे, पुण्याची पहाट फुटे…
अर्थ
कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात. कारण, या मनुष्यलोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. ॥12॥
मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. ॥71॥ मग जे जे (त्यांच्या) मनात असते, ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे, हे तू निश्चयाने समज. ॥72॥ (कर्मा-) वाचून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही, या मनुष्यलोकामध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. ॥73॥ ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्यावाचून (तेथे) दुसरे उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच त्यात दिसते ॥74॥ किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, ॥75॥ त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. ॥76॥
गुणकर्मानुसार मी चार वर्णांचे लोक निर्माण केले आहेत. या कर्माचा जरी मी कर्ता आहे, तरी (परमार्थतः) मी अकर्ता आणि अव्यय आहे, असे जाण. ॥13॥
आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की, ब्राह्मणादी जे चार वर्ण आहेत, ते मी गुण आणि कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत. ॥77॥ कारण की, निरनिराळे स्वधर्म आणि गुण यांच्या धोरणाने (त्या चारी वर्णांच्या) कर्मांची मी योजना केली आहे. ॥78॥ अर्जुना, हे सर्व लोक वस्तुत: एकच खरे, परंतु चार वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावत: गुणकर्मांमुळे केलेली आहे. ॥79॥ म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा कर्ता मी मुळीच नाही ॥80॥
कर्मे मला बंधन करीत नाहीत. कर्मफलाविषयी माझी आसक्ती नाही. मला अशाप्रकारे (म्हणजे मी अकर्ता आत्मरूप आहे असा) जो जाणतो, तो कर्मापासून बंधन पावत नाही. ॥14॥
ही व्यवस्था माझ्यामुळॆच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वत: ओळखले तो (कर्मबंधनापासून) मुक्त झाला. ॥81॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : माझे अजत्वें जन्मणें, अक्रियताचि कर्म करणें…


