Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भीक आणि भिकारी
    ललित

    भीक आणि भिकारी

    Team AvaantarBy Team AvaantarJune 4, 2025No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, भिकारी, दारू, व्यसन, सज्जनगड जेवण
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अजित गोगटे

    मी अनुभवलेले काही मासलेवाईक किस्से :

    …ताक वाढा हो माय!

    कल्याणच्या पारनाका भागात सुमारे 35 वर्षांपूर्वी एक ब्राह्मण व्यक्ती दुपारच्या वेळी वाड्या-वाड्यांमधून फिरून तिला हव्या असलेल्या खाण्याच्या वस्तूचीच फक्त भीक मागत असे. वयाची पन्नाशी ओलांडलेला हा माणूस आमचाच आडनावबंधू म्हणजे गोगटे होता. खरंतर, तो त्याच भागातील एका मोठ्या वाड्याचा वडिलोपार्जित मालक होता. परंतु भाऊ आणि भावजयीने वेडा ठरवून घराबाहेर काढल्याने भीक मागून पोटाची खळगी भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती!

    पारनाक्यावरीलच एका वाड्यात मी माझ्या मुलाला जोशी नावाच्या काकूंकडे सांभाळायला ठेवत असे. एकदा सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी या काकूंकडे गेलो असता ‘…ताक असेल तर वाढा हो थोडे’, अशी आर्त विनंती करत फाटक्या कपड्यांमधील हा गोगटे त्यांच्या दाराशी आला. काकूंनी बाहेर येऊन त्याला भांडभर ताक प्यायला दिले.

    भीक म्हणून फक्त ताक मागणार्‍या या आगळ्या भिकार्‍याचे मला कमालीचे कौतुक वाटले. ताक पिऊन झाल्यावर तो त्याच वाड्यातील एका झाडाभोवती बांधलेल्या कट्ट्यावर जाऊन बसला. मी तेथे जाऊन तो ताकाची भीक का मागतो, याची त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलेले कारण थक्क करणारे होते. माणसावरील खाण्या-पिण्याचे संस्कार त्याच्या विपन्नावस्थेतही कसे सुटत नाहीत, याची प्रचिती त्यावरून आली.

    पारनाका भागात एक मंगल कार्यालय आहे. त्या दिवशी या कार्यालयात एक लग्न समारंभ होता. कार्यालयाच्या बाहेर अनेक भिकार्‍यांसोबत हा गोगटेही जाऊन बसला होता. लग्नातील जेवणावळी उरकल्यानंतर कार्यालयातील नोकरांनी बाहेर बसलेल्या या भिकार्‍यांना अन्न आणून दिले. ती रीतसर वाढलेली पाने नव्हती. तर जेवणावळीत लोकांनी पानात टाकलेले पक्वान्न आणि अन्य पदार्थ एकत्र करून भिकार्‍यांना आणून दिले गेले होते. गोगटे मला म्हणाला, ‘त्यांनी दिलेल्या पोटभर जिलब्या खाल्ल्या. पण एवढे गोड खाल्ल्यावर ताक प्यायची लहानपणापासूनची सवय आहे. म्हणून ताक मागायला आलो.’

    मी पुन्हा काकूंकडे जाऊन ही अवलिया व्यक्ती कोण़? असे त्यांना विचारले. काकूंनी या व्यक्तीची दयनीय कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. तो हवे तेवढेच, म्हणजे पोळी असेल तर भाजी आणि भात असेल तर आमटी किंवा वरण मागून घेतो, असे काकू म्हणाल्या.

    भीक मागत असतानाही, हवे तेवढेच खाण्याचे आणि अन्नाची नासाडी न करण्याचे संस्कार तो जपत होता, यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी अनामिक आदर निर्माण झाला.


    फक्त 17 रुपये कमी पडताहेत!

    कल्याणमधील ‘राजा वाइन्स’ या दुकानासमोरून एके दिवशी पायी जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाने ‘शूक शूक’ करून मला बोलावले. तो साधारण कॉलेजकुमार वाटावा अशा वयाचा तरुण होता. चेहरेपट्टी आणि कपड्यांवरून तरी तो चांगल्या घरातील वाटत होता. मी त्याला ओळखत नव्हतो… तरी तो कशासाठी बोलावतो आहे, हे पाहण्यासाठी मी थांबलो. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘फक्त 17 रुपये कमी पडत आहेत. जरा तेवढे द्याल तर मेहेरबानी होईल?’

    यावरून काहीच उलगडा न झाल्याने मी विचारले, ‘कशाला 17 रुपये कमी पडताहेत?‘

    तो निर्विकार चेहर्‍याने उत्तरला, ‘‘‘ओसी’ची (Officer`s Choice) क्वार्टर घ्यायची आहे. माझ्याकडील चिल्लरसकट सर्व पैसे मोजले. पण 17 रुपये कमी पडत आहेत.’

    मी काहीही न बोलता त्याला 20 रुपयांची नोट काढून दिली. दुकानात जाऊन त्याने हवी ती क्वार्टर घेतली आणि जाताना पुन्हा माझे मनापासून आभार मानले. त्याने असे दारूसाठी पैसे का बरं मागितले असावेत, याचा विचार करत मी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात दुकानासमोरच उभा राहिलो.

    त्यावेळी `राजा वाइन्स`च्या गल्ल्यावर मालक तेलीशेठ स्वत: बसलेले होते. त्या  माणसाला मी पैसे दिले, हे तेलीशेठ यांनी पाहिले होते. चांगले परिचयाचे असल्याने त्यांनी मला बोलावून घेतले. मी त्याला पैसे दिले याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ‘पुन्हा कधी देऊ नका’, अशी सूचना केली.

    तेलीशेठनी मला सांगितले की, तो तरूण दारूच्या खूप आहारी गेला आहे. व्यसनामुळे असलेली चांगली नोकरी त्याने गमावली आहे. घरच्या लोकांनीही कंटाळून त्याला पैसे द्यायचे बंद केले आहे. ‘तुम्ही त्याला दारू देऊ नका’ अशी विनंती करायला त्याचे वडील आणि भाऊ दुकानात आले होते. परंतु माझा धंदा आहे. गिर्‍हाईकाने पैसे समोर केल्यावर मी त्याला माल द्यायला नकार देऊ शकत नाही. तो आठवड्यातून दोन-तीन दिवस असाच दुकानासमोर उभा राहून लोकांकडे पैसे मागतो आणि क्वार्टर घेऊन जातो.

    आपण त्या मुलाला दारूसाठी पैसे देणे योग्य की अयोग्य, याचा विचार करतच घरी आलो. घडलेला किस्सा घरच्यांना सांगितला, तेव्हा सर्वांनीच मला ‘तू चूक केलीस’, असे म्हणत दूषणे दिली. पण प्रामाणिकपणे विचार केल्यावर मला त्या मुलाचा राग आला नाही की, कीवही वाटली नाही. उलट दारूसाठी उघडपणे पैसे मागण्याच्या त्याच्या धाडसी निर्लज्जपणाचा मला कौतुकमिश्रित हेवा वाटला!

    यानंतर काही दिवसांनी एका रात्री ऑफिसमधील सहकार्‍यांसोबत दादर क्लबमध्ये गेलो. आता हयात नसलेले मराठीतील एक थोर कवी तेथे भेटले. आम्हाला पाहून ते आमच्याच टेबलावर येऊन बसले. मद्यपानासोबत भरपूर गप्पा झाल्या. आम्ही आमच्यासोबत त्या कविवर्यांचेही बिल चुकते केले. क्लबमधून बाहेर पडताना कॅश काऊंटरवरील व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून थक्क झालो.

    ‘हे कवी महाशय, कोणी तरी ‘पाजणारा भेटेल’ या आशेवर रोज संध्याकाळी क्लबमध्ये येऊन बसतात’, असे काऊंटरवरील त्या व्यक्तीचे सांगणे होते. हे ऐकून कल्याणला भेटलेल्या त्या तरुणाची आठवण झाली. मनात दोघांची तुलना केली आणि एकदा माणसान लाज सोडली की, लहान-मोठेपणा किंवा प्रतिष्ठेची कोणतीही भीड-मुर्वत त्याला राहात नाही, हे सार्वत्रिक सत्य अधोरेखित झाले!


    सज्जनगडाची भिक्षावारी!

    एक दिवस सुट्टीच्या दिवशी दुपारी घरात बसलेला असताना दाराची बेल वाजली. उठून दार उघडून पाहिले तर बाहेर नऊवारी साडी नेसलेली आणि डोक्यावरून पदर घेतलेली एक वृद्ध स्त्री उभी होती.

    ‘काय हवंय आजी?‘, मी विचारले.

    ‘बाबा, 11 घरी मागून सज्जनगडावर जाईन, असा नवस बोललेय. काही तरी मदत कर’, ती वृद्धा उत्तरली.

    मी तिला काही दिले नाही. उलट,‘जवळ पैसे नाहीत तर सज्जनगडावर कशाला जातेस? इथून मनापासून नमस्कार केलास तरी, तो समर्थांना नक्की पोहोचेल’, असे सांगत मी तिची हेटाळणी केली. ‘नसतील द्यायचे तर राहू दे’, असे म्हणत तिने मला आशीर्वाद दिला आणि ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा घोष करत ती निघून गेली.

    श्रद्धेचा पगडा माणसाला कसे हात पसरायला मजबूर करतो? असे मनात येऊन मला त्या वृद्धेची दया आली. हा प्रसंग घडला तेव्हा इन्कम टॅक्स वाचविण्याकरता ‘नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट’ (NSC) घेण्यासाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे, या विवंचनेत मी होतो. आपणही ‘11 घरी मागून ‘एनएससी’ घेण्याचा नवस बोलावा का?’ असा मिश्किल विचारही माझ्या मनात आला. परंतु तो प्रत्यक्षात उतरविण्याचे निलाजरे धाडस मी करू शकलो नाही.

    नंतर कधी तरी इस्लाम धर्माबद्दल वाचले. प्रत्येकाने आयुष्यात हज यात्रा करावी. पण ती स्वत:च्या पैशाने करावी. दुसर्‍याच्या पैशाने केलेल्या हजचे पुण्य मिळत नाही, असे इस्लाम सांगतो. ते वाचून सज्जनगडावर जाऊ इच्छिणार्‍या त्या वृद्धेची आठवण झाली. हजला जाण्याची ऐपत नाही म्हणून किती इस्लामी बांधवांची आयुष्याच्या कातरवेळी आध्यात्मिक कुचंबणा होत असेल? हिंदू धर्मात असे दुसऱ्यांच्या पैशाने देवदर्शन आणि तीर्थाटन करण्यास मज्जाव नाही, ही केवढी मोठी सोय आहे याची जाणीव झाली. त्याच बरोबर त्या वृद्धेस काहीही मदत न करता वर हेटाळणी करून विन्मुख परत पाठविल्याची बोचही मनाला लागली.


    जेवायला बोलावून पश्चात्ताप

    काही लोक, बोट दिले की अख्खा हात कसा खेचायला बघतात, त्याचा हा किस्सा.

    एक दिवस काही तरी सामान आणण्यासाठी सकाळच्या वेळी बाजारपेठेतून चाललो होतो. एका माणसाने समोर हात पसरून मला हटकले. ‘दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. 10 रुपये दिलेत तर मेहेरबानी होईल. एखादा वडापाव तरी खाईन’, असे तो माणूस काकुळतीने सांगत होता.

    पैसे देऊन किंवा न देताही मला त्याला फुटविता आले असते. पण तसे न करता ‘पैसे मिळणार नाहीत. जेवायला हवे असेल तर घरी या,’ असे त्याला सांगण्याचा आगाऊपणा  मी केला!

    तो म्हणाला, ‘ठीक आहे. जेवायला देत असाल तर घरी येतो’.

    हे घडले तेव्हा सकाळचे 10 – 10:15 वाजले होते. मी दुपारी जेऊन सुमारे 1:30च्या सुमारास कामावर जाण्यासाठी घरातून निघत असे. त्याला एका कागदावर घरचा पत्ता लिहून दिला आणि 12 – 12:30 वाजता जेवायला घरी या, असे सांगितले.

    घरी येऊन पत्नीला सांगितले. ती म्हणाली, ‘जेवायला घालायला माझी हरकत नाही. पण जो येणार आहे त्याला मी ओळखत नाही आणि तो कोण आहे, हे तुम्हालाही माहीत नाही. तेव्हा तो येऊन त्याचे जेवण होईपर्यंत तुम्ही घरात थांबणार असलात तरच मी त्याला जेवायला देईन’. पत्नीच्या या प्रस्तावास मी होकार दिला. तो दुपारी एकच्या सुमारास आला. आम्ही दोघे एकत्रच जेवलो आणि एकत्रच घराबाहेर पडलो. आम्ही दोघे जेवत असताना पत्नी तिकडे फिरकलीही नाही. त्याआधी ऑफिसला जायचे कपडे घालण्यासाठी आत गेलो, तेव्हा पत्नी आणि मुलीने ‘कोणालाही जेवायला बोलावून अगदी आग्रहाने जेवायला घातल्याबद्दल’ माझी यथेच्छ टिंगल केली.

    त्यावेळी माझी पत्नी, आमच्या घराच्या समोरच असलेल्या गणपती मंदिरात व्यवस्थापक म्हणून काम करत असे. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवून नेहमीच्या वेळेला ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो. चौकात जाऊन रिक्षेत बसत असतानाच मोबाइलवर पत्नीचा फोन आला. ‘तो कालचा माणूस आज पुन्हा जेवायला आला आहे. तातबडतोब घरी परत या’, असे तिने संतापाने फर्मावले. घरी आलो तर ते महाशय दाराबाहेर उभे होते. पत्नीने मला घरात बोलावून घेतले. ती मला म्हणाली, ‘हा आलेला  माणूस चोर आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिरात देवासमोर भाविकांनी टाकलेले पैसे चोरताना त्याला रंगेहाथ पकडून हाकलून दिले होते. तो पुन्हा घरी आलेला मला बिलकूल खपणार नाही.’

    मी बाहेर आलो व त्याला विचारले, ‘आज पुन्हा कशाला आलात?’ त्यावर तो उत्तरला, ‘जेवायला हवे असेल तर घरी या, असे तुम्हीच म्हणाला होतात. आजही जेवायला हवे आहे. म्हणून आलो.’ हे ऐकून माझा पारा चढला: ‘जेवायला घरी या, हे फक्त कालच्यापुरते होते. तुम्हाला रोज जेवायला घालायला इथे अन्नछत्र उघडलेले नाही!’ मंदिरातील चोरीचाही मी उल्लेख केला. त्याने तसे घडल्याची कबुली दिली. ‘पुन्हा इकडे फिरकलात तर तंगडी तोडून हातात देईन’, असा दम देऊन त्याला हाकलून लावले. खरंतर, एरवी अगदी जेवणाच्या वेळी घरी आलेल्या परिचितासही ‘आता जेऊनच जा’, असे चुकूनही न म्हणणारा मी. पण त्या दिवशी त्या माणसाला घरी जेवायला बोलावण्याची दुर्बुद्धी कशी सुचली याचे कोडे मला अद्याप उलगडलेले नाही.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn