भाईजान
पुणे स्वारगेट बसस्थानकातील तरुणीवरील अतिप्रसंगाच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी ज्या पद्धतीने स्वारगेट स्थानकातील कोपरन-कोपरा धुंडाळला… स्वच्छता गृह, इतर ठिकाणं, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घाणीचे साम्रज्य, दारूच्या बाटल्या, प्रवाशांच्या आसन व्यवस्थेची दुरवस्था समोर आणली… तर राज्याचे मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अलीकडेच सिडको बसस्थानकाला भेट दिली, त्यांनीही अशीच सर्व ‘हिडन’ स्थळं शोधून, जिथे कोणी साधा फोटो घेत नाही, तिथे मीडियाचे लोक तोंडाला रुमाल लावून कॅमेरे घेऊन गेले. हे सर्व पाहून मी रिपोर्टिंग करत होतो ते दिवस आठवले! माझ्याकडे एसटी बीट होते.
तत्कालीन औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक येथे दर दोन-तीन दिवसांत जाणे व्हायचे. त्यावेळी नागरी सुविधांच्या दुरवस्थेच्या समस्यांवर बातम्या केल्या जात होत्या. त्यावर आगार प्रमुखांना प्रश्न विचारले जात होते. त्यांच्याकडून कधी थातूरमातूर तर, कधी ठोस उपाययोजनांचे उत्तर दिले जायचे. एसटीचे जनसंपर्क अधिकारी यांचे कार्यालय कार्तिकी हॉटेल शेजारील वर्कशॉपमध्ये तेव्हा होते… आता कुठे आहे? आहे की नाही? माहीत नाही!
एसटी महामंडळ काय-काय नवीन करत आहे, हे प्रत्येक भेटीत जनसंपर्क अधिकारी सांगायचे. एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष उत्तमराव खोब्रागडे होते. त्यांचे औरंगाबादला नियमित दौरे होत असत. जुन्या बस भंगारात काढण्याचे आणि नवीन बस आणण्याचा त्यांनी मोठा कार्यक्रम हाती घेतला होता. मुकुंदवाडी येथील एसटीच्या वर्कशॉपमध्येही खोब्रागडे साहेबांनी भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्या आम्हा पत्रकारांसमोर जाणून घेतल्या होत्या. कर्मचाऱ्यांसाठी कामाचे ठिकाण हे प्रसन्न असले पाहिजे, यावर त्यांचा भर होता. तेव्हाच कर्मचारी हे प्रवाशांना चांगली सेवा देऊ शकतात, असे ते सांगायचे.
परिवहन मंत्री, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक मुंबईतून काही घोषणा करायचे; त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत आहे की नाही, हे तेव्हाचे पत्रकार एसटी आगार आणि मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन तपासत असल्याचेही तेव्हा पाहिले. एसटी बीटवर अनेक चांगले पत्रकार होते. अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे हे बीट होते, तरीही ते सातत्याने बसस्थानक, आगार आणि वर्कशॉप येथे भेट देऊन बातम्या काढायचे. फक्त दिवाळीत एसटीला किती उत्पन्न झाले, या पत्रकावरच एसटी बीट काम करत नव्हते. एसटी गाड्यांची दुरवस्था, स्थानकावर खासगी गाड्यांची घुसखोरी, ट्रॅव्हल्सचे दलाल, विद्यार्थ्यांची पाससाठी लांबच लांब रांग, पासधारकांच्या समस्या, स्थानकातील पार्किंगची समस्या, बाकड्यांची अवस्था, पार्सल कार्यालय, एसटी कॅन्टिनमधील पदार्थांच्या गुणवत्तेवरही बातम्या झालेल्या पाहिल्या आहेत.
पाकिटमारी, एसटी स्थानकात सोडण्यात आलेले अर्भक, हरवलेली लहान मुलं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एसटीशी संबंधित बातम्या तेव्हा होत्या. मुक्कामी लालपरी गेली नाही तरी, बातमी होत असे. मात्र, आता हा नेता काय म्हणाला, त्यावर दुसऱ्याने काय प्रतिक्रिया दिली, त्याला पुन्हा कसे प्रत्युत्तर मिळाले… असे निरोप्याचेच काम पत्रकार करत आहेत.
दुसरीकडे सार्वजनिक सेवा या हळूहळू खासगी होत गेल्या. त्यातील सरकारी हस्तक्षेप कमी-कमी होत गेला. खासगी भागीदारीवरील बस एसटीमध्ये आल्या. चालक, वाहक यांची नियुक्ती कंत्राटदारांमार्फत होऊ लागली. एसटीतील आयटक, डाव्या, उजव्या कामगार संघटना, स्थानिक पक्षांच्या कामगार, चालक-वाहक संघटना आता जणू मोडीत निघाल्या आहेत. एसटीतील बातम्यांचे ‘सोर्स’ हे खासगीकरणानंतर कमीकमी होत गेल्याचे दिसते. असं बदलत गेलेलं एसटीचं रूप हे लालपरीच्या दुरवस्थेपर्यंत पोहचले आणि त्यातूनच खासगी प्रवासी वाहनांची वाढलेली मुजोरी, एसटी कर्मचारी, पोलीस, एसटी महामंडळ या सर्वांचे त्याकडे होत गेलेले दुर्लक्ष… यातूनच एसटीमध्ये काहीही केले तरी, काहीही फरक पडत नाही, असे गुन्हेगारांच्या लक्षात आले आणि स्वारगेट स्थानकात घडलेल्या घटनेपर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.
बदलत्या यंत्रणेसोबत नियमही बदलले पाहिजे होते. सर्वकाही खासगी करत असताना त्यावरील सरकारचे नियंत्रण सुटत चालले, हे ना एसटीच्या लक्षात आले ना प्रवाशांच्या. आता दोघेही तेल लावून काही दिवस बोंब मारतील आणि काही दिवसांनंतर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन होतील.