Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितप्राचीन चित्रकला अन् मोर

प्राचीन चित्रकला अन् मोर

यश:श्री

भाग 1

कला, साहित्य अशा अनेक माध्यमांमध्ये मोराचे आकर्षण पाहायला मिळते. अगदी प्राचीन काळापासून विविध कलांमध्ये मोराचे महत्त्व अधोरेखित होते. शिल्पकलांमध्येही त्याची झलक दिसते. अनेक प्राचीन मंदिरांमधील कलाकुसरेत मोराचे दर्शन घडते. दगड, कास्य आणि मातीच्या मूर्तीमध्ये मोर तयार करणे हा कलाकरांचा आवडता विषय असल्याचे पाहायला मिळते. मनुष्याच्या जीवन आणि कलेमध्ये मोर हे अभिन्न अंग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिल्पकलांप्रमाणेच चित्रकलेतही मोर पाहायला मिळतो.

डॉ. जगदीश गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचीन काळातील मोराच्या चित्रात विविधता आढळते आणि त्याचे स्थान अत्युच्च असे आहे. आदमगडच्या गुहेमध्ये (होशंगाबाद) मोराचे जे अत्यंत विशाल चित्र आहे, त्या चित्रावरून त्याला त्यावेळी असलेल्या विशेष महत्त्वाची कल्पना येते. तर, लिखनिया (मिर्झापूर) येथे एका दगडावर श्रृंखलाबद्ध स्वरुपात मोराची चित्रे पाहायला मिळतात. गडद लाल रेषांच्या साहाय्याने रेखाटलेली ही सुंदर चित्रे असून मयूराच्या स्वरुपातील या श्रृंखलेची लांबी कदाचित सुरुवातीला खूप असेल. पण नंतर त्याचा बहुतांश भाग निखळून नष्ट झाला आहे, असे प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी म्हटले आहे.

मोरांच्या या चित्रांसमोर एक मानवाकृती आहे. जी संभवत: वनदेवी किंवा त्या स्त्रीची आहे, जिने हे मोर पाळले होते. सागर क्षेत्रातील एका मयूराच्या चित्रात पिसाऱ्याकडील भागाचा विशेष प्रभाव दाखविण्यासाठी सामान्य शैलीचा त्याग करून रेषांद्वारे तरंग दाखविण्यात आले आहेत. कलात्मक दृष्टिकोनातून हे तरंग अतिशय आकर्षक वाटतात. डोक्यावरील तुरा, मान आदीचे रेखाटन वास्तवस्वरुपात असल्यासारखे वाटते. परंतु पायांचा आकार मोठा दाखविण्यात आला आहे, असे दुर्गा भागवत यांनी नमूद केले आहे. डॉ. जगदीश गुप्त यांच्यासह केदारनाथ शास्त्री आणि माधस्वरुप वत्स यांनी आपल्या पुस्तकांमध्ये भारताचा प्राचीन तसेच सिंधू संस्कृती काळातील मोराचे अलंकारिक चित्र सादर केले आहेत. त्याचबरोबर त्या चित्रांच्या कलात्मक बारकाव्यांचे विवेचनही केले आहे.

दुर्गाबाईंनी रमेश बेदी यांच्या ‘मोर : हमारा राष्ट्रीय पक्षी’ (1979) या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. सिंधमध्ये चन्हदडोशी संबंधित खोदकाम करताना ज्या ठिकऱ्या मिळाल्या, त्यापैकी बहुतांश ठिकऱ्यांवर सूर्यबिंबाचे चित्र आहे. परंतु सूर्यबिंबाच्या किरणांऐवजी पिंपळाची पाने दर्शविण्यात आली आहेत. या बिंबाकडे मोर मोठ्या उत्कंठतेने पाहात आहेत, असेही चित्रीत करण्यात आले आहे.

हडप्पामध्ये दोन प्राचीन कब्रस्तान आढळले आहेत. त्याद्वारे सिंधू संस्कृतीतील रहिवाशांची अन्त्यसंस्कार विधी आणि परलोकासंदर्भात त्यांच्या विश्वासावर प्रकाश पडतो. मृत्यूनंतर मनुष्याचे सूक्ष्म शरीर, सूर्यलोक आदी दिव्यलोकात निवास करते. तसेच, दिव्यलोकातील यात्रेत मोर मृतात्म्याचा सहाय्यक असतो, असा त्यांचा विश्वास होता. त्या काळातील स्मशानात जी भांडी सापडली, त्या भांड्यांवर मोरांची शेकडो चित्रे आहेत, असे दुर्गा भागवत यांनी एका लेखात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!