अध्याय आठवा
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥11॥
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणियेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥100॥ चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥ तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ॥102॥ म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ।।103॥ आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी ॥104॥ ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥105॥ जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रियें करिती ॥106॥ ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडियेचे वेद । चुबुकळिले ठेले ॥107॥ तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥108॥ तेथें अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां जी ॥109॥ परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥110॥ तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे । हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ॥111॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जें नानागती पावतें, तें चित्त वरील आत्मयातें…
अर्थ
जे अविनाशी आहे असे वेदवेत्ते सांगतात, (संसाराच्या) इच्छेपासून पराड्मुख झालेले विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात आणि जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात, ते (‘ब्रह्म’ नामक) पद मी तुला संक्षेपाने सांगतो. ॥11॥
जे ज्ञान, संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे, त्या ब्रह्मज्ञान्यांच्या बुद्धीने ज्यास (ब्रह्मस्वरूपास) अविनाशी असे म्हणतात ॥८-१००॥ प्रचंड वार्यानेही जे नाहीसे होत नाही, ते खरोखर आकाशच होय, नाहीतर ते ढग असते तर, ते प्रचंड वार्यापुढे कसे टिकते? ॥101॥ त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले (ते क्षर होय). नंतर वृत्तिज्ञानाला जे विषय होत नाही (तर उलट वृत्तिज्ञानच जेथे लय पावते) त्याला सहजच अक्षर असे म्हटले. ॥102॥ म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्मस्वरूप प्रकृतिपलीकडचे आहे, ॥103॥ आणि जे विषयांचा विषवत् त्याग करून आणि सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, ॥104॥ याप्रमाणे विरक्त पुरुष आहेत, ते ज्याची (परब्रह्माची) नेहेमी वाट पाहात असतात आणि जे निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे; ॥105॥ ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, ॥106॥ असे जे ठिकाण, जे मिळावयास कठीण आणि जाणण्यास कठीण आणि ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत (वेदासही जे अगम्य आहे) ॥107॥ ते (परब्रह्म) जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात, ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. ॥108॥ त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. तर महाराज, आता सांगावे. ॥109॥ परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखत नाही काय? तुला थोडक्यात सांगतो, ऐक. ॥110॥ तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे, ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. ॥111॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जें गगनाहून जुनें, जें परमाणुहूनि सानें


