दीपक तांबोळी
भाग – 4
अपार्टमेंट बांधायचं म्हणून तिन्ही भावांनी एक जुनं घर राहण्यासाठी भाड्याने घेतलं. बागेतली झाडं तोडण्याची महानगरपालिकेतून परवानगी घेतली गेली. अगोदर बाग तोडून मग बंगला तोडण्याचं काम सुरू करायचं होतं.
मुहूर्त ठरला… झाडं तोडायला सुरुवात झाली. पण शाळेतून आलेली मुग्धा आणि तिची तीनही भावंडे त्याविरोधात उभी राहिली. तिने आंब्याच्या झाडाला मिठी मारली. तिच्या मागे सौरभ, त्याची बहीण, विवेकचा मुलगा पळत गेले… त्यांनीही झाडाला मिठी मारली. ते पाहून विवेक आणि प्रसाद धावत गेले. मुलांना बाजूला करू लागले. मोठ्या प्रयासाने विवेकने मुग्धाला बाजूला केलं आणि तिच्या थोबाडीत मारली. प्रसादनेही सौरभला बाजूला करून ढकलून दिलं. खाली पडलेला सौरभ उठायला गेला तसा प्रसाद त्याला लाथांनी बडवू लागला. आंब्याच्या झाडाला मिठी मारलेली दोघं मुलं भीतीने रडू लागली. रडणाऱ्या मुग्धाला पाहून विवेक संतापाने म्हणाला,
“खबरदार जर तू त्या झाडाजवळ गेली तर!”
“ते माझ्या आजोबांचं झाड आहे. मी ते तोडू देणार नाही…” मुग्धा रडतरडत म्हणाली आणि परत झाडाजवळ जाऊ लागली तसं विवेकने तिला अडवून इतक्या जोरात तिच्या मुस्काटात मारली की, ती हेलपाटून खाली पडली. ते पाहून सुलभा धावतच पुढे आली, तिने मुग्धाला उचलून जवळ घेतलं आणि विवेकवर ओरडून म्हणाली,
“बस करा. लाज नाही वाटत पोटच्या पोरीला मारताना? पैशासाठी आंधळे झालाहात तुम्ही. ती लहान पोरं गयावया करताहेत तरी तुम्हांला त्यांची दया येत नाही? आता माझा जीव गेला तरी हरकत नाही. मी झाड तोडू देणार नाही.”
तिरीमिरीत ती झाडाजवळ जाऊन उभी राहिली आणि झाडं तोडणाऱ्या माणसांना म्हणाली.
“चालवा ती कुऱ्हाड माझ्यावर… तुकडे करा माझे, मगच ते झाड तोडा…”
घटनेने वेगळंच वळण घेतलेलं पाहून प्रसाद पुढे आला…
“वहिनी, अहो तुम्ही तरी समजून घ्या. ही बाग तोडल्याशिवाय आपलं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण कसं होणार?”
त्याचवेळी अंकीत आणि त्याची बायको बाहेर आले.
“बरं झालं भाऊजी तुम्ही आलात… आता तुम्ही तिघं मला सांगा तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे? बापाच्या जीवावर मोठे झालात. त्याने कमावलेल्या पैशांवर ऐश केली. आता तो नाहीये हे पाहून त्याच्या प्राँपर्टीची विल्हेवाट लावायला निघालात!”
हेही वाचा – नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा
“वहिनी, अहो आम्ही त्यांची प्राँपर्टी दुप्पट करणार आहोत…” अंकीत म्हणाला.
“त्यांनी जीवापाड जपलेली झाडं तोडून? मरणाऱ्या माणसाची अखेरची इच्छा शत्रूसुध्दा पूर्ण करतात भाऊजी आणि तुम्ही बापाची शेवटची इच्छा डावलून ही बाग, हा बंगला तोडायला निघालात? तुफान चालणारा बापाचा व्यवसाय तुम्ही तुमच्या नाकर्तेपणामुळे डबघाईला आणला. सांगा कोणतं कर्तृत्व दाखवलं तुम्ही?”
तिघा भावांना काय बोलावं सुचेना… झाडं तोडणारी माणसं शांतपणे सगळं ऐकत होती. त्यातला एक प्रसादला म्हणाला, “साहेब नका तोडू झाडं. बघा ना ती बाहेर सायकल आहे ना ती किती जुनी आहे, पण मी माझ्या बापाची आठवण म्हणून अजून सांभाळून ठेवलीय. आपल्या मेलेल्या बापाचं आणि या लहानग्या लेकरांचं मन दुखवून तुम्ही ही झाडं तोडताय. चांगलं नाही साहेब!”
प्रसादने विवेककडे पाहिलं. विवेकने त्याला इशारा केला…
“ठीक आहे, जा तुम्ही. नंतर पाहू काय करायचं ते!” प्रसाद पाकिटातून पैसे काढून त्यांना देत म्हणाला. ती माणसं गेली तशी प्रसादची बायको पुढे आली. खाली पडलेल्या सौरभला उठवून ती आत गेली. सुलभाही मुग्धाला घेऊन आत गेली.
“आता काय करायचं? ही पोरं तर हट्टालाच पेटलीयत…” अंकितने दोघा भावांना विचारलं.
“काही घाबरायचं कारण नाही. उद्या ही मुलं शाळेत गेली की, आपण झाडं तोडायला सुरुवात करू. ती येईपर्यंत सगळी झाडं तोडून टाकू,” प्रसाद म्हणाला.
“नाही प्रसाद… मुलं शाळेत जातील, पण सुलभा तर घरातच असेल. मला नाही वाटत ती झाडं तोडू देईल. एकदोन दिवस थांबा, मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो.”
दुसऱ्या दिवशी सकाळी जसा विवेक उठला, सुलभा त्याला म्हणाली, “अहो मुग्धाला बघा, रात्रभर तापाने फणफणतेय पोर”
विवेकच्या काळजात चर्र झालं. तो घाईघाईने तिच्या रूममध्ये गेला. मुग्धा शरीराचं मुटकुळं करून झोपली होती. त्याने तिच्या गळ्याला हात लावला, खरंच चांगलीच तापली होती ती. त्याच्या स्पर्शाने तिला थोडी जाग आली असावी. ती कण्हत म्हणाली, “बाबा… नका ना झाडं तोडू…”
हेही वाचा – तिन्ही पोरांच्या डोक्यातील ‘त्या’ खुळामुळे नाना हैराण
“रात्रभर सारखं हेच वाक्य बडबडतेय. चांगलाच धक्का बसलाय तिला कालच्या प्रसंगाचा!”
विवेक धास्तावला. घाईघाईने त्याने मोबाइल काढला, तशी सुलभा त्याला म्हणाली,
“डॉक्टरांना बोलावलंय प्रसाद भाऊजींनी. सौरभलाही खूप ताप आलाय…”
“बापरे!”
विवेक प्रसादच्या रूमकडे वळला. सुलभा त्याच्यामागून आली. सौरभ बेडवर झोपलेला होता. प्रसाद आणि त्याची बायको त्याच्या शेजारीच उभे होते. सौरभची लहान बहीण रडत होती.
“हिला काय झालंय?” विवेकने विचारलं
“सौरभला ताप आल्यामुळे आणि आपण झाड तोडलं, त्याचा राग आल्यामुळे रडतेय ती!”
“काका, नका ना झाडं तोडू. बघा ना सौरभदादा आणि मुग्धाताई दोघंही आजारी पडलेत…” ती काकुळतीने म्हणाली. तेवढ्यात अंकीत डॉक्टरला आत घेऊन आला. त्यांनी अगोदर सौरभला आणि नंतर मुग्धाला जाऊन तपासलं.
“या दोघांनाही फार मोठा मानसिक धक्का बसलाय. काय झालंय असं?”
सुलभाने तिघा भावांकडे रागारागाने पहात कोणतीही भीडभाड न ठेवता डॉक्टरांना सगळी घटना सांगितली. ती ऐकल्यावर डॉक्टर गंभीर होऊन म्हणाले, “हे बघा मला तुमच्या कौटुंबिक प्रकरणात पडण्याची इच्छा नाही. मात्र, या घटनेवरून दिसून येतं की, या मुलांचं आपल्या आजोबांवर आणि या बागेवर खूप प्रेम आहे. एक झाड तोडलं तर यांची ही अवस्था झाली. पूर्ण बाग आणि हा बंगला तोडल्यावर त्यांची काय अवस्था होईल, याचा विचार करा. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांना गमावून बसाल. खरं सांगू, इतका सुंदर बंगला आणि इतकी सुंदर बाग आपल्या शहरात कुठेही नाही. अपार्टमेंट बांधून तुम्ही पैसे कमावलही, पण हे अप्रतिम निसर्गसौंदर्य कधीही मिळवू शकणार नाही. याउपर तुमची मर्जी…”
हेही वाचा – अपार्टमेंटचं स्वप्न अन् झाडांच्या मुळावर घाव
तिघा भावांच्या चेहऱ्यावर डॉक्टरांचा सल्ला त्यांना पटलेला दिसला नाही. थोड्या वेळाने तिघं भाऊ दुकानात निघून गेले. आज दुकानाचा सौदा होणार होता. सुलभा दिवसभर बैचेन होती. एकतर मुग्धा आणि सौरभ दोघांचा ताप उतरला नव्हता… अशीच परीस्थिती राहिली तर दोघांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागणार होतं. शिवाय, तिघं भाऊ काय निर्णय घेतात हे कळत नव्हतं. दुकान विकलं गेलं तर, बंगला आणि बाग दोन्ही तोडलं जाणं अपरिहार्य होतं.
संध्याकाळी तिघं भाऊ घरी परतले. विवेक सरळ मुग्धाच्या रूममध्ये गेला. तिच्या गळ्याला हात लावल्यावर तिचा ताप कायम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिच्या डोक्यावरून त्याने प्रेमाने हात फिरवला.
“मुग्धा बेटा…” त्याने तिला हलकेच मारली.
“बघा ना तिचा ताप अजून उतरत नाहिये,” सुलभा आत शिरत म्हणाली. तिच्या पाठोपाठ प्रसाद, अंकित आणि त्यांच्या बायकाही आत आल्या.
मुग्धाने डोळे किलकिले करून विवेककडे पाहिलं.
“ऐक ना बेटा. तुझी बाग आम्ही तोडणार नाही… हा बंगलाही तसाच ठेवणार आहोत.”
“काय सांगताय काय? खरंच?” सुलभा अविश्वासाने विचारलं.
“हो सुलभा. आम्ही तिघांनी ठरवलंय, मुलांच्या जीवापुढे अपार्टमेंट आणि पैसा महत्त्वाचा नाहीये. म्हणून आम्ही दुकानाचा सौदा कॅन्सल करून टाकलाय. नानांनी मोठ्या मेहनतीने उभारलेला व्यवसायच आम्ही आता नेटाने करणार आहोत. अपार्टमेंटमधल्या फ्लॅट आणि दुकानाच्या बुकींगसाठी घेतलेले पैसे आम्ही हळूहळू परत करणार आहोत. आजपर्यंत खरंच आम्ही चुकीचं वागलो. दुकान विकतोय म्हटल्यावर आज अनेकजण ते विकत घ्यायला तयार होते .काहींना इतकं मोक्याच्या जागेवरचं दुकान आम्ही विकतोय याचं आश्चर्य वाटत होतं. त्या दुकानाची खरी किंमत आम्हाला आज कळली म्हणून आम्ही ते विकायचंच नाही, असा निर्णय घेतला.”
हे तिघं भाऊ सुधरलेत, यावर सुलभाचा विश्वास बसेना.
मुग्धा आता उठून बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. विवेकने तिच्याकडे पाहिल्याबरोबर “बाबा” म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली. विवेकलाही भडभडून आलं. तिला जवळ घेऊन तो रडू लागला…
“सॉरी बेटा, मी तुला मारलं.आय अँम रियली सॉरी…”
तेवढ्यात सौरभ आणि बाकीची मुलं तिथे मुग्धाजवळ येऊन बसली. मुग्धाने सगळ्यांना जवळ घेतलं. सगळे भाऊ-बहीण एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले.
दोन दिवसांनी बरं वाटू लागल्यावर मुग्धा बागेत आली. पक्षांच्या चिवचिवाटाने तिचं मन प्रसन्न झालं. सगळ्या झाडांना पाणी टाकल्यावर तिचं लक्ष चिकूचं झाड असलेल्या जागेकडे गेलं. ती जागा आता ओकीबोकी दिसत होती. तिला एकदम हुंदका फुटला. एकदम झाडाच्या पानांच्या सळसळीने ती भानावर आली. हवा सुटली होती. आंब्याच्या झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. त्या झाडाकडे पाहून तिला एकदम आजोबांची आठवण आली. आवेगाने तिने आंब्याच्या झाडाला मिठी मारली. पुन्हा जोरात हवा आली. त्या हवेने सुकलेली पानं तिच्या डोक्यावर पडू लागली. जणू आजोबाच डोक्यावरून मायेने हात फिरवताहेत, असं तिला वाटून गेलं आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू टपाटप खाली पडू लागले…
समाप्त
मोबाइल – 9209763049


