वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जें योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥ जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥155॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥32॥
ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥ परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥157॥
श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञाज् ज्ञानयज्ञः परंतप । सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥33॥
अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जयां नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥158॥ ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥159॥ देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥160॥ जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥161॥ जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रिये विसरलीं । विषयसंगु ॥162॥ मनाचे मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें । जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ॥163॥ जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥164॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एक द्रव्ययज्ञु म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती…
अर्थ
जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही आणि योग तसेच यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ॥154॥ ज्यांचे ऐहिक नीट नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू? ॥155॥
याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदांतून विस्तार झाला आहे. हे सर्व यज्ञ कर्मापासून होणारे आहेत, असे जाण. असे जाणल्याने तू (संसारबंधनातून) मुक्त होशील. ॥32॥
असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. ॥156॥ परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे? (तात्पर्य) असे समज की, (मागे सांगितलेले यज्ञादिक) सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की, आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही. ॥157॥
हे शत्रूतापना, द्रव्यसाधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचे पर्यावसान ज्ञानामध्ये होते. ॥33॥
अर्जुना, वेद ज्यांचे मूळ आहे, ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे आणि ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते ॥158॥ ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण तार्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. ॥159॥ पाहा, परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत ॥160॥ जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे. (आत्मसुखार्थ) जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे, ॥161॥ ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो ॥162॥ मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय (जाणावयाची वस्तू-ब्रह्म) प्रत्यक्ष सापडते ॥163॥ ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता (आपोआपच) आत्मस्वरूप दिसते; ॥164॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : विचार जेथ न रिगे, हेतु जेथ न निगे…


