अध्याय आठवा
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चन । तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥27॥
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पावे । देह जाऊनि वस्तु होआवे । मार्गेचि कीं ॥247॥ तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥248॥ मज तरंगपण असे का नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥249॥ तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥250॥ आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं । तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥251॥ मग मार्ग तैं कासया शोधावे । कोणें कोठूनि कें जावें । जरी देशकालादि आघवें । आपणचि असिजे ॥252॥ आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचें आकाश लागे नीटे वाटे । वाटा लागे तरि गगना भेटे । एऱ्हवीं चुके ॥253॥ पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि म्हणों जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥254॥ ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें । तयां सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥255॥ याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ॥256॥ मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥257॥ तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे । माजि स्वर्गसंसारांचेनि लाघवें । झकवेना ॥258॥ येणें बोधें जो योगी होये । तयासी या बोधाचेंचि नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पाहे । निजरूपा ये ॥259॥ पैं गा इंद्रादिका देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥260॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ…
अर्थ
हे पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना तू सर्व काळी योगयुक्त हो. ॥27॥
(मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो की, धूम्रमार्ग वाट्याला येतो, हे अनिश्चित आहे, असे पाहून अर्जुन खिन्न झाला.) त्य़ावेळी (भगवंत) म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल, हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धवशात् अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक? (ते कळत नाही). म्हणून हे नको. ॥247॥ तर, आता देह असो अथवा जावो, आम्ही तर केवळ (ब्रह्मच) आहोत. कारण की, जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे. ॥248॥ मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसेच पाणीच असते. ॥249॥ लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी, ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान् असताना देहानेच ब्रह्म झाले. ॥250॥ आता त्या तत्त्ववेत्याच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही. तर बाबा अर्जुना, असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे? ॥251॥ जर सर्व देश आणि काल आपणच आहोत, तर मग अर्चिरादी अथवा धूम्रमार्ग हे कशाला शोधावे? आणि कोणी कोठून कोठे जावयाचे? ॥252॥ आणि अरे अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो, त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते आणि नीट वाटेला लागले तर, महाकाशाला ते नेमके मिळते, नाही तर (एरवी) ते महाकाशाला मिळावयाचे चुकेल काय? ॥253॥ आम्ही म्हणतो असे आहे; पाहा की, घटाचा आकारच (फक्त) नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर, घटपणाच्या आधीही (त्यातील) आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. ॥254॥ अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गांचे संकट ‘मी ब्रह्म आहे’ असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही. ॥255॥ अर्जुना, म्हणून तू योगसंपन्न हो. एवढ्याने स्वत:च्या ठिकाणी सर्वकाळ स्वरूपसाम्यता होईल. ॥256॥ मग वाटेल तेथे, वाटेल तेव्हा, देहाचा पाश असो अथवा जावो, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. ॥257॥ तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही आणि मधल्या स्थितीत, म्हणजे स्थितीकाळी स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. ॥258॥ या बोधाने जो योगी होतो, त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण की, तो स्वर्गतील आणि संसारातील भोगांना विचाराने वजन करून पहातो आणि ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. ॥259॥ बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्ये प्रसिद्ध आहेत, ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून ती तो तुच्छ म्हणून टाकून देतो. ॥260॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जो विष अमृत वोळखे, तो अमृत काय सांडू शके…


