वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
श्रीभगवानुवाच : संन्यास: कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥2॥
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोग विचारितां । मोक्षकर तत्त्वता । दोनीहि होती ॥15॥ तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥16॥ तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥17॥ आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं ॥18॥
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति । निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥3॥
तरी गेलियाचि से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥19॥ आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥20॥ जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥21॥ आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि ॥22॥ देखें अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥23॥ तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिचे बुद्धी । संकल्पु नाहीं ॥24॥ म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥25॥
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥4॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें बिंब तरी बचकें एवढें, परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें…
अर्थ
श्रीकृष्ण म्हणाले – ‘कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला (म्हणजे मोक्षाला) कारणीभूत आहेत. या दोहोंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच (तो जाणत्या-नेणत्यांना सर्वांना सुलभ असल्याने) विशेष श्रेयस्कर आहे.’ ॥2॥
श्रीकृष्ण म्हणाले – अर्जुना हे संन्यास आणि कर्मयोग, विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ॥15॥ तरी पण जाणते आणि नेणते, या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला, स्त्रियांना आणि बालकांना नाव (हे सुलभ साधन आहे), त्याप्रमाणे (भवसागरातून तरून जाण्याला) हा कर्मयोग साधन आहे. ॥16॥ त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर, हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणार्या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. ॥17॥ आता एवढ्याकरिता मी तुला कर्मसंन्यास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एकच आहेत, असे तू सहजच जाणशील. ॥18॥
हे महाबाहो अर्जुना, जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची इच्छा करीत नाही, असा (कर्मयोगी) नित्य संन्यासीच जाणावा. (राग-द्वेषादी) द्वंद्वरहित असलेला तो बंधापासून अनायासाने मुक्त होतो. ॥3॥
तरी गत गोष्टींची जो आठवण करीत नाही, काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी अचल असतो ॥19॥ आणि ज्याच्या अंत:करणामध्ये ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे स्मरणच राहिले नाही अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे, असे तू जाण. ॥20॥ ज्याच्या मनाची अशी तयारी झाली, त्याला संगच सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. ॥21॥ अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही. कारण त्यांची आसक्ती घेणारे जे मन, तेच स्वभावत: नि:संग झाले आहे. ॥22॥ पाहा अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो, तेव्हा त्याला कापसामधे देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते. ॥23॥ त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही, तो उपाधीत असून सुद्धा कर्मबंधात सापडत नाही. ॥24॥ म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते, त्याच वेळेला संन्यास घडतो. म्हणून कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. ॥25॥
सांख्य आणि कर्मयोग भिन्न (फल देणारे) आहेत, असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. (सांख्य आणि कर्मयोग यापैकी) एकाचे जरी योग्य अनुष्ठन केले तरी, करणाराला दोहोंचेही फल (मोक्ष) प्राप्त होते. ॥4॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें द्वयर्थ हें बोलतां, आम्हां नेणतयांचिया चित्ता…
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


