Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeफिल्मीबिग बी सोबतचा अविस्मरणीय 'लिफ्ट'प्रवास

बिग बी सोबतचा अविस्मरणीय ‘लिफ्ट’प्रवास

आराधना जोशी

अमिताभ बच्चन. सिर्फ नाम ही काफी है. शतकातील महानायक. अमितजींची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते ‘जलसा’ या त्यांच्या बंगल्याबाहेर कायम जमलेले असतात. ज्यांना त्यांचं दर्शन होतं त्यांना प्रत्यक्ष देवच भेटल्याचा आनंद होतो.

अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग मला मिळाला तो साधारणपणे 1999 साली. हिंदीतील ज्युबिली कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र कुमार यांचे निधन झाल्यावर मी त्यांच्या निधनाची बातमी कव्हर करायला त्यांच्या बंगल्यावर गेले होते. तिथे अंत्यदर्शनासाठी इतर कलाकारांबरोबर अमिताभ बच्चन, जया आणि अभिषेकसह आले होते. चॅनलच्या कॅमेऱ्यांसमोर येऊन अमितजींनी श्रद्धांजली वाहताना राजेंद्र कुमार यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर 2000 साली वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलच्या आयव्हीएफ सेंटरच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केलं होतं. सगळ्या मीडियाला त्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. सेंटरच्या उद्घाटनापेक्षाही अमिताभ तिथे येणार म्हणून प्रसार माध्यमांची तिथे गर्दी उसळली होती. ABC कंपनीच्या प्रचंड तोट्यातून बाहेर येण्यासाठी त्यावेळी बिग बींनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. स्टार प्लसच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक म्हणून अमिताभ घराघरात लोकप्रिय झाले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अमिताभ सार्वजनिक ठिकाणी येणार म्हणून माध्यमांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यावेळी ई टीव्ही मराठीसाठी मी रिपोर्टर म्हणून काम करत होते. त्यादिवशी मला दोन असाईनमेंट होत्या. त्यातली एक होती सायनची आणि तिथून जवळ पडेल म्हणून दुसरी होती लिलावती हॉस्पिटलची.

पहिली असाईनमेंट संपवून घाईघाईने आमची टीम लिलावतीकडे निघाली. अमितजी वेळेचे पक्के आहेत, त्यामुळे कार्यक्रमाला वेळेत पोहोचा, असा ऑफिसमधून निरोप आला होता. सकाळी ११ च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी घाईघाईत हॉस्पिटलला पोहोचलो. लिफ्टपाशी आलो आणि आमच्या सगळ्या टीमचा आ वासला. लिफ्टपाशी प्रत्यक्ष अमितजी आपल्या एका सिक्युरिटी गार्डबरोबर उभे होते. बाकी त्यांना कोणाची सोबत असावी असं वाटलं नसावं. पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि त्यावर एक शाल अशा वेशात शांतपणे अमितजी उभे होते.

लिफ्ट तळमजल्यावर आली आणि अमितजींबरोबर आम्हीही त्या लिफ्टमध्ये शिरलो. सिक्युरिटी गार्डने अडवण्याचा प्रयत्न केला, पण अमितजींनीच त्यांना येऊ द्या, असं सांगितल्यामुळे आम्हीही त्या लिफ्टमध्ये प्रवेश करू शकलो. अमितजी, त्यांचा एक सिक्युरिटी गार्ड, मी आणि माझा कॅमेरामन असे चौघेजण त्या लिफ्टमध्ये. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. शेवटी मीच घाईघाईने त्यांना विनंती केली की आमच्या चॅनलला तुमची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घ्यायची आहे. त्यावर आपल्या त्याच खर्जातल्या आवाजात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या करारानुसार त्यांना त्यावेळी इतर चॅनलशी बोलण्यावर बंदी होती. हे कारणही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र कार्यक्रमाचं ठिकाण येईपर्यंत त्यांनी आमची चौकशी केली. आमच्या कामाचं स्वरूप जाणून घेतलं. आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला शुभेच्छाही दिल्या.

हे सगळं सुरू असताना आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. माझ्यासारख्या एका सामान्य मुलीशी अमितजी काय बोलत असतील? असा भाव तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर होता. मी आणि माझा कॅमेरामन मात्र त्यावेळी ‘सातवे आसमान पे’ थे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आसावरी, लहानसा पण केवढा मोठा अनुभव.
    कौन बनेगा करोडपती च्या एका एपिसोडमध्ये मी प्रेक्षक म्हणून गेले होते.त्याळी अमिताभ बच्चन यांच्या चालण्यातला डौल, उत्साह, सामान्य लोकांशी देखील बोलण्यातील अदब थक्क करणारे आहे.
    खरंच, त्यांची ओळख सांगण्याची जरूर नाही.अमिताभ बच्चन सिर्फ नामही काफी है।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!