ॲड. कृष्णा पाटील
दुपारची वेळ… टळटळीत ऊन पडलेलं… घामानं अंग आंबल्यालं असतं… वारा गप्पगार असतो… झाडाचं पानही हालत नाही…. गरमीने सगळ्यांची घालमेल चाललेली असते. कडक उन्हामुळे दुपारपासून शेतातली औतं बंद असतात. तापलेल्या सूर्याचा गोळा डोक्यावर आल्यावर शेतीची मेहनत जाग्यावर थांबलेली असते. सर्वांची जेवणीखाणी झालेली असतात. बैलं दावणीला धापा टाकीत उभी असतात. वैरणकाडी करून बापू जोत्यावर सावली बघून कलंडलेले असतात. घरातले बापय कोण सोप्यात तर कोण झाडाखालच्या गार सावलीत उघडं होऊन पडलेले असतात. ऐन उन्हाळ्यातील उकाड्याने सगळीच हैराण झालेली असतात.
सोप्यातच पत्र्याखाली आज्जी रंगीबेरंगी कपड्याच्या तुकड्यातुकड्यांची वाकाळ शिवत असते. तिच्या जोडीला तिच्याच वयाच्या दोन-चार बायका बसलेल्या असतात. पैऱ्याने वाकाळ शिवायला त्या आलेल्या असतात. चारी कोपऱ्यावर त्या चार वयस्कर बायका खाली मान घालून वाकाळ मांडीवर घेऊन शिवत असतात. अंगणात बी बेवळ्याचं वाळवान घातलेलं असतं. मला शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असते. बाजूलाच मी हुंदडत असतो. आज्जीनं मला काम सांगितलेलं असतं, ‘कोंबड्यावर ध्यान ठेव. शेरडू कोकराला येऊ देऊ नको. वाळवान खातील…’
अशाच एखाद्या भरदुपारी, धुतलेलं पांढरं धोतर आणि पांढरा अंगरखा घातलेला पण उन्हाने घामाजलेला कोणतरी परगावचा पाहुणा चालत चालत यायचा. पिशवीत एखादी केळाची फणी असायची. कधी कधी शेवग्याच्या हिरव्यागार लांबलचक शेंगा असायच्या. त्या काळात कुठलाच पाहुणा मोकळ्या हाताने यायचा नाही. आल्या आल्या तो पिशवी घरी द्यायचा. नंतर बाहेरच्या रांजणातलं तांबे, दोन तांबे थंडगार पाणी घ्यायचा. हातपाय खंगळायचा. चुळ भरायचा. मग सोप्यात टाकलेल्या पोत्यावर हुश्शss करीत बसायचा. आज्जी माचोळीवरच्या पोत्यातल्या देशी भुईमूगाच्या शेंगा आणि लालसर गुळाचा खडा पितळीतून द्यायची. चार गोष्टी बोलत बसायची. थोरला काय करतो? पुरगीचं औंदा बघताय काय? पाऊस पाणी आहे का? शेतातलं गिडगाप काढलं का? नांगरणी झाली का? असं बरंच काही बोललं जायचं. गुळशेंगा चवीनं खाऊन तांब्याभर पाणी पिऊन पाहुणा निघून जायचा.
आज्जी कायम पावण्यारावळ्यांच्या देखभालीत तरी असायची नाहीतर काहीतरी कामात तरी असायची. ती कधी एका जागी शांत एवढी बसायची नाही. कधी धोतराच्या ओल्या धडप्यावर भातुड्या घालायची. तर कधी ताटात, परातीत सांडगं घालायची. कधी पाटावरच्या शेवाळ्या करायची. तर कधी धोतरावर कुरुडया घालायची. भातुड्या घालताना भातुड्याचं पीठ ताटलीतनं मला प्यायला द्यायची. हातातलं काम करीत सर्वांवर वचक ठेवायची. घरातली सर्वजण आज्जीला टरकून असायची. पण माझा ती लई लाड करायची. माझं काय चुकलं तर माझीच कड घ्यायची. पाठीवर हात फिरवायची. कधी कधी गाडग्यातलं मीठ आणि बचकभर लालभडक वाळलेल्या मिरच्या घेऊन दृष्ट काढायची. चुलीत टाकलेल्या मिरच्या उदासल्या नाहीत तर, म्हणायची, “बघ, मिरच्या उदासल्या का? नको तिथं कशाला फिरायला जातोस? सगळ्याच लोकांच्या नजरा काय चांगल्या असत्यात का? ”
रोज संध्याकाळी घरातली सर्वजण एकत्र जेवायला बसायची. तिला मागं – पुढं झालेलं चालत नसे. सगळ्यांच्या ताटात वाढून झालं की, प्रत्येकाने आपापल्या ताटाभोवती पाण्याचा शितुडा फिरवायचा. आज्जी कसलातरी अभंग म्हणायची. पुन्हा सर्वांनी दोन्ही हात जोडून ताटाचं दर्शन घ्यायचं. “घ्या आता,” असं कुणीतरी म्हणलं की, जेवायला सुरुवात व्हायची.
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
एकदा मी सगळ्यांच्या अगोदर जेवलो. मग रात्री आज्जीनं मला जवळ घेतलं. म्हणाली, “हे बघ सगळ्यांनी पंगतीनं असावं. एकोप्यानं जेवावं. पंगतीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पडत नाही, तोपर्यंत तोंडात घास घालुनी…” तेव्हापासून मी एकटं जेवायचं टाळलं. सगळ्यांबरोबर जेवू लागलो. आजही बाहेर कुठं जेवायला गेलो तरी, पंगतीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटाकडं माझं लक्ष जातं.
एकदा दुपारी तांदळगावहून मामा आले होते. आज्जी थोडी झोपली होती. मामांनी येताना त्यांच्या मळ्यातली पिशवी भरून काट्याची काळीभोर वांगी आणली होती. आज्जी झोपली आहे म्हटल्यावर मला पिशवी मोकळी कर म्हणाले. मी पिशवी मोकळी करून परत दिली. मामांनी पिशवीची घडी करून काखेत मारली आणि ते निघून गेले. मामांनी आज्जीला उठवले नाही. तिची झोपमोड केली नाही.
आज्जी उठल्यावर तिला मामा येऊन गेल्याचं कळलं. मला विचारलं, “पिशवीतनं परत काय दिलंस का?” मी, “नाही” म्हणालो. आज्जी म्हणाली, “असं रिकाम्या हातानं कुणाला परत पाठवू नये. आपला धर्म देण्याचा आहे. नुसतं घेण्याचा नव्हं. दिल्यानं वाढतं. कमी होत नाही. शेतात पसाभार पेरलं तर सुपभर उगवतं. सुपभर पेरलं तर पोत्यानं उगवतं. पोत्यानं पेरलं तर खंडीनं उगवतं… दारात भिकारी येतो, त्याच्या झोळीत सुपातलं धान्य ओतलं की, तो पसाभर परत सुपात टाकतो. माहेरवाशिणीची ओटी तांदळानं भरली की, मुठभर तांदूळ ती परत देते. शेतातला वाटेकरी खळ्यावर येतो. त्याचा वाटा दिल्यावर तो मापटे दोन मापटे परत देतो. बैतं न्यायला बैतंकरी येतो. त्याला बैतं दिल्यावर तो दोन-चार मुठी धान्य परत देतो. आपली संस्कृती माघारी देण्याची आहे. नुसतं घेण्याची नाही…”
आज्जी असं काहीबाही बोलत असायची. फारसं कळत नव्हतं. पण कानाला गोड वाटायचं. तिच्या बोलण्यात वैभवशाली श्रीमंती आहे असं वाटायचं. तिचं एकूण जगणंच थंड, समाधानी, आतून टच्च भरलेल्या टपोऱ्या दाण्यांसारखं संपन्न आहे… शांत लयीत, एका सुरात चाललेल्या जुन्या काळाची तिला मिळालेलं देणं आहे, असं वाटायचं.
आज्जी मिठाला ‘साखर’ म्हणायची. दिवा विझवताना ‘दिवा वाढवला’ म्हणायची. ती बाहेर कुठं निघाली तर ‘येऊ का?’ म्हणायची. घरातला कोण बाहेर निघाला तर ‘कुठं निघाला’ म्हणायची नाही. ‘काय काम काढलंय?’ असं विचारायची. तीच सवय आम्हाला लावायची. तिचं व्यक्तिमत्त्वच चिरेबंदी वाड्यासारखं आखीव-रेखीव होतं. तिला वावगं असं खपायचं नाही.
एकदा शेजारचा बाळू मुंबईवरून गावी आलेला. आमच्या आज्जीला माझे सर्व मित्र आज्जीच म्हणायचे. बाळूही आज्जीच म्हणायचा. बाळुने काळा चष्मा, पांढरे कपडे अशी मुंबई स्टाईल केली होती. तो त्याच्या आई-बापापासून फटकून वागत होता. आई-बापाने त्याच्यासाठी खूप कष्ट केले होते. पण हा मुंबईला गेला, पैसा मिळवू लागला. मग आई-बापाची गरजच उरली नाही. आई-बापाचा वापर करून त्याने त्यांना वृद्धापकाळात वाऱ्यावर सोडले होते. आज्जीला त्याचा राग होताच. त्यात भरीस भर म्हणजे त्याचं लग्नही तिकडेच कुठंतरी झालेलं होतं. आज्जीला त्याच्या लग्नाची कुणकुण लागलेली. तिला त्याचं वागणं पटलं नव्हतं. आज्जी त्याला काही सांगणार एवढ्यात तोच म्हणाला, “आज्जे तुम्ही अडाणी होता. निरीक्षर होता. गरीब होता. तुमचा काळ वेगळा होता. आता आम्ही शिकलो सवरलो. आमचा काळ वेगळा आहे.” तशी आज्जी पुढं सरकली. त्याला पुढ्यात बसवलं आणि शांत आवाजात पण ठामपणे सांगायला लागली.
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
आज्जी म्हणाली, “हे बघ आम्ही आडाणी होतो. गरीबही होतो. पण ती गरिबी धट्टीकट्टी होती. तुमच्या लुळ्यापांगळ्या श्रीमंतीसारखी नव्हती. लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी कवाबी चांगली. एकच लुगडं आणि एकच धोतर यावर आम्ही संसार केला. पण ते लुगडं आणि धोतर वापरून फेकून दिलं नाही. ते लुगडं आणि धोतर फाटायला लागल्यावर त्याचं बाळुतं केलं. ते बाळुतं एक दोन बाळंतपणात वापरलं. बाळुतं वापरून वापरून फाटायला लागल्यावर त्या बाळुत्याची वाकाळ केली. वाकाळ बरीच वर्षे वापरली. पांघरायची वाकाळ फाटायला लागल्यावर हातरायला केली. ती बरीच वर्षे हातरली. हातरायची वाकाळ वापरून वापरून फाटायला लागल्यावर त्याच वाकळचा पोतेरा केला. त्या पोतेऱ्यानं प्रत्येक सणाला घराच्या साऱ्या भिंती सारवल्या. सारवण्यासाठी पोतेरा वर्षभर वापरला. पोतेरा वापरून वापरून बारीक झाल्यावर तोच पोतेरा रेच (मलमूत्र) काढण्यासाठी वापरला. पुढं तोच रेच शेतात नेऊन पुरला. एकच लुगडं आणि एकच धोतर पण आम्ही आयुष्यभर ते वापरलं. लुगड्या धोतराची नाळ आम्ही शेतात पुरली. ती काळ्या मातीशी जोडली. वापरलं आणि फेकून दिलं, असं आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही भरभरून जगलो. कोरडेपणा आम्हाला माहीत नाही. एकच लुगडं आणि एकाच धोतराचा आम्ही संसार केला. वापरा आणि फेकून द्या, हे दिवस आता आले. आम्ही मात्र लुगड्या-धोतराची शेवटची नाळ सुद्धा मातीशी जोडली. तुमची मातीशी नाळ तुटली म्हणून पोरं देशोधडीला लागली…”
बाळू काहीच बोलला नाही. त्याची बोलतीच बंद झाली.
एकदा शेजारच्या विठूनं शहरात जाऊन लग्न केलं. पण आज्जीला ते पटलं नाही. तिनं विठूला विचारलं, “लगीन केलंस काय रं?” तो “हो” म्हणाला. आज्जी म्हणाली, “जमाना बदलला. तुझा तरी काय दोष? पण आमच्या वेळी असं नव्हतं बाबा. एकट्यानंच जायाचं आणि लगीन करायचं. पूर्वी कसं तीन-तीन दिवस लगीन चालायचं. लग्नसराईत शेतीची कामं बंदच असायची. करंजाडाचा मांडव टाकायचा. पाणकी मंडळी असायची. दिवसभर खांद्यावर घागर घेऊन गावाबाहेरच्या हिरीतनं पाणी आणायचे. वाढपी मंडळी असायची. दिवसभर सगळ्यांना जेवणं वाढायची. वऱ्हाडाची बैलं यायची. त्यांची वैरणकाडी करायला आणखी गावकरी असायचे. पण ही सगळी कामं भावकी आणि मित्रमंडळी करायचे. कोणताही मोबदला न घेता! लगीन मालकानं काहीच करायचं नाही. प्रत्येकाला वाटायचं आपल्या घरचंच लगीन काढलंय. मांडवभर गावकऱ्यांची दोन-तीन दिवस लगबग चालायची… पण गेले ते दिवस! आता सगळंच रेडीमेड. मंगल कार्यालय, मंडप, आचारी कशालाच भावकी लागत नाही… मित्रांची गरज लागत नाही… स्वकीयांची उणीव भासत नाही… पत्रिका देतानाच सांगतात, नुसतं तांदूळ टाकायचं. लगेच जेवायचं. काहीही काम नाही. कामच नाही, त्यामुळं माणसांची गरज उरली नाही. माणसं एकमेकांपासून तुटली. कोरडेपणानं जगू लागली.”
विठू नुसतं ऐकून घेत होता. तो तरी काय बोलणार?
आज्जीचा त्यावेळचा काळ हा असा होता. मायाळू आणि उबदार… पावण्यारावळ्यांच्या भरभराटीचा… पाटातून झुळझुळ वाहणाऱ्या निळ्याशार, थंडगार निवाळसंख पाण्यासारखा… फसफसून ऊतू आलेल्या गायीच्या पांढऱ्याशुभ्र दूधासारखा… कुंभारी गाडग्यातल्या शुभ्र घट्ट दह्याच्या खवटीसारखा… हिरवीगार, कोवळी, लुसलुशीत पालवी फुटलेल्या झाडासारखा… मोत्यासारख्या दाण्यानं गच्च भरलेल्या कणगीसारखा… ओसंडून वाहणाऱ्या फेसाळलेल्या नदीसारखा..… पावसानंतर शेतात उठलेल्या हिरव्यागार, नाजूक गवतासारखा… सुगीच्या दिवसांत खळ्यावर टपोऱ्या धान्याने भरलेल्या राशीसारखा… पाडाला आलेल्या लालसर नारळाएवढ्या रसरशीत, साखर आंब्यांच्या आडीसारखा… भिंतीला उभा केलेल्या छातीएवढ्या रवीने मोठ्या मडक्यात घुसळण केलेल्या ताकासारखा… अंगणभर पसरलेल्या टिपूर चांदण्यात ‘चांदणं भोजन’ करताना झालेल्या पोटभर समाधानासारखा…
आज्जीला जाऊन आता बरीच वर्षे झाली… आज्जी गेली आणि आज्जीबरोबर तिचा काळही गेला!
कधीतरी मी आज्जीचा काळ सांधण्याचा प्रयत्न करतो… पण आतला कोरडेपणा जात नाही. माणसांची ताटातूट बघवत नाही. पैसाआडका असूनही कफल्लक वाटतं. भवताली श्रीमंती पण आतून दारिद्र्य… काहीतरी हरवल्याचं शल्य… हरवलेलं शोधण्याची जीवघेणी धडपड… तरीही आतला रितेपणा जात नाही…. मग पुन्हा ऊर फुटेपर्यंत पळणं… नेमकं काय हवंय? माहीत नाही… कुठपर्यंत पळायचं? माहीत नाही… का पळतोय? माहीत नाही… कुठं थांबायचं? माहीत नाही… यंत्राच्या चाकासारखं, निर्जीवपणे आयुष्यभर वेगाने फिरत राहणं… धड सुट्ट होता येत नाही… धड थांबता येत नाही!
आज राहून राहून वाटतं, आज्जीचा शांत लयीत जगण्याचा तो नैसर्गिक वैभवकाळ पुन्हा कधी येईल का? आपल्या जगण्यात त्यावेळचा मनाला उभारी देणारा थंडावा पुन्हा कधी निर्माण होईल का? त्यावेळची वैभवशाली, आश्वासक शांतता पुन्हा कधी येईल का? उबदार, मायाळू, समजूतदार काळ पुन्हा कधी निर्माण होईल का?
मोबाइल – 9372241368


