हिमाली मुदखेडकर
“आई, माझ्या फिजिक्सच्या सरांनी तुला भेटायला बोलावले आहे…” चिरंजीव घरात येता येता सांगते झाले…
“का रे बाबा? काय प्रताप करून ठेवलायस? कालच तर त्यांच्या नावे ॲप्लिकेशन नेलेस ना, माझ्या सहीने… मग आता काय?”
“माहिती नाही यार… सगळ्यांनीच दिलं ॲप्लिकेशन…”
मला वाटलं, याने केलं असणार काहीतरी किंवा मागच्या पालक सभेत आम्ही हजर नव्हतो म्हणून कदाचित असेल बोलावले! जाऊन तर पाहू, उद्या कळलेच काय प्रगती आहे ते…
आधी फोन करून दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवून घेतली.. आणि ठरलेल्या वेळेत पोहोचले… दारावर टकटक करून ‘आत येऊ का,’ असे विचारले… समोरची व्यक्ती साधारण माझ्याच वयाची… रंग सावळा, शिडशिडीत बांधा, उंची जरा कमीच… पण वैचारिक बैठक प्रगल्भ असल्याच तेज चेहर्यावर दिसणारी… अशी होती.
त्यांनी तत्परतेने… “या ना प्लीज…” असे म्हणत समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून बसण्यास सांगितले.
“मी मिहीरची आई…” स्वतःची ओळख देत मी खुर्चीत बसले. त्यांनी जवळची बेल वाजवली आणि प्यूनला दोन चहा आणण्यास सांगितले.
‘काय घोळ घालून ठेवला आहे मिहीरने… काय सांगणार असतील हे…’ विचार करत असतानाच… “तुम्ही मूळच्या नांदेडच्या का हो?” असा अचानक प्रश्न आला आणि मी जरा चमकले… आश्चर्याने त्यांच्याकडे पाहात ‘हो’ असं उत्तर दिले. त्यांना आता मी नीट न्याहाळून पाहिले… पण कसलीच ओळख पटेना!
माझे हावभाव पाहून माझा उडालेला गोंधळ त्यांच्या लक्षात आला असावा… ते पुढे म्हणाले, “मी ही नांदेडचाच आहे… हनुमान टेकडी भागात आमचे छोटेसे दोन खोल्यांचे घर होते… वडिलांना फारसे उत्पन्न नसल्याने आई चार घरी स्वयंपाक करत असे. माझ्या पाठच्या दोन बहिणी, मी आणि आई-वडील असा आमचा परिवार… हाता-तोंडाची गाठ अशी परिस्थिती. मग शालेय पुस्तके आम्ही कुणाकडून तरी जुनी वापरलेली घेत असू… आधीच जुनी पुस्तके, ती मी वापरून पुढे माझ्या बहिणींना द्यायची… धाकटीपर्यंत जाईस्तोवर ‘पत्रावळी’ व्हायच्या त्यांच्या… पण मी इयत्ता पाचवीमध्ये असताना आई ज्यांच्याकडे पोळ्या करायला जात असे त्या आजींनी त्यांच्या नातीची वापरलेली पुस्तके माझ्या आईला माझ्यासाठी दिली… मी पुस्तके पहिली, अगदीच नीट नेटकी! छान कव्हर घातलेली आणि व्यवस्थित वापरलेली होती… मी आईला विचारले कुणी दिली ही? आणि पैसे किती लागले? “त्यावर आई म्हणाली, ‘अरे, त्या नेकलीकर आजींच्या नातीची आहेत… आणि पैसे घेतले नाही हं त्यांनी! उलट दरवर्षी घेऊन जात जा म्हणाल्या…’”
हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
…आत्ता मला संदर्भ लागला! मी चमकून इतका वेळ न पाहिलेल्या ‘नेम प्लेट’कडे पाहिले आणि खात्री पटली… “तुम्ही अतुल कुलकर्णी का?…” मी जवळ-जवळ आश्चर्याने ओरडलेच… तसे स्मित हास्य करत त्यांनी होकारार्थी मान हलवली!
“तुम्ही ओळखले कसे मला? आपण यापूर्वी कधीच भेटलो नाही! शिवाय, माझे आडनावही आता वेगळे आहे…” मी आश्चर्याने एका पाठोपाठ प्रश्न विचारत गेले…
“मी काल पाठवलेले application माझ्यासमोर धरत ते म्हणाले, “या सहीवरून…”
“म्हणजे?”
“स्वत:चं नाव लिहिण्याची तुमची एक विशिष्ट पद्धत आहे. तुमच्या पुस्तकांवर ही अशाच पद्धतीने नाव लिहलेले असे… ‘अनामिका’! पुस्तक उघडल्याबरोबर पाहिल्या पानावर उजव्या कोपर्यात हे नाव मी पाहिलेले आहे… सलग 6 वर्षं शाळेची आणि दोन वर्ष junior college ची असं नाव असणारी पुस्तके मी वापरलीत… काल त्या application वरील सही पाहिली आणि लगेच क्लिक झालं… या तुम्हीच आहात!”
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
“ताई तुमची पुस्तकं वापरून शिकलोय… पण तुम्हाला भेटण्याचा योग आला नाही कधी… उत्सुकता वाटली म्हणून तुम्हाला भेटण्यास बोलावले…” कुलकर्णी सर बोलत होते, “शिक्षण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळाली… पुढे हे इन्स्टिट्यूट सुरू केले… परिस्थिती पालटली.. आज सधन वर्गात मोडतो! तुमच्या आजीचा पायंडा मात्र चालवतोय… माझ्या मुलांची वापरलेली शालेय पुस्तके मी विकत नाही… तर ती गरजू विद्यार्थ्यांना मोफत देतो… आणि जमल्यास नवी पुस्तकेही घेऊन देतो…”
कुलकर्णी सरांना भेटून घरी परतताना एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद होता मनात…!



Wonderful reconnection!
खुप छान…