आराधना जोशी
महाराष्ट्रात साधारणपणे जुलैपासून वातावरण भारावलेलं असतं. आताही दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहात असल्याचे पाहायला मिळते. सणावाराचा हा उत्साह तुळशीच्या लग्नापर्यंत राहील. एकदा का तुळशीचं लग्न लागलं की, मग सुरू होईल लग्नसराईची धामधूम! दिवाळसणानिमित्त ग्राहकांनी फुललेली साड्या, रेडिमेड कपड्यांची दुकाने तसेच सराफ पेढ्या तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा फुललेली दिसतील. पण यात वेगळेपण दिसेल ते लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचे! वर, वधू, लग्नाचा बस्ता, मानपान, सजावट, डीजे यांच्याच जोडीनं महत्त्व असतं ते लग्नपत्रिकेला. किंबहुना ती निवडली की, मगच लग्नाचा माहोल तयार व्हायला सुरुवात होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात, हल्ली याची सुरुवात अनेकदा तुळशीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका छापूनही केली जाते.
लग्न आणि लग्नपत्रिका यांचं अतूट नातं आहे. नाकाशिवाय चेहरा, हे जितकं अशक्यप्राय तितकंच लग्नपत्रिकेशिवाय लग्न होणे नाही, इतकं त्याचं महत्त्व आहे. हल्लीच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही लग्नपत्रिका छापणं, ती रीतसर अक्षता घेऊन आधी कुलदेवता आणि घरातल्या देवासमोर ठेवणं आणि मग नातेवाईकांना पाठवणं किंवा त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण करणं, ही पद्धत बदललेली नाही. हल्ली लग्नपत्रिकासुद्धा प्रत्यक्ष लग्नाइतकीच महत्त्वाची आणि तोलामोलाची मानली जाते. आता तर तीन-चार दिवस चालणाऱ्या विवाहसोहळ्याप्रमाणेच लग्नपत्रिकाही उत्सुकतेचा विषय ठरते. (अपवादात्मक स्वरुपात बातम्यांचा विषयही. उदा. अंबानींकडील सोहळा!)
लग्नपत्रिका म्हटलं की, त्याच्या वेगवेगळ्या डिझाइन आल्या. सर्वोत्तम छपाई आली, किमती स्वरूप आलं आणि दर्जाही आला. लग्नपत्रिका कशी आहे, ती किती दर्जेदार आहे, त्यानुसार ते लग्न किती थाटामाटात पार पडणार आहे, याचा अंदाज येतो. वरपक्ष आणि वधूपक्ष यांची श्रीमंती देखील यावरून आजमावली जाते.
काही निमंत्रण पत्रिका वैशिष्ट्यपूर्ण असतात. एक हटके पत्रिका होती अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची. पर्यावरण या थीमवर आधारित त्या पत्रिकेचे आणि डिझाइनचंही प्रचंड कौतुक झालं होतं. मध्यंतरी पैठणी काठाच्या कापडावर पत्रिका छापण्याची फॅशन होती. एका लग्नाची पत्रिका चक्क कापडी फेट्यात छापली होती. तर पर्यावरणाचा विचार करून हल्ली पत्रिकाही ईको-फ्रेंडली केली जाते.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
तसं पाहता लग्नसमारंभ आटोपल्यानंतर या निमंत्रणपत्रिका अनेकदा फाडल्या जातात किंवा कचऱ्यात फेकून दिल्या जातात किंवा अनेक दिवस त्या धूळखात पडून राहतात. हे प्रकार टाळण्यासाठी एक लग्नपत्रिका चक्क सुती हातरुमालावर छापण्यात आली होती. दोन-तीनदा तो रुमाल धुतल्यावर त्यावर प्रिंट केलेला मजकूर निघून गेला की, साधा रुमाल म्हणून तो वापरता येऊ शकतो, ही त्यामागची कल्पना होती. त्यानंतर कापडी पिशवीवर लग्नपत्रिका छापल्याचं वाचनात आलं होतं. तर काही पत्रिकांमध्ये झाडांच्या बिया टाकलेल्या असतात. कार्य पार पडलं की, ती पत्रिका पाण्यात काही तास भिजवून नंतर मातीत त्यातील बिया पेरायच्या. काही दिवसांतच त्यातून छानसं झाड उगवणार, अशी त्यामागची कल्पना. एकूणच, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्यात लग्नपत्रिकांमधील नावीन्य.
“हौसेला मोल नाही’ ही म्हण लग्नपत्रिकांबाबतही लागू होते. लग्नसोहळ्यात या हौसेची सुरवात होते, ती लग्नपत्रिकेपासून. खरंतर, वधू-वरांची नावं, लग्नाची वेळ, दिनांक, स्थळ, नातेवाईकांची नावं आणि आग्रहानं दिलेलं निमंत्रण असा काही मोजकाच महत्त्वाचा मजकूर लग्नपत्रिकेत असतो. या गोष्टी लक्षात घेऊनच पूर्वी पत्रिका छापल्या जायच्या. त्यांची मांडणी आणि मजकूरही त्याच ठोकळेबाज पद्धतीनं असायचा. आताच्या तुलनेत त्या पत्रिका खूपच साध्या होत्या. थोड्याशा कडक कागदावर एकरंगी प्रिंटिंग, असं त्याचं स्वरूप होतं. आता मात्र पत्रिकांचा ट्रेंड खूपच बदलला आहे. पत्रिकांमधील मजकुराचा आशय तोच आहे; मात्र तो प्रेझेंट करण्याची पद्धत कमालीची बदलली आहे. पत्रिकांमध्ये नातेवाईंकांची भरमसाट नावं, ही प्रथा तर केव्हाच मागे पडली आहे. लग्नाची एकच पत्रिका हा ट्रेंडही मागे पडला आहे. म्हणजे, ऑफिसमधील सहकाऱ्यांना देण्यासाठी वेगळी पत्रिका, नातेवाईकांसाठी वेगळी, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ‘मास’साठी वेगवेगळ्या पत्रिका बनविल्या जातात.
या वेगळ्या पत्रिकांचा मजकूरही वेगळा असतो. म्हणजे नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम, मेंदी, संगीत, मुख्य लग्नाचा कार्यक्रम आणि रिसेप्शन असा सर्व मजकूर देण्यात येतो; मात्र ऑफिसमधील सहकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत फक्त लग्नसोहळा किंवा रिसेप्शन याचाच समावेश असतो. तसंच अनेकदा ही पत्रिका इंग्रजी भाषेत केलेली असते.
हेही वाचा – कॉमनसेन्स इज मोस्ट अनकॉमन – इति कन्यका उवाच
शिवकालीन पत्रांप्रमाणे म्हणजे लखोटा स्वरुपात लग्नपत्रिका बनविण्याचा ट्रेंड मध्यंतरी लोकप्रिय होता. शिवाय, कुंदनचं सुंदर नक्षीकाम करूनही काही पत्रिका बनविल्या जातात. पत्रिका जेव्हा एखाद्याच्या हातात पडते, तेव्हा त्यातून मंद असा सुगंध यावा, अशी काहींची अपेक्षा असते, त्यामुळे पत्रिकांवर अत्तराचा शिडकावा करून सुगंधी पत्रिकाही बनविल्या जातात. साधा सुटसुटीत मजकूर आणि लक्ष वेधून घेणारं आकर्षक डिझाईन ही नव्या पद्धतीच्या पत्रिकांची वैशिष्ट्यं सांगता येतील.
आपली लग्नपत्रिका ही ‘स्टेटस सिम्बॉल’ कशी ठरेल, हेही आजकाल पाहिलं जातं. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, आपली जी मुख्य ओळख आहे, ती ओळख पत्रिकेतूनही ठळकपणे दिसावी, या दृष्टीनं या पत्रिकांची डिझाइन्स केली जातात. तुम्ही तुमच्या पत्रिकेबाबतच्या अपेक्षा सांगायच्या आणि आर्टिस्टनं त्याप्रमाणे पत्रिका बनवून द्यायची, हे असं काहीसं प्रोफेशनॅलिझम असल्यामुळे “स्काय इज द लिमिट’ असं म्हणता येईल, इतकी उपलब्धता इथं असते.
बाजारात रेडिमेड पत्रिकांची असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत. युनिक पत्रिका बनवून घ्यायची असेल, तर मात्र किमतीत तडजोड करता येत नाही आणि बरेच ग्राहक ती करतही नाहीत. त्यांचं म्हणणं ‘मनासारखी पत्रिका झाली पाहिजे’ इतकंच असतं. या पत्रिकांमध्ये लाल, हिरवा, केशरी, पिवळा अशा शुभ-शकुनाच्या रंगांचा वापर केला जातो. या रंगांवर चंदेरी किंवा सोनेरी अक्षरांचं ‘लेटरिंग’ही आपण करू शकतो. त्यामुळे लग्नपत्रिकेला रॉयल लूक येतो. ‘लेटरिंग’ त्याच त्याच नेहमीच्या ‘फॉन्ट’मध्ये करण्याऐवजी स्पेशल पत्रिकांसाठी ‘कॅलिग्राफी’ करून घेण्याकडेही कल असतो. टेक्श्चर पेपर, ट्रान्स्फरंट पेपर, वेल्व्हेट पेपर, इंडियन आर्ट पेपर, हॅंडमेड पेपर अशा वेगवेगळ्या कागदांमध्ये पत्रिका बनविली जाते. लग्नपत्रिकांवरील लेटरिंग, त्यात मसुदा किती आहे ते, कागदाचा प्रकार-आकार, पत्रिकेची संख्या आणि किती रंगांमध्ये छापणार आहोत, त्यावरून पत्रिकेची एकत्रित किंमत ठरते. तसंच पत्रिकेचं डिझाइन आणि आकार यानुसारही किंमत कमी-जास्त होऊ शकते.
ई-निमंत्रणाचा जमाना
कागदाची लग्नपत्रिका केली आणि ती छापून घेतली की, ही पत्रिका पोहोचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिक’वर पाठविण्यात येणाऱ्या पत्रिकाही स्वतंत्रपणे डिझाइन करून घेतल्या जातात. ‘ ई-निमंत्रण’ लाइव्ह वाटावं यासाठी काही सेकंदांचा व्हिडीओही तयार केला जातो. या व्हिडीओची लिंक मेलद्वारा पाठवून लग्नाचं लाइव्ह आमंत्रणही हल्ली दिलं जातं. आता या डिजिटल युगात कल्पनाशक्तीला धुमारे फुटले असून या लग्नपत्रिका अचंबित करतात.
छपाई यंत्राचा शोध लागला आणि लग्नपत्रिका छापण्याची पद्धत सुरू झाली. मात्र त्यावेळी लग्नपत्रिकेमध्ये ‘वंश पुढे चालावा यासाठी विवाह करण्याचे योजिले आहे’ अशा प्रकारचा मजकूर सर्रास दिसून यायचा. मासिक मनोरंजन या मराठी अंकांमध्ये अशा अनेक लग्नांच्या पत्रिका बघायला मिळतात. तिथपासून ते आज ई पत्रिका किंवा यूट्युबवर निमंत्रणाचा व्हिडीओ अपलोड करणं, हा प्रवास घडून आला आहे. पुढच्या काळात या लग्नपत्रिकांचं स्वरूप नेमकं कसं असेल हे बघणं अधिक मनोरंजक ठरणार, हे नक्की.


