वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥9॥
माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥ तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥ 59॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥10॥
एर्हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळीं न वचती । क्रोधाचिया ॥60॥ जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कां आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥61॥ जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥62॥ ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥63॥ सांगे पितळेची गंधिकाळिक । जे फिटली होय निःशेख । तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे ॥64॥ तैसे यमनियमीं कडसले । ते तपोज्ञानीं चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥65॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तस्थैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥11॥
एर्हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठाईं । भजती तया मीही । तैसाचि भजें ॥66॥ देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझां ठायीं ॥67॥ परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥68॥ म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ॥ देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥69॥ जें सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥70॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पुसेन जें मी कांहीं, तेथ निकें चित्त देईं…
अर्थ
हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म आणि कर्म जो यथार्थ जाणतो, तो (आपला) देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजप्रत येतो. ॥9॥
मी (माझे) अजत्व कायम ठेऊन जन्मतो, अक्रिय असूनही कर्मे करतो, हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तोच श्रेष्ठप्रतीचा मुक्त होय. ॥58॥ तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने (अहंकार वृत्तीने) वागत नाही, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. ॥59॥
प्रीती, भय आणि क्रोध हे ज्याच्यापासून निघून गेले आहेत, ते मत्परायण झाले आहेत, जे माझा आश्रय करून राहिले आहेत. असे तप आणि ज्ञान यांनी शुद्ध झालेले अनेक लोक मत्स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. ॥10॥
एरवी आपल्या किंवा दुसर्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत ॥60॥ माझ्या भावनेने जे नेहेमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरिता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात आणि ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते ॥61॥ जे तपाच्या तेजाचे पुंज असतात, किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात ॥62॥ ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात आणि माझ्यात मग पडदाच उरत नाही. ॥63॥ सांग बरे, गंज आणि काळीमा हे पितळेचे दोन दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर, मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरुर आहे? ॥64॥ त्याप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने आणि ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मद्रूप झाले यात संशय कसला? ॥65॥
जे जसे मला भजतात, त्यांना तसाच मीही भजतो (तसेच फल देतो). हे पार्था, मनुष्यमात्र सर्व प्रकारांनी (स्वभावत:) माझ्या मार्गाचेच अनुकरण करतात. ॥11॥
दुसरे असे पाहा की, जे जशी माझी भक्ती करतात, त्यांच्यावर मी तसेच उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो. ॥66॥ हे पाहा, जेवढे म्हणून मनुष्यप्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो! ॥67॥ पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की, त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. ॥68॥ म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे, तेथे ते भेद पाहातात. जो नामरहित आहे, त्याला ते नावे देतात. (वास्तविक) जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, त्याला देव किंवा देवी म्हणतात. ॥69॥ भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी (आणि) नेहेमी (वास्तविक) सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते ‘चांगला, वाईट’ असे भेद करतात. ॥70॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पुसेन जें मी कांहीं, तेथ निकें चित्त देईं…


