वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥34॥
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥165॥ जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥166॥ तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥167॥ मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥168॥
यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव । येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥35॥
जयाचेनि वाक्यउजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥169॥ ते वेळीं आपणपेया सहितें । इयें अशेषेंही भूतें । माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥170॥ ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥171॥
अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥36॥
जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥172॥ तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानी इये ॥173॥ देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥174॥ तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ । नाहीं येणें पाडें हे ढिसाळ । दुजें जगीं ॥175॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥37॥
सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उघवली । तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ॥176॥ कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे । तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काइ ॥177॥
हेही वाचा – Dnyaneshwari : विचार जेथ न रिगे, हेतु जेथ न निगे…
अर्थ
(आचार्यांकडे जाऊन त्यांना) प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे अशा रीतीने ते ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानसंपन्न आणि अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. ॥34॥
अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर, या संतास सर्वस्वेकरून त्वा भजावेस. ॥165॥ कारण ते ज्ञानाचे घर आहेत, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. ॥166॥ एवढ्याकरिता शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी. ॥167॥ मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंत:करण ज्ञानसंपन्न होऊन पुन: संकल्पाकडे वळणार नाही. ॥168॥
हे पांडवा, हे ज्ञान झाल्यावर तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. आत्मस्वरूप जो मी, त्या माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत, असे या ज्ञानाच्या योगाने तू पाहशील. ॥35॥
त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. ॥169॥ त्यावेळी आपल्यासहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहाशील. ॥170 ॥ अरे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल, त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्या त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. ॥171॥
सर्व पापी माणसांमध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास, तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातके तरून जाशील. ॥36॥
तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा (मनाच्या घोटाळ्याचा) डोंगर जरी असलास ॥172॥ तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा, हे सगळे किरकोळ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. ॥173॥ पाहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही, (विश्वाचा निरास करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही) ॥174॥ त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत? पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. (वास्तविक पाहाता) याच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही. ॥175॥
हे अर्जुना, प्रज्वलित केलेला अग्नी जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्मांना भस्म करून टाकतो. ॥37॥
तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलयकाळची वावटळ, तिच्यापुढे ढग काय टिकणार आहेत? सांग बरे. ॥176॥ अथवा वार्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केव्ळ पाण्यानेच पेटतो, तो गवत आणि काष्ठे यांनी दबेल काय? ॥177॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें परमात्मसुखनिधान, साधावया योगीजन…


