शोभा भडके
भाग – 5
आज आरूचं (आराधना) कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचंय होतं, त्यामुळे ती राम आणि भावनासोबत ‘प्रमोदिनी फॅशन डिझायनर कॉलेज’मध्ये आली होती. रामने सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण केल्या… तोवर भावना आणि ती कॉलेज पाहात होत्या.
“चला, झालं काम निघूया आपण आता…” राम त्यांच्याजवळ येत म्हणाला.
“दादा, झालं एडमिशन माझं! कधीपासून यायचं कॉलेजला?” आरुने उत्सुकतेने विचारलं… तिचा आनंद ओसंडून वाहात होता. त्यासाठी कितीतरी गोड गोड बोलावं लागलं होतं… सकाळी लवकर उठून कामात मदत करायला लागली होती… चुलीवर भाकरी केल्या होत्या… एवढंच काय तर, शेतात भाऊ आणि दादाला पण मदत केली होती! उद्देश काय तर, एकच, आई आणि भाऊची मर्जी मिळवायची होती…
तसं पाहिलं तर दादा आहे मग, काही टेन्शन नाही! तो तिला म्हणेल ते द्यायचा… आई आणि भाऊ सुद्धा त्याला काही म्हणायचे नाहीत. पण तरी काही गोष्टींना आई आणि भाऊंचा विरोध असायचा आणि तिला मग ते नाही आवडायचं… त्यांच्या पुढे ती कधीच गेली नाही.
“हो… हो… किती तो आनंद झालाय एका मुलीला!” भावना तिला चिडवत म्हणाली.
“खरंच ताई, खूप खूश आहे. हे माझं स्वप्न होतं गं, इथे शहरात येऊन फॅशन डिझायनर कॉलेजमध्ये शिकायचं! त्यासाठी मी काय काय केलं तुला नाही माहिती…” आरु.
“हो, तिला नाही पण मला माहीत आहे, तू काय केलं ते! पण आता चला… आणि हो उद्यापासून तू कॉलेजमध्ये येऊ शकते. याच कॉलेजमध्ये माझ्या मित्राची बहीणही आहे. ती आज आली नाही वाटतं… उद्या आल्यावर तिची भेट घे. तुला तिचा नंबर देतो… तिलाही सांगितलं आहे, त्यामुळे ती येऊन भेटेल तुला!” राम.
“हो चला.”
दोघीही त्याच्यासोबत घरी जायला निघाल्या.
हेही वाचा – सियाबद्दलची ‘ती’ माहिती कळताच, शिव आणखी भडकला
“सर, रॉजर तुम्हाला भेटायला आला आहे, तो आता वेटिंग रूममध्ये आहे.” आकाश.
शिव ऑफिसमध्ये आल्यावर त्याच्या केबिनमध्ये येत आकाशने त्याला माहिती दिली.
“आधी ते सर म्हणणं बंद कर… किती वेळा सांगायचं तुला की, मला सर नको म्हणत जाऊ! बोलव त्या रॉजरला, एक इम्पॉर्टन्ट माहिती काढायला सांगितली होती त्याला.” शिवने त्याला सांगितलं.
“ओके सरss” तो सूर लावत म्हणाला आणि पळतच बाहेर गेला आणि शिवने हातातलं पेन त्याच्या दिशेने फेकून मारलं… पण ते दरवाजावर आपटून खाली पडले.
आकाश त्याचा खूप चांगला मित्र होता, त्यामुळे जेव्हा तो त्याला ‘सर’ म्हणायचा, ते त्याला अजिबात आवडायचं नाही… आणि आकाश त्याला त्रास देण्यासाठी मुद्दामून ‘सर’ म्हणायचा.
शिव फाइल उघडून काम करायला लागला, तेव्हढ्यात दारावर टकटक आवाज झाला आणि त्याबरोबर रॉजरचा आवाज आला…
“मे आय कम इन सर?” रॉजर.
“येस, कम इन.” शिवने फाइल बाजूला ठेवत त्याला आत यायला सांगितलं.
रॉजरच्या हातात एक फाइल होती, ती त्याने शिवसमोर टेबलवर ठेवली.
“हं… काम झाल?” शिवने त्याच्याकडे पाहात विचारलं.
“येस सर, या फाइलमध्ये त्या व्यक्तीच्या सगळ्या डिटेल्स आहेत… आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे सध्या ते याच शहरात आहेत!” रॉजरने त्याला सांगितलं.
“ओके. तू जाऊ शकतोस आता.” शिव.
तसं तो ‘बाय’ बोलून निघून गेला.
तो गेल्यानंतर शिवने आकाशला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि रॉजरने दिलेली फाइल उघडून त्यातली माहिती वाचू लागला…
तो जसजसं वाचत होता, तसतसा त्याचा चेहरा गंभीर होत होता… त्याचा तो गंभीर चेहरा पाहून आकाशने विचारलं,
“काय झालं शिव? कशाची फाईल आहे ती? तू एवढा सीरियस का वाटतो आहेस?”
शिवने सुस्कारा सोडत फाइल बंद केली आणि आकाशला बसायला सांगून त्याच्यासमोर ती फाइल धरली. आकाशने ती फाइल घेतली आणि उघडून बघितली. पण त्यातली माहिती वाचून आकाश गोंधळून गेला होता… कारण, त्याला नेमका काय विषय आहे, हेच ठाऊक नव्हतं!
त्याने फाइल खाली ठेऊन शिवकडे पाहिलं तर, तो कसल्या तरी विचारात होता…
“काय झालंय, शिव सांगशील का तू? कोण आहे हा राम शिंदे? आणि तू का त्याची माहिती काढली आहेस?” आकाशने न राहून विचारले.
“सांगतो पण त्याआधी त्याला कॉल करून मीटिंग फिक्स कर एखाद्या कॉफी शॉपमध्ये…” शिव.
आकाश पूर्णपणे गोंधळला होता… त्याला कळतच नव्हतं की, शिवचं नेमकं काय चाललंय ते!
शिवच्या ते लक्षात आले… तो म्हणाला, “तुला म्हटलं ना सांगतो म्हणून… जरा पेशन्स ठेव ना! जे सांगितलं ते आधी कर,” शिव जरबयुक्त आवाजात म्हणाला.
मग आकाशने पण जास्त काही न विचारता रामला कॉल केला आणि स्पीकरवर ठेवला. रिंग जात होती, पण कोणी उचलत नव्हतं… थोडा वेळ रिंग वाजली आणि फोन कट झाला. आकाशने शिव कडे पाहिलं तर, त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्याने खुणेनेच परत लावायला सांगितला. परत तेच… फोन वाजून कट झाला. आता शिवच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला.
ते पाहून आकाश म्हणाला, “अरे कुठल्या कामात असेल… नंतर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करू” आकाश.
“करत राहा जोवर फोन उचलत नाही तोवर…” शिव रागातच म्हणाला अन् लॅपटॉप उघडून त्याचं काम करू लागला.
“मी काय म्हणतो, मी माझ्या केबिनमध्ये जाऊन ट्राय करतो… बोलणं झालं की, तुला कळवतो,” आकाश.
“ओके… गोss … पण आजच मीटिंग फिक्स झाली पाहिजे. मग त्यासाठी काहीही कर! फोन उचलत नसेल तर, त्याच्या घरी जा…” शिव त्याला ऑर्डर देत म्हणाला.
“ओके,” म्हनून आकाश निघून गेला.
“आरू माझा फोन दे ना, मला भाऊंना कॉल करायचाय…” राम किचनमध्ये येत आरूला म्हणाला, पण समोरचा नजारा पाहून त्याचे शब्द घशातच अडकून पडले! सोबत त्याच्या चेहऱ्यावर राग पण पसरत चालला होता… कारण आरूने समोरच्या खिडकीवर मोबाइल तिला दिसेल असा ठेवला होता आणि युट्यूबवर नुडल्सची रेसिपी लावून ते बनवत होती. शेजारी आत्या डोक्याला हात लावून उभी होती… किचन ओट्यावर सर्वत्र भाज्यांचे काप पसरले होते…
“आरू काय केलंय हे, किती राडा करून ठेवलास? आणि मोबाइलमध्ये पाहून काय करतेयस? किती वेळ झाला मी माझा मोबाइल शोधतोय…” राम खिडकीतला मोबाइल उचलत म्हणाला.
“ए दाद्या, काय करतोयस? मी नुडल्स बनवतेय ना… दे इकडे तो मोबाईल.” आरू.
“आधी तो पसारा आवर…” तिला दम देत राम म्हणाला.
“बरं झाल बाबा तू आलास… तिला समजाव बाबा! त्या पवनला काही काम नाही, हिला काहिबाही बोलत राहतो आणि ही त्याचं ऐकून नको ते कारभार करतं बसते…” आत्या सुटकेचा श्वास सोडत म्हणाल्या. नाही म्हटलं तरी, त्यांचा किचनची वाईट अवस्था झाली होती. त्यांना असा राडा केलेला अजिबात आवडायचा नाही आणि याबाबतीत राम पण त्याच्या आत्यावर गेला होता. त्याला थोडाफार स्वयंपाक पण यायचा आणि ते करताना राडा होणार नाही, याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा… याच गोष्टीसाठी आरू त्याचा ओरडा खायची! राडा न घालता आरूला कुठलंच काम जमायचं नाही.
“आत्या, मी आवरते ना नंतर हा राडा! मला आधी त्या शेवया बनवू दे… आणि दादा तुला काय ओरडायचंय ते ओरड, पण मला आधी मोबाइल दे,” गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवत ती म्हणाली.
“ए नकटे, शेवया नाही नुडल्स म्हणतात त्याला आणि सकाळी सकाळी हेल्दी नाश्ता करायचा असतो,” पवन किचनमध्ये येत, तिला चिडवत म्हणाला. तिने त्याच्याकडे एकदम मारक्या म्हशीसारखं बघितलं… त्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
“तिला काय बोलतोयस? तुझ्यामुळेच झालं हे! काय गरज होती तुला रात्री, ‘चायनीज पदार्थ बनवायला तुला जमणार नाही’ असं तिला म्हणायची?” आत्या त्यालाच ओरडल्या.
“आई नंतर ओरड ना मला, ऑफिसला जायला वेळ होतोय आणि मी काय तिला सकाळी सकाळी बनवत बस, असं नव्हतो म्हणालो… आणि तसंही जे म्हणालो ना ते खरंच म्हणालो! तूच बघ… बनवलं तर काहीच नाही. पण नुसता राडा करून ठेवलाय…” पवन.
“ओ दाजी, तुम्ही नाss …” आरूला खूप राग येत होता त्याचा; ती त्याच्यासमोर येत त्याला अतिशय रागात बोट दाखवून बोलतच होती… रामने तिला अडवलं…
“अगं, आरू तो मस्करी करतोय. तू काय मनावर घेतेयस त्याचं?” राम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. कारण, ती आता रडायच्या घाईला आली होती… एक तर, ‘तिच्या भाषेतल्या शेवया’ बनवून झाल्या नव्हत्या, त्यावरून सगळा राडा झाला होता… त्यात भर म्हणून तिचा तिचा लाडका दादा पण ओरडला होता! आत्या पण तिच्यावर वैतागली होती.
“तू गप्प… बोलूच नको मला…” असं म्हणून आरू रडतच किचनमधून बाहेर निघून गेली!
“का तिला त्रास देत असतो तू? रडली ना आता ती तुझ्यामुळे!” आत्या पवनच्या पाठीत एक फटका मारून म्हणाल्या.
“आss आय… आई गं… लागलं ना! मी काय केलं आता?” पवन पाठ चोळत म्हणाला.
“आत्या, अगं नको म्हणू काही त्याला! तिला मी बघतो…” असं राम बाहेर जात म्हणाला.
पवनने ‘सुटलो’ म्हणून सुस्कारा सोडला आणि परत आईकडे पाहिलं…
“जा जाऊन बस, थोड्याच वेळात घेऊन येते नाश्ता…” त्या त्याला रागीट लूक देत आई म्हणाली. तो आईचा राग पाहून पवन गुपचूप बाहेर निघून गेला…
“आरू हे काय तू अजून तयार नाही झालीस! आज तू कॉलेजला जाणार होतीस ना… आणि हे काय तू रडत का आहेस?” भावनाने विचारलं. आपलं आवरून भावना बाहेर जात होती तर आरू रडत आत आली होती…
“नाही जायचंय… फोन आला होता दादाच्या मित्राचा, त्याची बहीण आजही कॉलेजला येणार नाही, तर दादा म्हणाला, ‘तू पण उद्याच जा’… जणू काय ती नाही आली तर, मी जायचंय नाही!” तिने रडतच गाल फुगवून सांगितलं आणि बिघडलेला अवतार नीट करायला बाथरूममध्ये शिरली.
हेही वाचा – सिया आणि रामची भेट घडविण्याचा शिवचा निर्धार!
“हिला काय झालं?” भावना तिच्याकडे गोंधळून पाहात म्हणाली. नक्कीच पवन पवन दादाने काही तरी केलं असणार… बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही, असं मनात बोलतच ती खोलीच्या बाहेर आली.
“भावूss आरू कुठंय?” रामने तिच्याकडे येत विचारलं.
“ती बाथरूममध्ये गेलीय… दादा काय झालं? ती रडत का होती?” भावना.
“काही नाही ते…” तो बोलतच होता की, त्याच्या हातातला फोन वाजला…
क्रमशः


