वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी । सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥213॥ तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥214॥ जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ती तेणें पाडें । अनुभवावी ॥215॥ ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥216॥ हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥217॥ जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥218॥ आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥219॥ सहजें मलयानिलु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥220॥ तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥221॥ तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । मग संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥222॥ जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें । रोग जाये दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥223॥ तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥224॥ म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु ॥225॥
॥ चौथा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जया प्राणियाचां ठायीं, इया ज्ञानाची आवडी नाहीं…
अर्थ
ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावे, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीस्थान आहे. ॥213॥ तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रकटेल, जे अर्थपूर्ण आणि समुद्रापेक्षा गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका. ॥214॥ सूर्यबिंब जरी बचकीएवढे दिसते, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते, त्याचप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे. असे अनुभवास येईल. ॥215॥ अथवा इच्छा करणार्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळ देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावे. ॥216॥ पण हे राहू द्या. जास्त काय सांगावे? जे सर्वज्ञ आहेत, त्यांना आपोआपच समजतेच आहे. तरी नीट लक्ष द्यावे, हीच माझी विनंती आहे. ॥217॥ ज्याप्रमाणे (एखादी स्त्री) रूप, गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रताही असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांतरसाला अलंकारांची जोड दिलेली दिसेल. ॥218॥ आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे? ॥219॥ मलय पर्वतावरील वारा स्वभावत:च मंद आणि सुगंधी असतो, त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल; ॥220॥ तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचवील, त्याप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवील. ॥221॥ तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे, अनायासे संसारदु:खाचे समूळ उच्चाटन होईल. ॥222॥ जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार करता येईल तर, कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावी? जर दुधाने आणि साखरेनेच रोग नाहीसा होईल तर, कडुलिंबाचा रस पिण्याचे काय कारण ? ॥223॥ त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दु:ख न देता, येथे (नुसत्या) ऐकण्यानेच घरबसल्या मोक्ष मिळणारा आहे. ॥224॥ म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥225॥
॥ चौथा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणऊनि संशयाहूनि थोर, आणिक नाहीं पाप घोर…


