डॉ. अस्मिता हवालदार
‘बोल माधवी’ हे चंद्रप्रकाश देवल यांच्या ‘बोलो माधवी’ या दीर्घकाव्याचा अनुवाद आहे. काव्याचा अनुवाद करण्याचे कठीण काम आसावरी काकडे यांनी समर्थपणे केले आहे. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा माधवी कोण? मला माहीत नव्हतं. ‘माधवी’ ही ‘गालव आख्याना’ची नायिका आहे. मला पुस्तक वाचावेसे वाटले ते मुखपृष्ठावरील चित्रामुळे! मुखपृष्ठावर ठकीचे चित्र फार बोलके आहे. ठकी म्हणजे पूर्वीची लहान मुलींची लाकडाची बाहुली… या ठकीचा उपयोग अनेक कामांसाठी व्हायचा… अगदी जात्याची खुंटी म्हणून सुद्धा! ठकी असलेल्या माधवीच्या ओठावर पट्टी आहे, हात जोडलेले आहेत, अर्ध्या बाजूवर काळोख आणि अर्धी बाजू उजळलेली, बाजूला तिच्या अस्पष्ट होत जाणाऱ्या प्रतिकृती…
गालव आख्यान महाभारताच्या उद्योगपर्वात आलेले असून दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करण्यासाठी ज्या कथा सांगितल्या त्यापैकी हे एक आहे.
काय आहे हे गालव आख्यान?
माधवी म्हणजे राजा ययातीची पुत्री, यदू आणि पुरूची बहीण. ययाती नहुष राजाचा पाचवा वंशज. ययाती देवयानीची कथा प्रसिद्ध आहेच. गालव हा ऋषी विश्वामित्रांचा शिष्य होता. तो गरीब होता, पण स्वाभिमानी होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने विश्वामित्रांना गुरूदक्षिणेसंबंधी विचारलं. त्यांनी नको म्हटलं तरी, याने पिच्छा पुरवला. पुन्हा पुन्हा विचारल्यामुळे विश्वामित्र चिडले आणि म्हणाले, “अश्वमेध यज्ञासाठी 800 घोडे गुरु दक्षिणा म्हणून दे.” ’वास्तविक असे केवळ 600 घोडेच उपलब्ध आहेत, हे त्यांना माहीत होतं. कान्यकुब्जाचा राजा गाधी याला सत्यवती नावाची पुत्री होती. ऋचिक मुनीने तिला मागणी घातली असता राजाने अश्वमेधाचे एक हजार घोडे मागितले. ऋचिक मुनीने वरूण लोकातून घोडे आणून दिले. त्याने पुंडरीक यज्ञ करून घोडे ब्राह्मणांना दान दिले आणि 200 घोडे विकत घेऊन आपल्याकडे ठेवले. आधीच्या हजारातील चारशे घोडे वितस्ता नदीत वाहून गेले. त्यामुळे सहाशे घोडेच शिल्लक राहिले. गालव आठशे घोडे मिळवू शकणार नाही, याची खात्री होती. तरी, त्यांनी अशी कठीण परीक्षा का घेतली असावी?
अश्वमेध यज्ञासाठी विशिष्ट प्रकारचा घोडा लागतो. पांढरा रंग आणि केवळ एक कान काळा असलेला घोडा अश्वमेधासाठी लागतो. असे 800 घोडे कुठून आणणार? गरीब ब्राह्मणाला कसे परवडणार? गालव चिंतेत पडला. त्याने विष्णूची आराधना केली. विष्णूने गरुडाला त्याच्या मदतीला पाठवले. गरुडाने गालवला सांगितले, “असा एकच राजा आहे, जो याचकाला कधीही विन्मुख पाठवत नाही. तो म्हणजे राजा ययाती! आपण त्याच्याकडे जाऊ या.”
हेही वाचा – युगांत : इरावतीबाईंचा संशोधनात्मक निबंध
गालव गरुडाच्या पाठीवर बसला. गरुड इतक्या वेगाने उडू लागला की, गालव घाबरून म्हणाला, “हे पक्षीराज, वेग कमी करा अन्यथा ब्रह्महत्येचं पातक लागेल.” गरुडाने वेग कमी केला. ते दोघे एका पर्वतावर विश्रांतीसाठी थांबले. तिथे शांडिली नावाची साध्वी तपस्या करत होती. गरुडाच्या मनात आले, ‘या साध्वीला बरोबर घेऊन ब्रह्मा, विष्णू, महेशाला द्यायला हवी. गरुड सकाळी झोपून उठला, तेव्हा त्याचे पंख गळून गेलेले होते. त्याची चूक त्याच्या लक्षात आली. त्याने अभद्र विचार मनात आणल्याबद्दल तिची क्षमा मागितली. तिने गरुडाला पंख परत दिले. दोघे तिथून ययातीकडे गेले.
ययाती-देवयानी कथानकात रंगवलेला ययाती लंपट असला तरी, तो धार्मिक आणि दानशूरही होता. त्याने अनेक यज्ञ केल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती खालावली होती. तो म्हणाला, “अश्वमेधाचे 800 घोडे देण्यास मी असमर्थ आहे.”
गालव खट्टू झाला अन् म्हणाला, “मी चुकीच्या ययातीकडे आलो आहे. मी ज्या ययाती महाराजांची कीर्ती ऐकली होती, ते कुठल्याही याचकाला परत पाठवत नाहीत…” आणि तो गरुडाला म्हणाला, “मी गुरुदक्षिणा देऊ शकलो नाही तर, माझे जीवन निष्फळ आहे. मी आत्महत्या करेन.”
ययाती विचारात पडला. इतक्या वर्षांत कमावलेली प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि ब्रह्मत्येचे पातक अनवधानाने लागले असते. शिवाय, याचकाला विन्मुख पाठवले तर, तो कुलाचा नाश करू शकतो. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढायला हवा होता. त्याला उत्तर सुचलं… म्हणाला, “हे ब्राह्मणा, तू माझी सुस्वरूप कन्या माधवीला घेऊन जा. तिच्या रूपामुळे देव, दानव, यक्ष, किन्नर सगळेच तिची अभिलाषा करतात. कुणाही चक्रवर्ती राजाला तिला दे. तिला चार चक्रवर्ती पुत्र प्राप्त होण्याचा आणि पुनश्च कुमारिका होण्याचा वर मिळाला आहे. चार चक्रवर्ती पुत्रांच्या बदल्यात कोणीही चक्रवर्ती सम्राट तुला आठशे घोडे देईल. नंतर तू तिला मला परत कर. मला उत्तम संतती प्राप्त होण्याचा आशीर्वाद दे.”
माधवीच्या आईने मृत्यूसमयी ययातीकडून वचन घेतले होते की, तो माधवीचे स्वयंवर रचेल. त्यामुळे माधवी परत आल्यावर तिचे स्वयंवर रचण्याचे ठरले. माधवी गालवबरोबर गेली. गरुडाने त्यांना राजा शोधायला मदत केली. प्रथम अयोध्येच्या इक्ष्वाकू वंशाच्या राजा हर्यश्वाकडे गालव गेला. माधवीला पाहून मोहीत झालेला राजा तिला ठेवण्यास तयार झाला; परंतु त्याच्याकडे दोनशेच घोडे होते. त्यामुळे एका पुत्राच्या बदल्यात तो 200 घोडे द्यायला तयार झाला. माधवीने वसुमना नावाच्या पुत्राला जन्म दिला आणि गालवबरोबर पुढच्या प्रवासाला निघाली. पुढचा राजा काशी नरेश दिवोदास! या राजाकडेही दोनशेच अश्वमेधाचे घोडे होते. एक पुत्राच्या, प्रतर्दनाच्या बदल्यात 200 घोडे त्याने दिले आणि माधवी पुढच्या प्रवासाला निघाली. या नंतरच्या उशीनर राजाकडेही दोनशेच घोडे होते. त्याच्याकडून ते घेऊन शिबी नावाचा चक्रवर्ती पुत्र त्याला सोपवून माधवी आणि गालव पुढच्या प्रवासाला निघाले.
आता सहाशे घोडे झाले होते. शेवटच्या दोनशे घोड्यांच्या बदल्यात, जे अस्तित्वातच नव्हते, गालवने गरुडाच्या सल्ल्यावरून माधवी विश्वामित्रांना अर्पण केली. विश्वामित्रांनी तिला पहाताच गालवला म्हटले, “ही कन्या तू आधीच मला दिली असतीस तर मीच चार चक्रवर्ती पुत्रांची प्राप्ती करून घेतली असती.”
विश्वामित्र आणि माधवीला अष्टक नावाचा चक्रवर्ती पुत्र झाला. गालवने गुरुदक्षिणा पूर्ण केली आणि माधवीला पित्याकडे सोपवले. ययातीने तिचे स्वयंवर मांडायचे ठरवले. स्वयंवरात देशोदेशीचे राजे आले. ती हातात पुष्पमाला घेऊन उभी होती. एकेक राजा समोरून पुढे जात होते. शेवटी तिने पित्याला आणि भावांना वंदन करून वनाकडे प्रस्थान केले. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. गालवनेही वानप्रस्थाश्रम स्वीकारला.
…असे हे गालव आख्यान.
काही अभ्यासकांच्या मते मूल महाभारतात हे आख्यान नाही, परंतु महाभारतात वेळोवेळी आख्याने समाविष्ट केली गेली. त्यातले हे एक असावे. तसेच माधवी हा शब्द भूमी किंवा पृथ्वी या अर्थाने वापरला आहे. राजा पृथ्वीपती असतो. त्यामुळे माधवी म्हणजे धरणीला अनेक पती (राजे) आहेत, असा एक अर्थ लावला जातो.
हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!
स्त्री-पुरुषांची असमानता दाखवणारी ही कहाणी आहे. खरे तर दानवीर ययाती, आज्ञाधारक गालव, गुरु विश्वामित्र हे या कथेचे नायक असायला हवे होते; परंतु या कथेचा ‘नायक’ माधवी झाली आहे. यातला प्रत्येक जण माधवीचे शोषण करतो, तिचा ‘मेध’ करून आपली प्रतिमा उजळ करतो. यातून माधवी मोठी होत जाते आणि ही तीन पात्रे खुजी वाटू लागतात. पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी ही कथा नकळतपणे स्त्री पात्राला ‘नायकत्व’ देते.
महाभारतातली ही कथा लोकमानसात रुजल्यावर तिचे अनेक अविष्कार झाले. ‘माधवी’ ही प्रातिनिधिक स्त्री आहे. महाभारत काळात जन्म घेतलेली किंवा त्या आधीची आणि नंतरही समाजात सापडणारी! माधवी म्हणजेच द्वंद्व आहे, मनात चाललेले महाभारत आहे.
गालव आख्यान आजच्या स्त्रीमुक्ती काळाच्या कसोटीवर तपासून पाहताना वेदना देते… हृदय पिळवटून टाकते. काळ कुठलाही असो, सर्वच स्त्रियांची स्थिती चांगली किंवा वाईट नसते! मला अंध आणि डोळस असे दोन्ही असणारा पती हवा असे म्हणणारी सर्वच्चला, शास्त्रोक्त वाद घालणारी गार्गी, भर सभेत प्रश्न विचारणारी द्रौपदी, आपल्या अटींवर विवाह करणारी सत्यवती या साधारणपणे ज्या काळातल्या स्त्रिया आणि माधवीही याच काळातली!
आजचा काळ स्त्रीमुक्तीचा काळ. आजच्या स्त्रीच्या कर्तृत्वाला आसमानही गवसणी घालू शकत नाही. मग आज समाजात माधवी नाहीत का? माधवी होत्या, आहेत अन् कायम राहतील… कारण माधवींना अमरत्वाचा शाप आहे.
कवी म्हणतो,
माधवी
मृत्यू, दु:ख, पराभव कुणाचाही असो
सर्व पराभूतांसाठी
मी विचलित होईन
तुझ्यासारख्या प्रत्येक आयुष्यासाठी
मला पाझर फुटेल
परहितासाठी, परक्या आगीत
जळत असेल एखादी माधवी
एखादी स्त्री… त्या प्रत्येकवेळी मी व्यथित होईन!
मूळ कविता हिंदीत आहे, पण भाषांतर वाचताना हे अजिबात जाणवत नाही. कुठेही ठेच लागत नाही… अनुवादक आसावरी काकडे यांचे हे यश आहे.


