ॲड. कृष्णा पाटील
“आपल्याला आता आपली केस थांबवायची आहे साहेब. मला काय इथून पुढं तारखेला यायचं होणार नाही. पाण्याचे दोन थेंब टाकून देवापुढं ठेवायचा म्हटलं तर रुपाया खिशात नाही. त्यामुळे मी पुढं केस चालवू शकणार नाही. आपण इथंच थांबूया.”
नाटेकर वकिलांनी हातातली कागदपत्रांची फाईल बाजूला ठेवली. मान वर करून नामदेव दादांकडे आश्चर्याने पाहिले. नेहमीप्रमाणेच नामदेव दादांनी कपाळावर मोठा गंधाचा उभा नाम लावला होता. त्यावर दोन ठिकाणी अष्टगंध आणि आबिर बुक्क्याची काळी टिकली लावली होती. कानाच्या पाळीवर आणि नरड्याच्या गोटीवर एक एक चंदनाचा पिवळा टिळा लावला होता. डोक्यावर पांढरी शुभ्र परीट घडीची टोपी होती. गुळगुळीत दाढी करून तलवार कट मिशा कोरल्या होत्या.
नाटेकर वकील म्हणाले, “तुम्ही पंजाबहून कधी आलाय ते तर कळू द्या अगोदर.”
“मी काल रात्रीच गावी आलोय साहेब. खास या कामासाठी आलोय.” नाटेकर साहेबांना नाही म्हटलं तरी, मनातून आश्चर्य वाटलं होतं. आता निकालापर्यंत आलेली केस नामदेव दादा मागे का घेत आहेत? नेहमी नित्यमाने तारखेला येणारे नामदेव दादा आज एवढे का बदलले आहेत?
नाटेकर साहेब म्हणजे महसुली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे नावाजलेले वकील होते. गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये त्यांनी अनेक किचकट प्रकरणे लीलया सोडवली होती. महसुली विभागातले वकील म्हणूनच ते प्रसिद्ध होते. शहराच्या मध्यभागी त्यांचे आलिशान कार्यालय होते. कार्यालयात नेहमीच पक्षकारांची गर्दी असायची. एवढ्या वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये नाटेकर साहेबांना असा पहिलाच अनुभव आला होता.
नाटेकर साहेब म्हणाले, “नामदेव दादा येत्या 22 तारखेला तुमच्या केसचा शेवटचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर तारखा बंद होतील. आठवड्यात निकाल लागेल. तुम्ही पाच-सहा वर्षे कोर्टात हेलपाटे घातले. आपल्याला केसमध्ये यश येण्याची खात्री आहे. असे असतानाही मधेच कुठून हे भूत उठवून बसवलंय?”
“सांगितलं ना साहेब. खरंच माझी परिस्थिती नाही. एवढ्या लांबून येऊन केस चालवणं मला शक्य होत नाही. शिवाय, ज्याच्यासाठी केस खेळायची त्याच्या डोक्यावर आता परिणाम झालाय. त्यालाही कालच आमनापूरला पाठवला आहे…”
“काय झालं विक्रमला एकाएकी?”
“त्याच्या डोक्यावर पूर्ण परिणाम झाला आहे, साहेब. कुठलंच काम तो नीट करत नाही. दिवसभर नुसता छताकडे बघत पडून असतो. जेवायला दिलं तर, जेवतो नाहीतर तसाच झोपतो. सांगितलेलं काही एक ऐकत नाही. आपण काय सांगायला गेलो तर, फक्त तोंडाकडे बघत राहतो.”
हेही वाचा – Land deal : गावातल्या जमिनीसाठी…
नामदेव दादांच्या डोळ्यातून पाणी ओघळले. त्यांनी त्यांच्या सदऱ्याच्या बाहीने डोळे पुसले. नाटेकर साहेबांनी टेबलवरची पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली. एक दीर्घ श्वास घेऊन नामदेव दादा दोन घोट पाणी प्याले. घसा मोकळा करून थरथरत्या आवाजात शांतपणे म्हणाले,
“विरुद्ध पार्टीला ही सर्व परिस्थिती मी सांगितली साहेब. आम्ही सत्संगातील माणसे. कायम सरळमार्गाने चालणं एवढंच आम्हाला माहीत. वाकडी नेम घ्यायची आमच्या आयुष्यात माहिती नाही. विरुद्ध पार्टी माझ्या परिस्थितीकडे पाहून तयार झाली. ती म्हणाली आपण काहीतरी तोडजोड करू. म्हणून आपण केस थांबवू या.”
“विरुद्ध पार्टी तयार असेल तर एक नंबरच. तुमची तडजोड कोर्टात देऊया. कोर्टामधून तसा आदेश पारित होईल. मग तुमच्या मागची कटकट कायमस्वरूपी संपेल.”
“नको साहेब. तसलं आता काहीच करायला नको. आमची बाहेर तडजोड झाली आहे. तुम्ही फक्त केस मागे घेण्याचे काम करा.”
नाईलाजाने नाटेकर साहेबांनी कपाटातून नामदेव दादांची फाईल काढली. कोर्टापुढे देण्यासाठी एक अर्ज लिहिला. ‘कोर्टाबाहेर तडजोड झाल्यामुळे सदरची केस चालवायची नाही. सबब केस काढून टाकण्यात यावी.’ नामदेव दादांच्या समोर पेन धरून नाटेकर साहेब म्हणाले,
“आणखी एकदा विचार करा नामदेव दादा. विक्रम नुकताच सज्ञान झाला आहे. त्याच्या हितासाठी त्याच्या नावावर ही मिळकत होणे गरजेचे होते. विरुद्ध पार्टी बदलली तर विक्रमच्या नावावरची जमीन त्यांना परत जाऊ शकते. जमिनीच्या वाटेने जमीन जाईल. पैशाच्या वाटेने पैसा जाईल. परंतु तुम्ही जिच्यासोबत सात फेरे काढले होते, तिच्या आत्म्याला काय वाटेल? याचा पण विचार करायला पाहिजे.”
नामदेव दादांनी वर पाहिले नाही. पेन घेतले आणि केस मागे घेण्याच्या अर्जावर सही केली. नाटेकर साहेबांनी तो अर्ज आणि नामदेव दादांची सर्व कागदपत्रे परत केली.
“हा अर्ज तारखे दिवशी कोर्टापुढे देऊन टाका. तिथं आता माझी काही आवश्यकता लागणार नाही.”
नामदेव दादांनी सर्व कागदपत्रे त्यांच्या पिशवीत टाकली. उठून वर न बघताच नाटेकर साहेबांना नमस्कार केला. कुणीतरी ढकलून दिल्यासारखे ते कार्यालयाच्या बाहेर पडले.
बरोबर एक वर्षांनंतर..
सकाळची वेळ होती. नाटेकर साहेब नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये बसले होते. त्याचवेळी पाठीला सॅक अडकवलेला एक तरुण पोरगा ऑफिसमध्ये आला. सडपातळ शरीरयष्टी असणाऱ्या त्या गोऱ्यागोमट्या तरुणाने लाल रंगाचा टी शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली होती. त्याच्याबरोबर मध्यमवयीन आणखी एक इसम आला होता. डोक्यावर फर कॅप, हातात सोन्याचे कडे आणि तोंडात पान चघळत तो कार्यालय न्याहाळत उभा होता.
आल्या आल्या तरुण म्हणाला “साहेब, ओळखलं का मला? मी नामदेव दादांचा मुलगा, विक्रम.” बोलता बोलता त्याने बरोबर आलेल्या इसमाकडे बोट दाखवले.
“…आणि हे माझे चुलत मामा दत्ता भाऊ.”
नाटेकर साहेबांनी विक्रमकडे आश्चर्याने पाहिले. पूर्वी सातवीला असताना तो एकदा नामदेव दादांसोबत ऑफिसला आला होता. त्यावेळी तो अत्यंत कावराबावरा होता. त्याचा चेहरा पार सुकून गेला होता. जीव मुठीत धरून एखादं शेळीचं पिल्लू बसावं तसा तो कोपऱ्यात बाकड्यावर बसला होता. बावरलेल्या डोळ्यांनी तो इकडेतिकडे टकामका बघत होता.
नामदेव दादांनी आणलेली सर्व कागदपत्रे नाटेकर साहेबांच्या समोर ठेवली. त्या बावरलेल्या मुलाकडे पाहून म्हणाले, “हा माझा थोरला मुलगा. याच्या नावावर एक एकर जमीन घेतली होती. परंतु त्याची आई त्याच्या लहानपणीच वारली. त्यानंतर याला सांभाळण्यासाठी मला दुसरा विवाह करावा लागला. त्या व्यापात त्याचं नाव जमिनीवर लावायचं राहून गेलं. त्यामुळे जमिनीच्या सात-बारावर याचं नाव लागण्यासाठी आपल्याला केस करायची आहे.”
हेही वाचा – Trap of Deception : जमिनीचा सौदा… अन् नोटरी
नामदेव दादांची केस बरेच दिवस चालली. त्यानंतर ती निकालावर आली आणि अचानकच नामदेव दादांनी केस परत घेतली. त्यांना खोदून खोदून विचारले, परंतु त्यांनी ठोसपणे काहीच कारण सांगितले नाही.
नाटेकर साहेबांना हे सर्व आठवले. नाटेकर साहेब म्हणाले, “हो, हो ओळखलं की. परंतु आता तू खूप मोठा झालास. त्यामुळे एकदम लक्षात आलं नाही. बैस.”
टेबलसमोरच्या लाकडी खुर्चीवर तो अवघडून बसला. दुसऱ्या खुर्चीवर दत्ता भाऊ बसला.
“कितवीला आहेस?”
“कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे साहेब.”
“बाकी काय म्हणतोयस?”
मग विक्रमने सांगायला सुरुवात केली.
“माझी आई लहानपणीच वारली. आई दगडी कोळसा फोडण्याच्या कारखान्यात कामाला जात होती. दगडी कोळसा फोडता फोडता नाकात विषारी राख जाऊन तिला कॅन्सर झाला. त्यातच ती मयत झाली. आई असताना माझ्या नावावर एक एकर जमीन खरेदी केली होती. पालक म्हणून वडिलांचं नाव लावलं होतं. त्या जमिनीसाठी सगळा पैसा आईनेच घातला होता. कारण दारूच्या नादात बापानं गावाकडची सगळी जमीन विकून टाकली होती. त्यामुळे आईने जिद्द बांधली होती. कसल्याही परिस्थितीत जमीन घ्यायचीच. म्हणून तिने कष्टाने पैसा जमवला. मात्र जमीन घेताना ती माझ्या नावावर केली. नामदेव दादांच्या नावावर घेतली असती तर, त्यांनी दारूसाठी विकली असती.”
“खरेदीपत्र झाले आणि काही दिवसातच आई वारली. त्यामुळे माझे नाव सातबारावर आलेच नाही. सातबारावर नाव येण्यासाठी केस केली होती. परंतु गेल्या वर्षी मी सज्ञान झाल्यामुळे ती संपूर्ण जमीन माझ्या नावावर लागणार होती. केसचा निकाल या अगोदरच लागला असता तर, ती पालक म्हणून माझ्या वडिलांच्या नावे लागली असती. त्यांना जमीन विकायला सोपं झालं असतं. पण आता माझे एकट्याचे नाव लागणार होतं…”
“सावत्र आईच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर तिने मला छळायला सुरुवात केली. कधी जेवण द्यायची. कधी जेवण द्यायची नाही. घरातलं सगळं लोटून काढायला लावायची. मला एक सावत्र भाऊ आणि एक सावत्र बहीण आहे. माझी सावत्र आई त्या दोघांना अभ्यासाला बसवायची आणि मला घरातलं काम सांगायची. मी जेवलो की, माझी ताटवाटी मलाच धुवायला लावायची. माझे कपडे मलाच धुवायला लावायची. एकदा मी आजारी असल्यामुळे माझे कपडे धुतले नाहीत. नामदेव दादा बाहेर गेल्याचे पाहून तिनं मला खूप मारलं.”
विक्रमने नाटेकर साहेबांना गुडघ्यापासूनचा खालचा नडगीचा भाग पॅन्ट वर करून दाखवला. त्यावर अंगठ्याएवढे दोन रक्ताळलेले काळपट व्रण उठले होते.
विक्रम पुढे सांगू लागला, “आई माझा छळ करायची आणि ही गोष्ट मी नामदेव दादांना सांगितली तर, नामदेव दादा आईच्या दुप्पट मला मारायचा. दुसऱ्या बायकोवर त्यांचा भारी जीव होता. तिला काही म्हटलेलं नामदेव दादांना आवडायचं नाही. त्या भीतीपोटी मी नामदेव दादांनाही काही सांगू शकत नव्हतो. बरं, ते दोघं माझा का छळ करतात तेही समजत नव्हतं…”
“सावत्र आईच्या आणि वडिलांच्या दडपणाखाली माझी प्रचंड पिळवणूक होऊ लागली. त्यातूनच मला चित्रविचित्र स्वप्नं पडू लागली. अन्नावरून वासना उडाली. मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. कधी कधी दिवस मावळायला निघाला की, वाटायचं या दिवसाबरोबर आपल्या आयुष्याला पण पूर्णविराम द्यावा. खिन्न होऊन बसून राहू लागलो. मग मला नामदेव दादांनी एका दवाखान्यात दाखल केले. तो दवाखाना नेमका कोणत्या आजारासाठी होता, हे मलाही समजले नाही. परंतु त्या डॉक्टरबरोबर नामदेव दादा हसत खेळत असायचे. त्यांचेबरोबर खूप वेळ बोलत बसायचे. त्या डॉक्टरने नामदेव दादांकडून भरपूर पैसा घेतला असावा. मला फक्त झोपेच्या गोळ्या आणि झोपेची इंजेक्शन दिले जात होते…”
एके दिवशी धाडस केलं आणि दवाखान्यातूनच पळून आलो. सरळ माझ्या चुलत मामाकडे म्हणजे दत्ता भाऊंकडं गेलो. मला सख्खा मामा नाही. दत्ता भाऊंनीच माझा सांभाळ केला. एक वर्ष त्यांनीच मला खाऊपिऊ घातलं. गेल्या दोन-चार महिन्यांपूर्वी माझ्या लक्षात आलं की, माझ्या नावची सगळी जमीन माझ्या सावत्र भावाच्या नावावर केली आहे. ज्या मालकाकडून जमीन घेतली होती, त्या मालकाला यांनी दोन लाख रुपये जास्तीचे दिले. त्याला सांगितलं, सातबारावर पहिले नाव लागले नाही तर, राहू दे. आपण नवीनच खरेदीपत्र करूया. माझ्या नावाचे खरेदी पत्र रद्द न करता त्यांनी सावत्र भावाच्या नावावर दुसरे खरेदीपत्र करून संपूर्ण जमीन ढापली आहे. एक एकर जमिनीसाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ केला साहेब.”
त्याने नवीन झालेले खरेदीपत्र, जुने खरेदीपत्र, त्या खरेदीपत्रांचे फेरफार ही सर्व कागदपत्रे नाटेकर साहेबांच्या पुढे ठेवली.
नाटेकर साहेबांनी सर्व कागदपत्रे पाहिली. मनातल्या मनात त्यांना चरकाच बसला. सत्संगामध्ये असणारा नामदेव दादा, सरळ मार्गी असणारा नामदेव दादा हे त्याचं खरं रूप होतं की, असा पाताळयंत्री कृत्य करणारा, धडधडीत खोटं बोलणारा हे खरं रुप? नामदेव दादांनी महसुली केस पाठीमागे घेण्याचे कारण वेगळेच होते. आज ते नाटेकर साहेबांच्या लक्षात आलं.
नाटेकर साहेबांनी विक्रमला सांगितले, “तुझ्या नावावरचे खरेदीपत्र रद्द न करता दुसरे खरेदीपत्र करणे म्हणजे भारतीय न्याय संहितामध्ये फसवणूक आहे. यासाठी सात वर्षे शिक्षा होऊ शकते. मात्र तुला तुझ्या आई-वडिलांच्या विरोधामध्ये पण तक्रार करावी लागेल.”
दत्ताभाऊ म्हणाले, “साहेब, नुसत्या आईवडिलांवर नव्हे तर, सावत्र भाऊ आणि ज्या मालकाने हे सर्व करून दिले, या सर्वजणांना अटक झाली पाहिजे. त्या बेताने केस करा.”
भारतीय न्यायसंहितेप्रमाणे अर्ज तयार करण्यात आला. एक अर्ज पोलीस निरीक्षक आणि दुसरा अर्ज जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे देण्यासाठी तयार करण्यात आला. दोन्ही अर्ज विक्रमकडे देत नाटेकर साहेब म्हणाले, “दोन्ही अर्ज पोलीस स्टेशनला दे. ही सर्व कागदपत्रे तिथे दाखव. निश्चितपणे पोलीस कारवाई करतील.”
दोन दिवसांनी पुन्हा विक्रम नाटेकर साहेबांच्या ऑफिसला आला. ऑफिसला गर्दी होती. काचेच्या केबिनबाहेर तो नंबर लावून बसला. वेळ सकाळची होती. नाटेकर साहेबांना चेंबरमधून बाहेरच्या बाकड्यावर बसलेला विक्रम दिसला. त्यांना वाटले बहुतेक अजून पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे विक्रम आला असावा.
परंतु थोड्या वेळाने विक्रमचा नंबर आल्यानंतर विक्रम म्हणाला, “साहेब आपण अर्ज दिला आणि पोलिसांनी त्या सर्वांना बोलावून घेतले. मलाही बोलवले होते. पोलीस स्टेशनला वडील माफी मागू लागले… गयावया करू लागले. जमीन मालक तर पुरता कोसळून गेला होता. त्यांनी ती एक एकर जमीन माझ्या नावावर परत केली. शिवाय ते तडजोड म्हणून घराचा हिस्सा माझ्या नावावर करत होते. मीच नकार दिला. जमिनीसाठी माझ्या आईने घाम गाळलाय. ती सोडायची नाही हे पक्के होते. जमिनीसाठी बापाने पैसा घातला असता तर, त्यातही मी मन दाखवले नसते, साहेब. असल्या हलकट माणसांचा मला एक छद्दाम सुद्धा नको आहे. आता मी माझ्या हिमतीवर घर बांधेन. त्याशिवाय माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. माझ्या नावाने केलेला खरेदीपत्राचा मसुदा तुम्हाला दाखवायला आलोय. पुन्हा काही चुका व्हायला नको म्हणून!”
नाटेकर साहेबांनी तो खरेदीपत्राचा दस्त घेतला. टेबलवर ठेवून पूर्ण वाचला. दस्ताकडे पाहून त्यांनी विक्रमच्या पाठीवर थाप मारली. म्हणाले, “तुझी नियत चांगली आहे. आईने कष्टाने मिळवलेल्या प्रॉपर्टीसाठी तू लढत राहिलास. आई गेल्यानंतर बापाने जे काही मिळवलं त्यामध्ये तू मन सुद्धा दाखवलं नाहीस. आयुष्यामध्ये खूप मोठा होशील.”
नाटेकर साहेबांचे आशीर्वाद घेऊन विक्रम त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पडला..!!!