वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
श्री भगवानुवाच : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥5॥
तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥ तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥42॥ मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । ते समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥43॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामीश्वरोऽपि सन् । प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥6॥
म्हणोनि आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥44॥ माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥45॥ माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्हवीं नाहीं ॥46॥ कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एर्हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥47॥ तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणे नटें नटीं । कार्यालागीं ॥48॥
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥7॥
जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ॥49॥ म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं । जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥50॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥8॥
ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥51॥ अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥52॥ दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं । धर्मासीं नीतीशीं । शेंज भरीं ॥53॥ मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥54॥ स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे । भक्तां निघती दोंदें । सात्विकाचीं ॥55॥ तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥56॥ ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥57॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मग आणिकही या योगातें, राजर्षि जाहले जाणते…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, त्या सर्वांना मी जाणतो. हे शत्रूतापना, तू मात्र ते जाणत नाहीस. ॥5॥
त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो, अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे ॥41॥ तरी अरे, तुला हे माहीत नाही की, आतापर्यंत तुमचे आणि आमचे (आजपर्यंत) कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत. पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. ॥42॥ ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते ते सगळे अर्जुना मला आठवते. ॥43॥
मी जन्मरहित असून, अव्ययस्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो. ॥6॥
म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. ॥44॥ माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही; पण अवतार घेणे आणि संपविणे ही जी एक क्रिया (माझ्या संबंधाने) दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. ॥45॥ माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे, असे जे दिसते, ते भ्रांत (अज्ञान) बुद्धी असली तरच दिसते, एरवी नाही. ॥46॥ किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी (त्या मूळ) वस्तूचा विचार केला तर, तिला दुसरे रूप आहे काय? ॥47॥ तसा अर्जुना, मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेषाने नटतो. ॥48॥
हे भरतकुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, आणि अधर्म बळावू लागतो (वाढतो) तेव्हा मी स्वतःला जन्मास घालतो. (मी अवतार घेतो) ॥7॥
कारण की, जेवढे धर्म म्हणून आहेत, तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा क्रम स्वभावत: अगदी मुळापासून चालत आलेला आहे. ॥49॥ म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो, त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो आणि आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. ॥50॥
सज्जनांच्या संरक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता आणि धर्माची संस्थापना करण्याकरिता मी युगायुगांच्या ठिकाणी अवतार घेतो. ॥8 ॥
त्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. ॥51॥ अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या (उत्कर्षासंबंधी) लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. ॥52॥ दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा (गेलेला) मान (पुन्हा) प्रस्थापित करतो आणि धर्म तसेच नीती यांची सांगड घालतो. ॥53॥ मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर (अस्त नाही अशा) दिवाळीचा दिवस उगवतो. ॥54॥ तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते, फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ॥55॥ ज्यावेळेला अर्जुना, माझी मूर्ती प्रकट होते, त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रात:काळ होतो. ॥56॥ अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच (तत्व) जो ओळखतो, तो या जगात खरा विवेकी होय. ॥57॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पुसेन जें मी कांहीं, तेथ निकें चित्त देईं…


