पराग गोडबोले
बायको माहेरी गेली की, मी आणि माझी लेक आमचं दोघांचंच राज्य असतं घरात. तिने निगुतीने ठेवलेल्या घराचा पार बट्टयाबोळ करण्यात आणि मग ती आल्यानंतर तिच्या शिव्या खाण्यात आम्ही दोघेही आता निष्णात झालो आहोत… इतस्ततः विखुरलेले कपडे, लॉण्ड्री बॅगेत साचलेले कपड्यांचे बोळे, मोरीत पडलेली करवडलेली भांडी, चहाचा चोथा, ओसंडून वाहत असलेला केराचा डबा, धूळ… हे सगळं तिच्या स्वागताला तयार असतं, अगदी जय्यत!
आमच्या मते आम्ही घर अगदी टापटीप ठेवलेलं असतं, पण तिच्या दृष्टीने मात्र घराची स्थिती म्हणजे गचाळपणाचा उत्तम नमुना असतो. दृष्टिकोनातला फरक, दुसरं काय?
घराची ही स्थिति तर जेवणाची दुसरीच परिस्थिती, अत्यंत आगळी वेगळी.
“डोंबिवलीत खंडीभर पोळी-भाजी केंद्रं आहेत, काही अडणार नाहीये तुमचं माझ्यावाचून,” हे तिचं पालुपद प्रत्येक वेळी असतंच आणि त्यासोबत, पंचक्रोशीतल्या पोळी-भाजी केंद्रांची नावं ती आमच्या तोंडावर फेकते.
“घरी काही करायच्या फंदात पडू नका, नाहीतर माझ्यासाठी दुप्पट काम करून ठेवाल,” ही तंबी असतेच वेळोवेळी दिलेली! पण ती गेली की, लेकीच्या अंगात ‘कमला बाई ओगले’ संचारतात आणि मग ती कधी हे कर, कधी ते कर, असं करून उच्छाद मांडते. अर्थात, रोजच्या पोळीभाजी पेक्षा, तिने केलेले पदार्थ अंमळ जास्तच चविष्ट असतात ही गोष्ट वेगळी, पण तिकडे बायकोच्या पोटात गोळा उठतो, हवालदिल होते ती अगदी!
हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!
मागच्या आठवड्यात असंच झालं. ती गेली होती पुण्याला, दोन दिवसांसाठी आणि आम्ही दोघेच घरात. मी आपला सकाळी उठून ऑफिसला गेलो, न्याहारी, जेवण सगळं ऑफिसच्या खानावळीत. लेकीला घरून काम होतं, सुखाचं… मी निघालो तेव्हा मस्त लोळत पडली होती ती.
सकाळी असंच काहीतरी मागवलं तिने खायला Swiggy वरून आणि मला फोटो पाठवून म्हणाली, “बघा कशी चंगळ आहे माझी, नाहीतर तुम्ही! नुसते पोळी, भाजी, भात, आमटी खात असता सदैव.”
मी मनात म्हंटलं, ‘तुलाच लखलाभ होवो बये, तुझी चंगळ. मला आपलं माझं साधसुधं जेवण बरं!!’
संध्याकाळी मला फोन… “बाबा, रात्रीच्या जेवणाचं काय करायचं? हॉटेलला जाऊया का?”
“काही नाही हॉटेल वगैरे, मला उशीर होणार आहे यायला. पोळीभाजी आण आणि वरणभाताचा कुकर लाव. मी आल्यावर जेवू सोबत,“ म्हणत मी फोन ठेवला.
दुसऱ्या क्षणाला मेसेज, “बाबा, तुम्ही ना बोर आहात,” सोबत वेडावून दाखवणारी emoji.
आता आहे ते आहे… बोराचा अचानक आंबा नाहीतर, चिकू थोडीच होणार, नाही का?
तर, मी आपला आलो दमूनभागून घरी. आल्याआल्याच काहीतरी विचित्र गंध जाणवला घरात… जळका. मी तिला विचारलं, “काही करपलंय का घरात?” स्वयंपाकघरात शिरलो आणि हाय रे दैवा!! काळा ठिक्कर पडलेला कुकर, आतली करपलेली लंगरी, त्यातला करपलेला भात आणि डाळ मला वाकुल्या दाखवत होते, सगळ्याचं मूलद्रव्य हे शेवटी कार्बन असतं हे शाबित करत!
लेकीला म्हटलं, “अगं, हे कळलं तर प्रलय येईल पुण्याला! नवा घेतलाय ना चार महिन्यांपूर्वी, जुना मोडीत काढून? त्याची अशी अवस्था पाहून, आपल्या दोघांना मोडीत काढेल ती.”
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
“बाबा, सांगू नका तिला. वाट लावेल माझी ती. आपण निस्तरू सगळं जमेल तसं… मी पाणी कमी घातलं बहुतेक आणि कुकर लावून काम करत बसले. लक्षच नाही राहिलं आणि जेव्हा कळलं तेव्हा हे असं झालं होतं…” रडवेल्या तोंडानं लेक म्हणाली.
आता पुरावे नष्ट करण्याचं काम अंगावर आलं होतं आणि तरीही, आमचे पुण्याहून येणारे ‘एसीपी प्रद्युम्न’ – “दया कुछ तो गडबड है…” असं हमखास म्हणणार याची खात्रीच होती मला. आधी या सगळ्या प्रकाराचे फोटो टिपून घेतले आणि मग स्वच्छता मोहीम सुरू केली आम्ही. जमेल तसा कुकर घासला, करपलेले पदार्थ काढून फेकून दिले आणि ती भांडी पण घासून टाकली लगोलग. नंतर लक्षात आलं, कुकरचा वॉल्व्ह पण गेला असणार नक्कीच, म्हणून तो तपासला तर, काडी आरपार गेली आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं.
आता आली का पंचाईत, रात्रीत तो वॉल्व्ह कोण बदलून देणार? आमचं सगळं आटपेपर्यंत दुकानं बंद झाली होती. म्हणजे एवढं सगळं केलं, त्यावर पाणी!
लेक म्हणाली, “बाबा आपण झाकण लपवून ठेवू कुकरचं, म्हणजे प्रश्नच मिटला.” हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर, असं काहीतरी होतं. मी तात्काळ तो विचार मोडून काढला आणि तिला म्हणालो, “त्यापेक्षा जे घडलंय, ते सांगून टाकू तिला. एकदा घेऊ वडवानल अंगावर, पण तिला नाही सांगितलं तर आयुष्यभर ऐकावं लागेल आपल्याला… आणि कितीही लपवलं तरी कळणार तर आहेच, मग त्यापेक्षा सांगूनच टाकू.”
हे तर पक्कं झालं, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आणि ‘मी नाही’, ‘मी नाही’ यात अर्धा तास गेला.
तोडगा म्हणून, फोन स्पीकर वर ठेवून दोघे एकदम शिव्या खाऊ, असं ठरलं आणि मग मी फोन लावला. ‘कशी आहेस, उद्या किती वाजता निघणार…,’ अशा साळसूद चौकशा झाल्या आणि लेक म्हणाली, “आई, अगं बाबांनी तुझा कुकर जाळला!” च्यायला, या गुगलीची मी अपेक्षाच नव्हती केली.
गुद्दा वळून लेकीला दाखवला आणि ती हसतच सुटली. मला तोफेच्या तोंडी देऊन स्वतः मात्र नामानिराळी झाली. मी खूप झटकण्याचा प्रयत्न केला, पण तिचा नवऱ्यापेक्षा लेकीवर विश्वास जास्त! ‘हे फक्त मीच करू जाणे,’ हे म्हणे तिला पुरतं ठाऊक होतं.
होता नव्हता तेवढा दारुगोळा माझ्यावर रिता झाला आणि ‘फोटो पाठव, कळू दे तरी तुमचे प्रताप’ या वाक्याने ती समेवर आली. नव्या कुकरला श्रद्धांजली म्हणून फक्त गळा काढायचं बाकी होतं!
फोटो पाठवल्यावर, परत फोन आणि परत जुगलबंदी… “रिंग पण गेली असेल बाराच्या भावात… भाताची लंगरी पण पार जळलीय… उद्या आल्यावर निस्तरते सगळं, दोन दिवस कुठे जायची खोटी, घर डोक्यावर घेतात नुसतं!”
मी आपला चुपचाप ऐकत, लेकीला मनातल्या मनात शिव्या घालत बसलो. काय करणार ना दुसरं तरी?
दुसऱ्या दिवशी बाईसाहेब आल्या घरी दुपारी. आल्या आल्या, आधी कुकर घेऊन दुकानात धावल्या. रिंग, वॉल्व्ह दोन्ही बदलून कुकर घासूनपुसून अगदी चकचकीत केला आणि मगच श्वास घेतला. चकचकीत फोटो मला पाठवून म्हणाली, “बघ निस्तरलंय सगळं. लंगरी पण स्वच्छ केली आहे नीट.”
संध्याकाळी मग त्याच कूकरमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी शिजली. सोबत कढी आणि पोह्याचा पापड खाऊन आम्ही तृप्त झालो.
आवरल्यावर म्हणाली, “संसारातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर जीव असतो रे आमचा, चमचा असो, कुकर असो वा इतर भांडीकुंडी. ती पण अपत्य असतात आमची. यापुढे एवढं लक्षात ठेवा आणि काळजी घ्या, एवढीच अपेक्षा.” तिचा दाटलेला स्वरच सगळं सांगून जात होता. आमचेही डोळे पाणावले आणि ‘यापुढे नक्की काळजी घेऊ,’ या शपथेवर परत एकदा आमचं भांडण मिटलं आणि मग मनसोक्त हसलो आम्ही सगळे.
श्रम परिहार म्हणून लेकीने आइस्क्रीम मागवलं आईच्या आवडीचं आणि ते खाऊन आमचा दिवस संपला, पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.