अध्याय आठवा
पहिलें वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥48॥ मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ॥49॥ तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । पूजिती उदंडें । युक्तिघोषें ॥50॥ मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥ ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥52॥ तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलला जंव सर्वज्ञु । तव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥53॥ हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें । या कृष्णाचिया संतोषासवें । येरु सुखाचा जाहला ॥54॥ देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥55॥ म्हणोनि सात्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥56॥ मग पिकलिया सुखाचा परिमळु । कां निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥57॥ म्हणे परिसणेयांचया राया । आइकें बापा धनंजया । ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥58॥
अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥5॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो परमात्माचि परि दुसरा, जो अहंकारनिद्रा निदसुरा…
अर्थ
प्रथम वैराग्यरूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन ॥48॥ नंतर वज्रासन हीच कोणी जमीन, ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधारमुद्रारूपी चांगला ओटा घालतात. ॥49॥ तेथे ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयांच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने यजन करतात. ॥50॥ नंतर मन, प्राण, आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. ॥51॥ अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य, ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो, मागे केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहाते ॥52॥ त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले, त्यावेळी अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. ॥53॥ हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तर्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. ॥54॥ पाहा, लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे, हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. ॥55॥ म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला; परंतु देवांनी आपल्या बुद्धीने तो सावरून, ॥56॥ नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले. ॥57॥ श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठा अर्जुना, ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की, तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. ॥58॥
मरणाच्या वेळी जो केवळ माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही. ॥5॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तेचि अविद्येची जवनिक फिटे, आणि भेदभावाची अवघि तुटे…


