गजानन देवधर
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला (3 तारीख) आमच्या आण्णांची (वडिलांची) 104वी जयंती होती. आयुष्यभर रसिकतेनं, उत्साहानं आणि माणसांशी नातं जपत जगलेल्या त्यांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. खेळाडूपणा, नाट्याची आवड, खवय्येपणा, गप्पिष्ट स्वभाव आणि सतत काही ना काही उपक्रमात रमणं—या सगळ्या पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं.
3 तारखेच्या पहाटे जाग आली आणि त्यांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. लहानपणी त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीती होती. त्या भीतीमागे खरंतर त्यांच्या उंच व्यक्तिमत्त्वाचा आणि आमच्या आदराचा संगम होता.
आण्णा लहानपणापासून उत्तम खेळाडू होते. मल्लखांब, कबड्डी हे त्यांचे आवडते खेळ. मुंबईपर्यंत संघाचं प्रतिनिधित्व करून त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. लग्नानंतरसुद्धा ऑफिसाहून परत येऊन ते खेळायला जात असतं, असं आई सांगायची. योगासनांतही ते निपुण होते. या खेळ-योगाभ्यासातून त्यांनी घेतलेली शिस्त त्यांच्या आयुष्यभरच्या वागण्यात, बोलण्यात, घरकामात झळकत असे. सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई ते स्वतः करायचे, भिंतीवरील फोटो आणि कॅलेंडर पुसणं, ट्रंका लावणं, धूळ काढणं… आणि मग सुवासिक उदबत्त्या लावून झक्क असा चहा घेणं, हा त्यांचा रविवार सकाळचा कार्यक्रम असे.
तीच शिस्त त्यांच्या हस्ताक्षरातही होती. त्याचे हस्ताक्षर सुरेख होते. आम्ही लहानपणी पुस्तकांवर त्यांच्याकडून नावे घालून घ्यायचो. एकदा महाराष्ट्र राज्य खुल्या हस्ताक्षर स्पर्धेत त्यांना राज्यपालांच्या स्वाक्षरीचं प्रशस्तीपत्र मिळालं होतं.
लहानपणापासूनच त्यांना नाटकाचं वेड. जबलपूरला अत्र्यांचं लग्नाची बेडी, हैद्राबादला शं.ना. नवर्यांचं नवरा म्हणू नये आपला, बेळगावला बेडेकरांचं वाजे पाऊल आपुले अशा अनेक नाटकातील भूमिका त्यांनी रंगभूमीवर साकारल्या.
हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र
ते ज्या-ज्या शहरांत राहिले तिथल्या सांस्कृतिक संस्थांशी त्यांनी नातं जोडलं. बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळाच्या नाट्यशाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचा एक नाट्यप्रयोग राज्य नाट्यस्पर्धेत मुंबईच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. फक्त रंगभूमीवरच नाही, तर गणेशोत्सवात तीस-पस्तीस मुलांचे मेळे बसवून बेळगावच्या विविध भागांत आणि मराठा लाइट इन्फंट्रीत त्यांनी ते सादर केले.
ते गाणं शिकले होते की नाही, हे माहीत नाही, पण नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत त्यांना प्रचंड आवडायचं. घरी हार्मोनिअम होते. मित्रमंडळी जमली की गाणी, त्याच्या गप्पा रंगायच्या. रेडिओवरील संगीत समारोहाचे कार्यक्रम ते नित्यानं ऐकायचे. तरुणपणी त्यांना बेळगावात दोन महिने हिराबाई बडोदेकरांचा रियाज रोज ऐकण्याची संधी मिळाली होती, आणि तो अनुभव त्यांच्या आयुष्यभराची अमूल्य ठेव ठरला.
आण्णा खवय्ये होते. कोणतेही पदार्थ नाक न मुरडता खायचे, नव्या दिसणार्या भाज्या बाजारातून मुद्दाम आणायचे. फळबाजाराची त्यांना विशेष आवड. हैद्राबादला फळांचा लिलाव पाहायला जायचे. एकदा ते आणि त्यांचे मित्र दोघांनी लिलावातून पोतंभर आंबे आणले होते . पाहुण्यांना खाऊ घालण्यात त्यांना फार आनंद. नवीन घर घेतलं तेव्हा “तिथल्या हॉलमधे पंगत किती लोकांची बसू शकेल,” असे त्यांनी विचारले होते.
गोड पदार्थ त्यांना विशेष प्रिय होते, आणि 89 वर्षांपर्यंत मधुमेहासारखी व्याधी न झाल्याने ते गोड पदार्थांचा आनंद मनसोक्त घ्यायचे. एकदा माझा मावसभाऊ दिलीप घरी गेला असता स्वयंपाकघरात तेरा बरण्या पाहून त्याने विचारलं, “मावशी, यात काय आहे?” आई हसून म्हणाली, “प्रत्येकात वेगवेगळ्या फळांचे पाक आहेत, आण्णांना रोज वेगळा पाक हवा असतो.” त्यावर दिलीपचा पंच—“म्हणजे, तुमच्या घराचा पाकिस्तान झालाय तर!”
हेही वाचा – आता काय परिस्थिती आहे?
डोंबिवलीत राहात असताना त्यांनी कवठं आणून उज्वलाला नरसोबाच्या वाडीसारखी बर्फी करायला लावली. पहिल्यांदा नीट जमली नाही, पण दुसऱ्या दिवशी जमली. दोन्ही दिवस ते स्वयंपाकघरात बसून प्रक्रियेचा आनंद घेत होते. निवृत्त झाल्यापासून, त्यांच्या नाश्त्यात रोज सालासकटच्या मूगाचा लाडू आवर्जून असायचा.
माझ्या आजीप्रमाणे त्यांनाही औषधज्ञान होतं. एकदा त्यांनी डोंबिवलीत स्वतःहून च्यवनप्राश बनवण्याचा मोठा प्रकल्प राबवला. औषधी वनस्पती, आवळे, मध, मोठा गॅस, भांडी… सगळं आणून, विशेषतः आई आणि उज्वलाच्या मदतीने तीन चार दिवसांत तब्बल शंभर किलो च्यवनप्राश तयार केला. शेजारी-नातेवाईकांना वाटला. तेव्हा आख्या सोसायटीत चवनप्राशचा सुगंध दरवळला होता!
दरवर्षी ते आणि आई आवळ्याच्या मोसमात मोठी बरणी भरुन आवळ्याचा रस काढून, त्यात मुरेल तेवढी साखर घालून उन्हात ठेवायचे आणि आण्णा त्यातला चमचाभर रस रोज घ्यायचे.
त्यांना नातेसंबंध जपणं फार प्रिय. 1994 मध्ये पुण्यात त्यांनी स्वतःच 24 नातेवाईक-मित्रांची यादी करून, वेळ ठरवून, आई आणि आम्हाला बरोबर घेऊन सगळ्यांच्या घरी भेटी दिल्या. मुंबईतही तसेच! नंतर बाहेर फिरणं कमी झालं तरी, ते रविवारी फोन डायरी हातात घेऊन क्रमाने सगळ्यांना फोन करायचे. सगळ्यांशी संबंध ठेवायचे.
त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. बालपणापासूनच्या घटना, तारीख, वेळ त्यांना आठवत असत.त्यांच्या नियोजनाने आमचं संपूर्ण कुटुंब वारंवार एकत्र जमायचं, सर्व भावंडं त्यांच्या कुटुंबांसहीत एकत्र जमून दिवाळी साजरी करायचो. एकत्र जमण्याची ती परंपरा आजही सुरू आहे. एकदा तर, त्यांनी आम्हा बत्तीस जणांना त्याचं बालपण गेलं ते गाव आणि आमचं शेत दाखवायला नेलं होतं. त्यांच्या गप्पांना तोड नव्हती. आत्या भेटल्या की मराठी-कानडी गप्पा आणि आठवणींतून रात्री कधी सरली कळायचं नाही.
2006 मध्ये माझ्या छायाचित्रांचं प्रदर्शन डोंबिवलीला झालं. त्याचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, असा आण्णांचा आग्रह होता. प्रसिद्ध छायाचित्रकार श्रीकांत मलुष्टे उद्घाटनाला आले होते. आलेल्या प्रत्येकाची चौकशी त्यांनी स्वतः केली. उद्घाटनाचा खर्च ते स्वतः करणार, असं आण्णांनी ठामपणे सांगितलं होतं.
ते नेहमी म्हणायचे, “तुमची खरी श्रीमंती म्हणजे तुम्ही किती माणसं जोडली आहेत, त्यावरून समजते.” त्यांनी ते केवळ सांगितलं नाही, तर जगून दाखवलं. त्यांच्यामुळं नकळत आमच्यावरही तसेच संस्कार झाले.
dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859


