दिप्ती चौधरी
डंपर मुळचाच अतिशय सज्जन आणि प्रेमळ. कोणी बाजूला आले तर, आपले खाणेही तो देऊन टाकणार. कधी कोणी आजारी असेल दुखापत झाली असेल तर, जाऊन चाटणार, सहनुभूतीने बघणार. पण जेव्हा डंपरही वयात आला, तेव्हा प्रश्न अधिकच गंभीर झाला. प्राणीराज्याच्या नियमानुसार आतापर्यंत मित्र असणारा डिगर ही डंपरच्या जीवावर उठला! डंपर मुळातच सौम्य स्वभावाचा आणि अतिशय चपळ. त्यामुळे त्याने त्याच्या पुरता प्रश्न सोडवला. त्याने जमिनीवर राहणे सोडून दिले! इमारतीच्या खिडक्यांना लावलेल्या ग्रिल्सवरून तो दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर चढून जायचा. खिडक्यांवरच्या आडव्या छतावर पडून खालचा अंदाज घेत बसायचा. मधेच एका रिकाम्या घराची खिडकी उघडून तिकडे मुक्काम हलवला. रोज सकाळी त्याचा आणि डिंपल आंटीचा कलगीतुरा ऐकू येत असे. ती सकाळी दूध घेऊन आली की, आम्ही सर्व शिस्तीत जमा होऊ; पण डंपर मात्र मी काही खाली येत नाही, तूच वर ये असा आग्रह धरायचा. घाईत असलेली आण्टी खालून दम भरायची “निक्कम्मे नीचे आजा, अभी क्या मैं दूध लेकर उपर आ जाऊ?” तिच्या वरताण आवाज काढून डंपर वाद घालत बसायचा. शेवटी ती परत निघाली की, नाईलाजाने उतरून पटकन खाऊन, परत वरती पोबारा! मधे मधे कधी जमलच तर, डीगर आणि काळा बोका वर जाऊन त्याचा कार्यक्रम करून यायचे.
आता आई आणि दिदी बंगलोरला निघून गेल्या आणि सोसायटीतील तक्रारी जोरदार वाढल्या. कार्यकारिणी सदस्य असल्याने बाबांना अनेकजण खऱ्या-खोट्या तक्रारी सांगू लागले. वार्षिक सभेत पण हा मुद्दा काहीजणांनी मांडला. पण आमचे बाबा हे कोणाही वर अन्याय झाला तर, त्या विरोधात आक्रमक पणे उभे राहणारे आणि मुद्देसूद खंडन करणारे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जास्त काही करता येत नाही, असे दिसताच कार्यकारिणीच्या एका सदस्य महिलेने एक दिवस अजबच गोष्ट केली. बाहेर कुठेतरी कोणाची तरी पडलेली विष्ठा कागदात गुंडाळून बाबा आणि डिंपल आण्टीच्या दरात आणून टाकली! सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे महान कृत्य करतानाचा पुरावा रेकॉर्ड झाला होता, त्यामुळे हे कोणी केलं हे नक्की माहीत झाले.
डिंपल आंटीने हे प्रकरण पोलिसात नेले. पण त्या महिलेच्या बाजूने सर्व कार्यकारिणी सदस्यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि तिथे डिम्पल आंटी एकटी पडली. बाबांना हा प्रकार काही माहीत नव्हता. त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला की, तिथे ही सगळी वादावादी सुरू आहे आणि त्यात त्यांचेही नाव घेतले जात होते. बाबांनी त्यांना शांतपणे सांगितलं, मुक्या जिवांना खायला देणे मी बंद करणार नाही. कुठला कायदा मला हे करण्यापासून थांबवत असेल तर सांगा. पोलीस अधिकारी कोणाशी गाठ आहे, हे बहुदा समजला! त्याने सांगितले, नाही तसं थांबवू शकत नाही, पण जरा सोसायटीच्या आवाराबाहेर खायला द्या. जास्त वाद वाढायला नको म्हणून ‘ठीक’ म्हणून बाबांनी विषय संपवला.
आता या निर्णयाने काय साध्य झाले देव जाणे, कारण खाणारे आम्ही आणि खायला घालणारे यांची एकत्र वरात दिवसातून तीन-चार वेळा घरापासून निघायची, गेटबाहेर जाऊन खायचं आणि परत येऊन मूळ मुक्कामी बसायची!
याच वेळेला आईला प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आवाज संस्थेची आठवण झाली. एका बेवारस भूभूला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी तिने त्यांच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांच्या एका कार्यकर्तीशी ओळख झाली होती. तिने सारे कायदेशीर कलमे पाठवून दिली. वॉर्डच्या प्राणी अधिकाऱ्याचा संपर्क दिला. भारतीय संविधानानुसार बेवारस प्राण्याची काळजी घेणे, हा हक्कच नाही तर, भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आहे! आणि या जबाबदारीत विघ्ने आणणे, हा कायद्याने गुन्हा! पण बहुतेकवेळा प्राणीप्रेमी कायदा माहीत नसल्याने किंवा संख्याबळ कमी पडल्याने नमते घेतात… कितीजणांनी आपली लाडकी लेकरे अशा दबावाला बळी पडून सोडून दिली आहेत! किती वेदनादायी आहे हे…
बाबा आणि डिंपल आंटी खंबीर होते; पण आजी आणि बाबांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप व्हावा, हे आई आणि पप्पाना मंजूर नव्हते आणि इतके दिवस फक्त तीव्र इच्छा असलेली मनोकामना पप्ंपानी निर्णय म्हणून पक्की ठरवली! आम्हाला बंगलोरला आणायचे!
आम्हाला बरोबर घेऊन जायची इच्छा दिदी आणि आईची खूप होती; पण सगळ्यात मोठी अडचण होती की, आयुष्य मोकळ्यावर गेलेले आम्ही पूर्ण indoor cat होऊ शकू का? बंगलोरला घर सोळाव्या मजल्यावर होते, त्यामुळे लिफ्टशिवाय वरखाली करणे अशक्य… त्यातही तिथे कडक नियम की, तुमचे पाळीव प्राणी तुमच्याबरोबरच पट्टा घालून फिरवले पाहिजेत, मोकळे नाही. त्यामुळे ही बंधनं आम्ही स्वीकारू का? माहिती महाजालात थोड्या शोधा-शोधी नंतर अशी अनेक प्रकरणं सापडली! पूर्ण रानटी असलेली मांजरेदेखील थोड्या मेहनतीने आणि युक्तीने घरगुती होऊ शकतात. आम्ही तसे माणसाळलेले होतो, त्यामुळे हे अजूनच सोपे होते!
त्यामुळे निर्णय पक्का झाला; पण आता मोठा प्रश्न होता अणायाचे कसे? प्राण्यांच्या प्रवासासाठी अनेक एजन्सी आहेत, जे घरातून उचलून नवीन ठिकाणी दारात आणून देतात. पण त्यांची एकच अट प्राणी पिंजऱ्यात घालून सुपूर्द करा आणि आमची तिथेच गोची होती! आम्ही आझाद परिंदे! कधी कुठे असू याचा काय भरवसा? कोणाला ठराविक दिवस आणि वेळ दिली तर, त्यावेळी आम्ही तोंड दाखवूच याचा शून्य भरवसा! त्यातून माझ्या तर आठ-दहा दिवसांच्या मोहिमा असत, तेव्हा मी पूर्ण गायब! काळया बोक्याने ठोकले तर, दनू आणि डिगर दिवसांच्या दिवस गुल! बरं, मुंबई ते बंगलोर प्रवास करायचा तर आगाऊ बुकिंग केलेच पाहिजे. पण त्या दिवसाचा भरवसा देणार कोण?
मोठा जटिल प्रश्न होता!
(क्रमश:)
(पिदू या मांजराची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com