Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितशाल्मलीने महाराणी संघमित्राची तसबीर हाती घेताच…

शाल्मलीने महाराणी संघमित्राची तसबीर हाती घेताच…

भाग – 13

“अरे, यांना आताच कोणी सांगितलं, असं इथे येऊन जगभर ढिंढोरा पिटायला! त्यात आज पौर्णिमा… कोणत्याही वेळी काहीही होऊ शकतं!” मीडिया प्रतिनिधी चंदन नगरमध्ये आल्याचे समजताच डॉक्टर देवदत्त जरा चिडलेच होते.

“चला टीम आपल्याला निघायला हवं… आज आपल्या या मिशनचा शेवटचा दिवस… जे काही घडेल, त्या साऱ्याला सामोरं जाऊया परमेश्वर आणि महाराणी संघमित्रा आपल्या पाठीशी आहेत…” डॉक्टरांनी आपल्या टीमला सज्ज केले.

आपलं रोजच सामानसुमान उचलून सगळे तयार झाले. डॉक्टरांनी स्वतःसोबत ती भविष्यवाणीची गुंडाळीही घेऊन ठेवली होती. निघायच्या आधी शाल्मलीबरोबर त्यांनी थोडी चर्चा केली आणि सगळे बाहेर पडले.

वाळवंटात तर या न्यूजवाल्यांची जत्राच लागली होती. सगळे अगदी मसाला लावून न्यूज लाइव्ह कास्ट करत होते… “अरे मूर्खानों, आगीशी खेळताय… का उगा जीवावर संकट ओढवून घेताय? जा निघा ताबडतोब… कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं… डॉक्टर देवदत्त ओरडून सांगत होते… पण न्यूजवाल्यांवर त्याचा काहीच परिणाम नव्हता. त्यांना डॉक्टर जणू वेडे असावेत, असंच वाटत होतं. त्यातच काही जणांनी तर त्या भुयारात प्रवेशही केला… भीतीची एक थंड लहर अंगाला चाटून गेली… भुयारात उतरणे भाग होते… डॉक्टरांनी गावात निरोप पाठवून जनरेटर मागवायला सांगितलं. काही मुलं निरोप घेऊन बाहेर पडली… जमिनीत हलकेसे कंपन जाणवले…

डॉक्टरांनी आपल्या टीमला खूण करून खाली उतरायला सांगितलं… स्वतः ते शाल्मलीसोबत होतेच… श्लोक आणि शौनक यांनाही, ‘खबरदारी घ्या कोणत्याही मोहावर भाळू नका. जमलं तर सोबतच रहा…’ असं सांगत शेवटचं मार्गदर्शन डॉक्टरांनी केलं.

डॉक्टरांनी सर्वांना त्या सभागृहसदृश्य भागाकडे जायला सांगितलं… काहींना त्या मूर्ती उभ्या करून ठेवायला सुचवलं आणि ते सर्व सभागृहाकडे गेले… ते सर्व आपापल्या हातातल्या टॉर्चच्या उजेडात काळजीपूर्वक पुढे जात होते… सर्व जण सभागृहाच्या पायऱ्यांपाशी पोहचलेच होते… तोच अचानक सगळे टॉर्च बंद झाले… समोर अंधाराचं साम्राज्य पसरलं… कोणी येऊन डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही… सुई पडली तरी आवाज होईल अशी भयाण शांतता…

हेही वाचा – अलंकारीत स्त्रीची मूर्ती पाहून शौनक दचकलाच…

डॉक्टरांनी पटापट सगळ्यांना एकमेकांचे हात धरायला लावले, जेणेकरून कुणीतरी सोबत असल्याने प्रत्येकजण आश्वस्त राहील. घाबरू नका विश्वास ठेवा… डॉक्टर असे बोलतच होते, तो सर्व सभागृह प्रकाशाने उजळून निघालं… जणू विजेचे दिवेच लागले जावेत… सर्वत्र पाहिलं तर रोजच्या वावरातला तो महाल वाटत होता… काल पाहिलेली त्याची अवस्था जमिनीखालची इतक्या वर्षांची होती… जणू काही सेकंदात ती आधुनिक युगातली वाटायला लागली… सगळे एकमेकांकडे आश्चर्यानेच पहात होते!

छातीत धडधड वाढत होती… प्रकाशात अहंकाराची मूर्ती तेजस्वी भासत होती… काही सेकंदाचा वेळ जातो न जातो तोच ती पाषाण मूर्ती हळूहळू स्त्री देहात रूपांतरित होऊ लागली… सगळेच जागी थिजून गेले… डोळ्याच्या पापण्यादेखील मिटत नव्हत्या… मूर्ती पूर्ण स्त्री रुपात रूपांतरित झाली होती… नावाप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावर अहंकार दिसून येतच होता… नखशिखान्त हिऱ्यांनी मढलेली ती स्त्री गर्जली…

“माझ्या राज्यात माझ्या परवानगीशिवाय शिरायची तुम्ही हिम्मतच कशी केली? हे माझं साम्राज्य आहे… इथे मी जे ठरवते तेच होतं… का आलात तुम्ही इथे? संपत्तीच्या शोधतच ना?” ती बोलली आणि हसू लागली…

डॉक्टरांच्या टीम व्यतिरिक्त मीडियाचे प्रतिनिधीही आतापर्यंत तिथे पोहचली होते… ते वैभव पाहून त्यांचे डोळे दिपलेच होते… तर कोणी अहंकाराच्या रूपावर मोहित होत होतं…

अहंकारा जशी हसली… एका कोपऱ्यात हिऱ्यांची वृष्टी झाली… कुठून कसे कोणास ठाऊक पण पावसाच्या थेंबासारखे हिरे पडताना दिसत होते. इतर माणसं हावरटासारखी ते हिरे वेचायला पुढे गेली… ते हिरे वेचतच होते… तो अहंकाराने त्यांना नजरेच्या इशाऱ्यावर इथून तिथे, तिथून इथे फेकायला सुरुवात केली… शौनक आणि श्लोक त्यांना सावरायला पुढे सरसावले तर, त्यांच्याही सोबत तिने तेच केले… तिने आपला मोर्चा डॉक्टर देवदत्त आणि विश्वासरावांकडे वळवला अन् त्यांच्याशीही तेच केले… मात्र शाल्मलीवर तिचा काहीच प्रभाव पडला नाही…!

शौनक, डॉक्टर देवदत्त, श्लोक आणि विश्वासराव जखमी झालेले पाहून शाल्मली पुरती गोंधळून गेली… ‘आम्हाला काही करू नका, आम्ही सर्व इथून जातो,’ म्हणून ती गयावया करू लागली…

अहंकाराला चेवच चढला होता. तिने पुन्हा सर्वांना इथून तिथे, तिथून इथे असं फेकायला सुरुवात केली… आता कोणाची काही खैर नव्हती… नाहक जीवाशी खेळ चालला होता… तेवढ्यात शाल्मलीच्या डोक्यात विचार आला आणि तो कृतीत आणण्यासाठी ती धावली…

डॉक्टरांना धरून तिने खेचतच महाराणीच्या खोलीत नेले… विश्वासराव, शौनक आणि श्लोक हे देखील संधी मिळताच स्वत:ची सोडवणूक करत खोलीत गेले… मीडियावाल्याना तर जे काय चाललंय, ते पाहून सुधरतच नव्हतं… हिरे पाहून ते वेड्यासारखे करत होते… आणि त्यांची हाव पाहून अहंकाराला अजून चेव चढत होता!

आपली माणसं सुरक्षित आहेत हे पाहून शाल्मली निश्चित झाली… एक नजर तिने महाराणीच्या तसबिरीकडे पाहिले… आता ती वेळ आली होती… शाल्मलीलाच सर्व सूत्रं सांभाळायची होती… रक्तबंबाळ झालेल्या डॉक्टरांना, आपल्या बाबांना, शौनक आणि श्लोकला इथून बाहेर येऊ नका म्हणून तिने सुचविले… आणि ती बाहेर जाण्याकरिता वळली…

हेही वाचा – महाराणी संघमित्राची खोली तर दिसली…

बाहेर जाणाऱ्या शाल्मलीला अडवायला म्हणून विश्वासरावांनी हाक दिली… “शाल्मली बेटा थांब…”

डॉक्टरांनी विश्वासरावांना अडवलं… “नको थांबवू तिला जाऊ दे. ती आता थांबायची नाही… ती फक्त आता आपली शाल्मली उरली नाही… बघ तिच्याकडे… बघ तिचा अविर्भाव… महाराणीचा आशीर्वाद आहे तिच्या पाठी आज… ती जिंकून येणारच… फक्त तिला आशीर्वाद दे…”

श्लोक आणि शौनकही आश्चर्यचकित झाले होते… शाल्मलीचा चेहरा करारी आणि चालही एका योध्यासारखी होती… खोलीबाहेर जात तिने अहंकाराला आवाज दिला…

“थांब अहंकारा… बस कर तुझी विनाशलीला! हजारो वर्षं घालवलीस, पण तुझ्यात तसूभरही बदल नाही झाला…” शाल्मली महाराणी संघमित्राच्या खोली बाहेरूनच बोलत होती आणि अहंकारा पाठमोरी… काही केल्या ती वळेना म्हणून शाल्मलीच तिच्या पुढ्यात गेली…

“तू कालची पोर मला काय थांब सांगतेस… आजवर स्त्रीशी झुंजायची गरजच पडली नाही… कित्येक पुरुषांना या अहंकाराने धूळ चारली… तू काय चीज आहेस…” अहंकारा गर्जत होती.

आता दोघींची झुंज सुरू झाली… त्यांच्या त्या लढाईत त्या सभागृहाचे नुकसान होत होते अन् जमिनीची कंपनंही वाढत होती… काही लोक जे आत आले होते, ते हे दृश्य पाहून गांगरून गेले… काहींनी वर पळ काढला… वाऱ्यासारखी बातमी पसरली होती… वाळवंटा बाहेर जणू गाव लोटला होता… आतून बाहेर जाणारे लोक बाहेर थांबलेल्या काहही मीडियावाल्यांना पाहिलेला किस्सा सांगत होते… आणि विविध चॅनलवाले आपल्या चॅनलकरिता त्यांच्या मुलाखती घेत होते…

शाल्मलीत वीरश्री संचारली होती… पण हवा तो परिणाम काही येत नव्हता… खोलीतून डॉक्टर आणि विश्वासराव नजर ठेवून होतेच… वेळ दवडण्यात काहीच उपयोग नव्हता म्हणून डॉक्टारंनीच वेळेचं भान राखून पुढे पावलं टाकली…

त्यांनी शाल्मलीला आवाज दिला… शाल्मलीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, त्यांच्या हातात महाराणीची ती तसबीर होती… ती तसबीर त्यांनी शाल्मलीकडे फेकली… शाल्मलीने ती अलगद झेलली… संघमित्राची ती तसबीर पाहून अहंकारा कमालीची घाबरली, ती शाल्मलीपासून दूर पळू लागली… इथे बागेत असलेल्या त्या मुर्तीही वेगाने उलट सुलट फिरू लागल्या होत्या… अचानक एका क्षणी त्या एका रेषेत आल्या अन मोठा स्फोट होऊन त्यांचे तुकडे तुकडे झाले… इथे ही अहंकाराचे शरीर हळूहळू नाहीसे होत एका प्रकाश झोतात विलीन झाले…

अहंकाराचा नाश झाला होता… जमिनीतील हालचाल थंडावली होती आणि अचानक पावसाचा शिडकावा सुरू झाला… हजारो वर्षांनी तळमळणारी ती जमीन शांत होत होती…

वाळवंटात पडणाऱ्या पावसाने गावकऱ्यांना कळून चुकले चंदन नगर आता पूर्णपणे शापमुक्त झाले… एका मोठ्या शापाचा, एका विनाशाचा अंत झाला होता… आता सर्वजण भयमुक्त  होऊन एक एक करत त्या भुयारातून बाहेर पडले…

डॉक्टरांनी शाल्मलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला ‘सुखी हो’चा आशीर्वाद दिला… त्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.

विश्वासरावांनी तिला जवळ घेत, “मोठया संकटातून मुक्तता केलीस तू… मला तुझा अभिमान आहे,” म्हणत थोपटले. शौनकच्या नजरेत तिच्याविषयी वाढलेला आदर दिसतच होता… त्याने आणि श्लोकने तिला हात मिळवत थोपटले. सगळे बाहेर आल्यावर पाहतात तो संपूर्ण गाव हजर होता… सगळे या चौघांच्या पाया पडत होते…

“यापुढील काम आता पुरातत्व विभाग पाहील,” म्हणून डॉक्टरांनी सांगितले आणि ते विश्रांती करता वाड्यावर परतले…

काही वर्षांनंतर…

चंदन नगर एक पौराणिक उत्खननाचे स्थान म्हणून घोषित झाले… देशविदेशातून लोकं पुराण वास्तू पाहायला तेथे येऊ लागले…

समाप्त

प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य
प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!