वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
एर्हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥18॥
जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥ परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥95॥ जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥96॥ अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥97॥ तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥98॥ आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥99॥ तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥100॥ तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥101॥ एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥102॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं…
अर्थ
एरवी हे सर्व जग कर्माच्या आधीन आहे, असा याचा (या कर्माचा) विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते राहू दे, आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. ॥92॥
कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान योगी आणि सर्व कर्मे कर्ता (जाणावा). ॥18॥
सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण (खरोखर) कर्म करीत नाही, हे जो जाणतो आणि कर्मांबरोबर (कर्म करीत असता) त्यांच्या फलाची आशा जो धरत नाही ॥93॥ आणि कर्तव्य करण्याला जगात (आपल्याखेरीज) दुसरेपणाने काहीच नाही, अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो ॥94॥ तरी जो कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे, असे जाणावे. ॥95॥ ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, जरी आपण तो पाण्यात आहे, असे पाहात असतो तरी, त्याला नि:संशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो (पाण्यात नाही). ॥96॥ अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनार्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा, ती झाडे स्थिर आहेत, असे तो म्हणतो. ॥97॥ त्याप्रमाणे, तो सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, असे मानून मग आपण कर्मरहित आहो, हे तो जाणतो. ॥98॥ आणि सूर्य उदय तसेच अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥99॥ ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व (मनुष्याचे सामान्य गुण) नसते. ॥100॥ त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. ॥101॥ एकाच ठिकाणी तो बसून असला तरी, तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला ? तो स्वत: विश्वरूपच झालेला असतो. ॥102॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तरी कर्म म्हणिजे स्वभावें, जेणें विश्वाकारु संभवे…


