Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितब्लेझर आणि 45 दिवस

ब्लेझर आणि 45 दिवस

चंद्रशेखर माधव

पुण्यात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. एकदमच वातावरण बदलल्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन महिने जरा जड गेले. पण नंतर मात्र मी नवीन ठिकाणी रुळलो. प्रथम वर्ष सहजगत्या फर्स्ट क्लासमध्ये पास झालो.

बघता बघता दुसरे वर्ष संपत आले. आमच्या प्रोजेक्टच्या इंटर्नल प्रेझेंटेशनची तारीख जवळ आली. प्रेझेंटेशनकरिता कॉलेजने आम्हाला फिकट निळ्या रंगाचा ब्लेझर आणि काळी पॅन्ट असा पोशाख करायला सागितलं होतं. कॉलेजनेच रविवार पेठेतला एक टेलर पाहून ठेवला होता. त्या टेलरकडे जाऊन पैसे देऊन माप देणे आणि ब्लेझर तसेच पॅन्ट शिवून घेणे, असा कार्यक्रम आम्हाला करायचा होता.

पण खरी समस्या वेगळीच होती. या सर्व प्रकाराला सुमारे चार हजार दोनशे रुपये खर्च येणार होता. ही रक्कम त्याकाळी माझ्यासाठी तरी खूप जास्त होती. ही समोर चालून आलेली खर्चाची नवीन बाब वडिलांना कशी सांगायची हा खरा प्रश्न होता. त्यांना हे सगळं सांगायचा काही केल्या धीर होत नव्हता. चार-पाच दिवस अस्वस्थतेत गेले. एक-दोन वेळा वडिलांच्या कानावर ही बाब घालायची संधी आली होती, पण माझं बोलायचं धाडस झालं नाही. शेवटी एक दिवस संध्याकाळी धीर एकवटून वडिलांना सांगितलं की, प्रेझेंटेशनसाठी ब्लेझर घेण्याकरिता मला 4 हजार 200 रुपयांची गरज आहे. कॉलेजने टेलर ठरवला आहे आणि तिथेच जाऊन माप देऊन यायचे आहे, वगैरे सर्व वृत्तांत कथन केला. वडिलांनी माझं सर्व म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं. माझं बोलून झाल्यावर फक्त “ठीक आहे” एवढंच म्हणाले.

त्यांच्या त्या प्रतिक्रियेवरून, आपल्याला पैसे मिळणार आहेत की नाही? याचा मला काही अंदाज येईना. काहीच बोललो नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा वडील सामोरे आले, तेंव्हा त्यांनी खिशात हात घालून बरोबर चार हजार दोनशे रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले. म्हणाले “हे घे आणि जाऊन माप देऊन ये टेलरकडे.”

अचानक हे सगळं घडल्यामुळे मी स्तब्ध होऊन क्षणभर वडिलांकडे पाहतच राहिलो. काही बोललो नाही. खरंतर, काय बोलावं तेच समजत नव्हतं. पैसे मिळाल्या मिळाल्या दुसऱ्याच दिवशी लगेच टेलरकडे जाऊन युनिफॉर्म शिवण्याचे सर्व सोपास्कार पूर्ण केले.

साधारण 10-15 दिवसांनी प्रेझेंटेशनचा दिवस उगवला. माझी सगळी तयारी व्यवस्थित पूर्ण झाली होती. नवीन युनिफॉर्म अंगावर चढवून कॉलेज गाठले. दुपारपर्यंत आमचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन वगैरे सगळं छान झालं. हा सर्व कार्यक्रम सगळा मिळून सुमारे तीन ते चार तासांचा होता. संध्याकाळी कॉलेजमधून घरी येताना माझ्या मनाला खूप खिन्नता आली.

मनात विचार आला “अरे, चार हजार दोनशे रुपये म्हणजे आपल्या वडिलांचा सुमारे 45 दिवसांचा पगार आहे. हा कष्टाचा पैसा फक्त एक ब्लेझर आणि पॅन्ट याकरिता आपल्याला खर्ची पाडावा लागला.” त्या तीन तासांकरिता कॉलेजने आम्हाला चार हजार दोनशे रुपये खर्चात ढकललं होतं. खूप वाईट वाटलं, पण इलाज नव्हता. जिथे जे करावं लागतं ते करावंच लागतं.

काळानुरूप ती पॅन्ट टाकून द्यावी लागली. पण तो ब्लेझर अजूनही माझ्याजवळ आहे. तो ब्लेझर आता मला बसत नाही, पण आताही शाबूत आहे. माझ्या वडिलांचे ते 45 दिवसांचे कष्ट जसे विकत घेतले होते, तसेच कपाटात ठेवलेले आहेत. कपाट उघडल्यानंतर तो ब्लेझर नजरेस पडतो आणि परत एकदा आठवण होते की, एकेकाळी माझ्या बाबांनी माझ्या भविष्याकरिता त्यांच्या कष्टाचा 45 दिवसांचा पगार कोणताही विचार न करता एका झटक्यात खिशातून काढून माझ्याकडे सुपूर्द केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!