अध्याय आठवा
अर्जुन उवाच : किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥1॥
मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिलें । जें म्यां पुसिले । ते निरूपिजो ॥1॥ सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म । अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥2॥ अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे । हें उघड मी परियेसें । तैसें बोला ॥3॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥2॥
देवा आधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं । हें अनुमानासि कांही । दिठी न भरे ॥4॥ आणि नियता अंतःकरणी । तूं जाणिजसी देहप्रयाणी । तें कैसेनि हें शारंगपाणीं । परिसवा मातें ॥5॥ देखा धवळारीं चिंतामणीचां । जरी पहुडला होय दैवाचा । तरी वोसणतांही बोलु तयाचा । परी सोपु न वचे ॥6॥ तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें। परियेसें गा बरवें । जें पुसिलें तुवां ॥7॥ किरीटी कामधेनूचा पाडा । परी कल्पतरूचा आहे मांदोडा । म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥8॥ कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी । मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥9॥ जैं कृष्णाचेया होईजे आपण । कृष्ण होय आपुले अंतःकरण । तैं संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धी ॥10॥ परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम । म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ॥11॥ या कारणें अनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें । होईल जाणूनि आइतें । वोगरूनि ठेविलें ॥12॥ जें अपत्य थानींहूनि निगे । तयाची भूक ते मायेसीच लागे । एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे । मग स्तन्य दे येरी ॥13॥ म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी । हें नवल नोहे कांहीं । परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ॥14॥
हेही वाचा – Dnyaneshwari : सहज कृपामंदानिळें, कृष्णद्रुमाची वचनफळें…
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैव कशाला म्हणतात? ॥1॥
मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का? जे मी विचारले ते सांगावे. ॥1॥ सांगा, ते ब्रह्म कोणते? कर्म कशाचे नाव आहे? आणि अध्यात्म म्हणतात ते काय? ॥ 2॥ अधिभूत म्हणतात ते कसे आहे? यात अधिदैव कोण आहे? हे मला स्पष्ट समजेल असे सांगा. ॥ 3॥
हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोणता आणि कसा? अंत:करण-निग्रह केलेले (योगी) प्रयाणकाळी तुला कसा जाणतात? ॥2॥
देवा, अधियज्ञ तो काय आहे? आणि या देहात तो कोण आहे? हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीस येत नाही. ॥4॥ आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंत:करण स्वाधीन करून घेतले आहे, त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा, हे मला ऐकवा. ॥5॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,) पाहा, एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याचे बरळण्यातील शब्द पण व्यर्थ जाणार नाहीत. ॥6॥ त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले, ‘अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक.’ ॥7॥ अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली (बसला) आहे; म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावेत, अशी इच्छा केली तर, त्यात आश्चर्य नाही. ॥8॥ श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो, त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो; मग ज्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही? ॥9॥ जेव्हा आपण कृष्णाचे (अनन्यभक्त) व्हावे, (तेव्हा) आपले (भक्ताचे) अंत:करण कृष्ण होते आणि मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. ॥10॥ परंतु असे जे प्रेम, ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. ॥11॥ यासाठी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील, अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले. ॥12॥ कारण की, स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते. एरवी ते शब्दाने ‘मला भूक लागली दूध पाज’ असे सांगते काय? आणि मग ती पाजते ॥13॥ म्हणून कृपाळू गुरूच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही, परंतु ते असो. देव जे काही बोलला ते ऐका. ॥14॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसी पुसती पाहें पां जाणिव, भिडेचि तरी लंघों नेदी शिंव…


