Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeअवांतरआशीर्वाद सर अन् Best Reader किताब

आशीर्वाद सर अन् Best Reader किताब

हिमाली मुदखेडकर

मल्हारराव कुलकर्णी ऊर्फ आप्पा हे नव्वदच्या दशकातील नांदेडच्या सिडक-हडको भागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व होते. व्यवसायाने शिक्षक असणारे आप्पा नंतर हडको येथे रहावयास आले… ते, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि दोन नातवंडे असा त्यांचा परिवार… एकास एक जोडून अशी त्या स्कीमची दोन घरे त्यांनी घेतली होती. दोन बाजूंनी रस्ता असणारे कोपर्‍यावरचे घर मिळाल्यामुळे त्यांना इतर घरांपेक्षा जरा जास्त मोकळी जागा मिळाली होती… ज्यात त्यांनी एक मोठा हॉल बांधून घेतला होता. या हॉलमध्ये त्यांची इंग्लिश विषयाची शिकवणी चालत असे. त्यांच्या या टूमदार छोटेखानी घराला नाव होते ‘आशीर्वाद’… नावाप्रमाणेच हे घर तिथे येणार्‍या प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचे खरे!

इयत्ता पाचवीपासून इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे इथे इंग्रजी शिकवणीचे वर्ग चालत आणि या वर्गांची फी अतिशय माफक… म्हणजे केवळ 15 रुपये प्रति महिना, एवढीच असे! पण त्यासाठी त्यांनी कधीही कुणाकडे तगादा लावला नाही.

सिडको हडको हा भाग म्हणजे मध्यमवर्गीय वस्तीचाच. इथे बहुतांश टेक्सकॉम, सीप्टा यासारख्या कंपन्यांमध्ये काम करणारे आणि कमी किमतीत परवडते म्हणून घरे घेतलेले लोक राहात होते. त्यातच 1991-92…च्या आसपास टेक्सकॉम कंपनी डबघाईला आली… जवळ जवळ अर्ध्या हडकोने नोकर्‍या गमावल्या… या काळात ज्या घरात दोघे कमावते होते, त्यांचे भागले… पण ज्या घरात एकच कमावता माणूस, कर्ता पुरुष होता… त्यांची फार बिकट परिस्थिती झाली.

सरकारी शाळांमधून सार्वभौम मुले शिकत होती… आणि अगदीच माफक फी होती म्हणून कसेबसे निभावले जात होते. अशा या परिस्थितील हडकोमध्ये आप्पांनी इंग्रजी शिकवणीचे वर्ग सुरू केले… आणि ते सर्वामध्ये ‘आशीर्वाद सर’ या नावाने प्रसिद्ध झाले!

आपल्या कथाकथनात चितळे मास्तरांबद्दल सांगताना पु. ल. देशपांडे म्हणतात ना… ‘पोरगं चितळे मास्तरांच्या हाती दिलं की, मायबाप निश्चिंत होत असत…’ तसेच मुलांना आशीर्वाद सरांकडे एकदा शिकवणीला पाठवायला सुरुवात झाली की, हडकोमधील पालक बिनघोर होत असत… आप्पांचा महिमा होताच तसा!

हेही वाचा – प्रेमाची पखरण करणारे ऋणानुबंध…

अभ्यासात गती नसणार्‍या कमकुवत विद्यार्थ्यांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. सर्व मुलांना या विषयाची गोडी वाटावी, यासाठी ते नेहमी नवनवीन कल्पना शोधून काढत. नवीन भाषा…, त्यातून नवीन लिपी… वाचायला सर्वानाच अवघड जाई. मग मुलांनी पुन्हा पुन्हा वाचनाचा सराव करावा, यासाठी ते वर्गात वाचन स्पर्धा घेत. धडा शिकवून झाला की, दुसर्‍या दिवशी ही स्पर्धा असे. न अडखळता सुसंगत वाचणार्‍यास Best Reader हा किताब मिळे! त्याचे नाव बोर्डावर ते लिहीत.

आपल्याला आज best reader मिळावे, यासाठी आम्ही तो धडा सहा-सात वेळा किमान वाचत असू… इतक्यांदा वाचून तो धडा जवळ जवळ मुखोद्गत होत असे. सायंकाळच्या वर्गात आप्पांच्या हातून आपले नाव फळ्यावर लिहिले जाणे म्हणजे आमच्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळवण्या सारखे होते…

इंग्रजी व्याकरण शिकवावे तर ते आप्पांनीच… फॉर्म्स ऑफ़ व्हर्ब्स…active and passive voice… Direct and indirect speech… त्यांनी असे काही सोपे करून शिकवले की, इतक्या वर्षांनंतर आजही ते जसेच्या तसे लक्षात आहे!

इयत्ता पाचवीपासूनच ते फॉर्म्स ऑफ व्हर्ब्ससाठी एक वेगळी दोनशे पानी वही करायला लावत… ही वही इयत्ता दहावीपर्यंत पुढे ज्याची त्याने सांभाळायची असे… त्यात alphabetical order प्रमाणे ते अभ्यासक्रमात असणारे व्हर्ब्स लिहायला लावत… वर्ष बदलले की, त्यात नवीन व्हर्ब्सची भर पडे… असे करत करत दहावीच्या वर्षात पाऊल ठेवेपर्यंत विद्यार्थ्याची स्वतःची फॉर्म्स ऑफ़ व्हर्ब्सची डिक्शनरी तयार होत असे… आणि या पाच वर्षांत अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून ते सगळे इतक्यांदा घोकून घेतले जाई की, सर्वाना सर्व व्हर्ब्स पाठ होऊन जात! Active चे passive करताना कुठे काय बदल होतात याचा फॉर्म्युला त्यांनी इतका परफेक्ट डोक्यात बसवला होता की, मूर्खातला मूर्ख विद्यार्थीही चुकूच नये!

अभ्यासाबाबत काटेकोर असणारे आप्पा विद्यार्थ्यांशी केवळ शालेय अभ्यासापुरते मर्यादित नव्हते. तर सर्वांगीण विकास करण्याकडेच त्यांचा कल होता. त्यासाठी ते पहाटेच्या वेळात व्यायामाचे वर्ग घेत. या वर्गांमधून सूर्यनमस्कार आणि वेगवेगळी योगासने ते करून घेत. मुख्य म्हणजे, हा व्यायामवर्ग निःशुल्क असे! आज अवतीभवती लोकाना भरमसाठ फी भरून जिमला, योगा क्लासला जाताना मी पाहाते, तेव्हा आप्पांनी चांगल्या सवयींच्या स्वरूपात केवढा मोठा आशीर्वाद दिलाय, हे मनोमन जाणवते…

पहाटे साडेपाच वाजता आप्पा फेरी मारायला निघत… जाता जाता वाटेत लागणार्‍या घरा बाहेरून मुलांना आवाज देऊन, उठवून, सोबत घेत पुढे पुढे जात… एक मोठा राऊंड मारून त्यांच्या घरापर्यंत पोहोचेस्तोवर बरीच मुले गोळा झालेली असत…

त्यानंतर सूर्यनमस्काराची प्रार्थना सुरू होई… धीरगंभीर आवाजात पहाटेच्या वेळी ती प्रार्थना मनावर उमटून जाई… आप्पा हात जोडून डोळे, मिटून प्रार्थना सुरू करत… ‘ध्येयसदा सवित्रमंडल मध्यवर्ती…’

…आणि आम्ही सारे तल्लीन होऊन त्यांच्या सुरात सूर मिसळत असू. सूर्याची बारा नावे क्रमाने लक्षात ठेवण्याचे एक खूप छान तंत्र त्यांनी तेव्हा शिकवले होते… ज्याला आज आपण acronym असे म्हणतो.

दर रविवार हा आम्हा मुलांसाठी मजेदार असायचा. आप्पा पहाटेच आम्हा सर्वाना लांबवर धावायला घेऊन जात. ही मॅरेथॉन आमची फार आवडीची असे! लहान मुलांवर संस्कार करण्यासोबतच समाजकार्यही आप्पा करत. आजूबाजूच्या कोणाकडेही काही संकट परिस्थिती असेल तर आप्पा तिथे मदतीस कायम धावून जात…

हेही वाचा – पुण्याचे प्राचीन सोमेश्वर मंदिर…

एका गोष्टीचे कोडे मात्र मला सुटले नाही… आप्पा दहावीची शिकवणी का घेत नसत? कुणास ठावूक! इतकी वर्षं त्यांच्याकडून शिकण्याची सवय झाल्याने दहावीतही सायंकाळी पावले आपसूक त्यांच्या घराकडेच वळत… नववीपर्यंत ते व्याकरण इतके पक्के करून घेत की, दहावीत इंग्रजी फार सोप्पे वाटू लागे!

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि मी पेढे घेऊन त्यांच्या घरी गेले… तेव्हा पाठ थोपटून शाबासकी देत म्हणाले, “तू माझी शहाणी आणि हुशार विद्यार्थिनी आहेस… खूप मोठी हो…”

पण खरंच आप्पा… बालवयात तुम्ही केलेले संस्कार अंगोपांगी रुजले… तुम्ही लावलेले वळण, चांगल्या सवयी… आमचे आयुष्य समृद्ध करून गेल्या! आज आपल्यापेक्षाही लहान वयाच्या लोकांचे गुडघे कुरकुरताना, बेढब होताना पाहिले की, तुम्ही शिकवलेल्या मच्छिंद्रासनाचे, सर्वागासनाचे महत्त्व कळते… क्लासमध्ये शिकवताना मी माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुमचे फॉर्म्युले सांगते… तेव्हा तेही अचंबित होऊन विचारतात, “मॅडम, हा फॉर्म्युला कुठून आला… पुस्तकात तर नाहीयेत…”

तुमच्या सारखे हाडाचे शिक्षक, मार्गदर्शक, गुरूवर्य आम्हाला लाभले, हे आमचं फार मोठं भाग्य! आयुष्य त्याच्या गतीनं खूप पुढे निघून आलं… वयाची चाळीशी पार करेपर्यंत अनेक उपाधी मिळवल्या… खूप काही अचिव्ह केलं… पण कोणत्याच अवॉर्डला तुमच्या Best Readerची सर नाही…

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हा लेख वाचताना मन अगदी भारावून गेलं — जणू लहानपणीच्या त्या गोड आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. शिक्षकांपेक्षा मोठं देणं या जगात दुसरं नाही, आणि आम्हाला इंग्रजीचे कुलकर्णी सर लाभले हे खरंच आमचं भाग्य. त्यांनी फक्त इंग्रजी शिकवलं नाही, तर आयुष्य घडवणारं संस्कार, मूल्यं आणि शिस्त आमच्या मनात रुजवली.

    फास्ट रीडिंग या लेखातून त्यांच्या अद्भुत कार्याची आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची सुंदर आठवण करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद — शब्द अपुरे पडतात या भावनेचं वर्णन करायला!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!