शोभा भडके
भाग – 9
सुधा सियाजवळ जाऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला… तसं ती उठून आईच्या मांडीवर डोक ठेऊन झोपली आणि परत रडायला लागली…
“शांत हो बाळा… मला कळतंय बाळा, तुला किती त्रास होतोय ते… मी एक आई म्हणून कमी पाडले गं, मला माफ कर…” – सुधा.
“आई असं नको गं म्हणू! तुझी काहीच चूक नाही. हे माझं नशीबच होतं, त्यात कोणाचा दोष नाही… पण आई आता मला माझ्या मनासारखं जगायचंय गं! मला माहीत आहे शिव जे काही करतोय ते माझ्यासाठीच; पण आई… ” – सिया.
“शुss काही बोलू नकोस… आणि कसलाच विचार करू नकोस! नशीब म्हणतेस ना तर, त्या नशिबावरच सोडून दे सगळं…”
इकडे आरू (आराधना) घरी आली. दिवस मावळायला आला होता… गाई-म्हशींना शेतातून घरी आणून गोठ्यात बांधण्याचं काम भाऊ करत होते. कालपासून जो काही तमाशा झाला होता, त्यामुळे घरी तसं वातावरण गंभीर होतं. पण रोजची काम बंद करून चालणार नव्हतं. राम आणि पवन शेतातच होते. घरात आत्या आणि तिची आई दिवाबत्ती करून संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. चूल पेटवून त्यावर चहा ठेवला होता.
आई तशी अजून ही आरूवर नाराजच होती! भलेही तिची चूक नव्हती, पण जर ती अशी शाळा-कॉलेजला बाहेरगावी गेली नसती तर, असं काही झालंच नसतं… अस त्यांना वाटत होतं. तिचा हट्टी स्वभाव या सगळ्याला जबाबदार आहे… दुनिया कशी वाईट आहे, हे तिला कळत नाही, असंच त्या म्हणायच्या नेहमी तिला…
गावात जी नाचक्की झाली, त्यामुळे भाऊ आज दारू प्यायले होते. पण तरीही आपलं काम मात्र व्यवस्थित करत होते. त्यात त्यांनी ठरवून टाकलं होतं, आलेलं स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही आणि त्यासाठी रामला कसंही करून तयार करायचं! म्हणून ते दारू पिऊनही शांततेत त्यांचं त्यांचं काम करत होते.
रात्री पवन आणि राम पण घरी आले. आई आणि आत्याने जेवणाची तयारी केली होती. सगळे बाहेर पटांगणात जेवायला बसले… रामची अजिबात इच्छा नव्हती, पण आरूने त्याला जबरदस्तीने जेवायला बसवलं होतं… तसं अजून पण सगळं कसं गंभीर वातावरणच होतं सगळं… त्याच वातावरणात सगळ्यांनी जेवण केलं, एकदम शांततेत!
सगळं आवरून थोडावेळ बाहेरच हवेला बसले सगळे… आत्या आणि पवन पण खूप दिवसांनी गावी आले होते; त्यामुळे त्या शहरातल्या गजबजीतून मोकळ्या या वातावरणात छान वाटत होतं. पण जे काही घडलं होतं, त्यामुळे टेन्शन तर होतंच… गावात हा विषय सहजासहजी मिटणारा नव्हताच, पण काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता…
रामने तर ठरवलं होतं, तिला उद्याच पुण्याला पाठवून द्यायचं… तसंही तिचं ॲडमिशन झालं होतं तिथं! कोणी काहीही म्हणू देत, पण तिचं लग्न एवढ्या लावकर नाही करून द्यायचं… आणि आशा फालतू कारणामुळे तर अजिबात नाही! तसाही तो नेहमीच आरूसाठी आईसोबत भांडत आला होता. पण आता भाऊंसोबत भांडावं लागणार होतं… ते जरा कठीण होतं. तो आरूसाठी काहीही करू शकत होता… आणि यात तर तिची काहीही चूक नाही. मग जी चूक तिने केलीच नाही, त्याची शिक्षा तिला अजिबात होऊ देणार नवहता.
तर, एकीकडे भाऊ कुठल्याही परिस्थितीत तिचं लग्न त्या मुलासोबत लावून देणार होते. त्याचबरोबर रामचं पण लग्न होणार होतं. यापूर्वी रामला आलेली एकदोन स्थळं गेली होती, ज्यासाठी ते स्वतःला जबाबदार मानत होते, वरून लोकांचे बोलणेही ऐकले होते… “रामचं काही लग्न होत नाही. तुझी दारू सुटणार नाही आणि त्याचं लग्न होणार नाही…”
…आणि आता आरूसोबत हे असं झालं. त्यामुळे आणखीनच कठीण! त्यात चालून आलेलं स्थळ, तेही दोघांसाठी होतं! त्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन्ही मुलांची लग्नं लावून द्यायची होती.
“भाऊ… दादा… मला काहीतरी बोलायचंय तुम्हा दोघांबरोबर…” आरू, तिथंच बाजेवर बसत म्हणाली.
“आता अजून काय बोलायचंय तुला? एवढा सगळा तमाशा झाला, त्याने पोट भरलं नाही का तुझं? ते काही नाही, आता तू कुटं पुण्याबिण्याला जाणार नाहीस! गेली तर लगीन करूनच जाणार… नवऱ्याच्या घरी गेल्यावर शिक तुला काय शिकायचंय ते…” तिची आई रागारागात म्हणाली. त्यांना वाटलं होतं, ती तिच्या शिक्षणासाठी पुण्याला परत जायचं म्हणेल, कारण आजपर्यंत काहीही झालं तरी तिनं शिक्षणाचा हट्ट सोडला नव्हता.
“आई काय बोलतेस? तिचं ॲडमिशन…” राम त्यांना बोलतच होता, तोच… “भाऊ, मी लग्नाला तयार आहे… सकाळी आलेल्या त्या मुलासोबत!” असं म्हणत आरू उठून आत निघून गेली. पण इकडे मागे सगळे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्ध होऊन पाहात राहिले.
राम आणि पवनला तर, विश्वास बसेना की, ती हेच बोलून गेली ना की, आपणच काहीतरी चुकीचं ऐकलं! भाऊ मात्र खूश झाले. आत्या जरा नाराज झाली. नाही म्हटलं तरी त्यांच्या मनात होतं आरूला सून करून घ्यायचं… सकाळी आलेल्या स्थळासाठी आरूच तयार होणार नाही आणि राम पण ते होऊ देणार नाही, याची खात्री होती तिला. पण आता आरूनेच हो म्हटलं होतं…
आरू आत गेल्यावर रामने आई-भाऊंवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि आरूशी बोलायला आत गेला. त्याच्यापाठोपाठ पवन पण जात होता, तोच त्याचा फोन वाजला. फोनवरचं नाव पाहून पावनने आत जाणाऱ्या रामकडे पाहिलं आणि फोन रिसिव्ह केला…
हेही वाचा – शिवचे म्हणणे ऐकून सारेच अवाक् झाले!
“कले, शारदे झोपा आता लई येळ झाला आता, उद्या बघू पुढे कसं करायचं ते…” भाऊ खुशीत म्हणाले आणि तिथेच बाजेवर आडवे झाले.
कलावती पण खूश झाल्या होत्या, आपली पोरगी लग्नाला तयार झाली म्हणून! शारदा ताईला तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. हे सगळं काळावर सोडून द्यायचं तिनं ठरवलं.
“आरू काय बोललीस तू बाहेर? काय विचारतोय मी? बोल ना…” राम तिला रागात म्हणाला. तिने मात्र त्याच्यापासून नजर चुकवत तोंड फिरवून घेतलं. तसं त्याला जास्तच राग आला… “आरू एवढी मोठी झालीस का तू, की मला न विचारता निर्णय घेऊन मोकळी झालीस?” त्याने तिला दंडाला धरून स्वतःकडे वळवत विचारलं.
“दादा…” एवढंच म्हणून तिने त्याला मिठी मारली. तिच्या असं गोड आर्जवामुळे त्याचाही राग निवळला.
“आरू…” तो बोलतच होता की, त्याला तोडत ती म्हणाली, “आजपर्यंत तू माझा प्रत्येक हट्ट पुरवलास… माझा हाही हट्ट पुरव ना दादा… शेवटचा! यापुढे मी कधीच कुठला हट्ट करणार नाही… प्लीज दादा…” आरू.
“आरू अगं…”
“दादा प्लीज… मला करायचंय लग्न. तसं पण माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्नं झालीयत… स्नेहाचं पण जमलंय ना… मग माझं झालं तर काय बिघडतं! मला आई आणि भाऊंना अजून त्रास नाही द्यायचाय… आजपर्यंत भाऊंनी कशासाठीच अडवलं नाही, सगळं तुझ्यावर सोडलं… तुला माहिती आहे ना त्यांच्यासाठी त्यांची इज्जत सगळ्यात महत्त्वाची आहे! …आणि आई बरोबर म्हणती, कुठं तरी या सगळ्याला माझा हट्टी आणि कोणावर पण लगेच विश्वास ठेवणारा स्वभाव कारणीभूत आहे, दादा… या सगळ्यामुळे खरंच गावात खूप बद्नामी झाली… आई आणि भाऊंना खूप त्रास होत असेल… दादा करशील ना तू पण लग्न?” ती त्याच्याकडे आशेने पाहात म्हणाली.
तो काय बोलणार होता? शेवटी बहिणीचा प्रत्येक हट्ट पुरवत आला होता आजपर्यंत… मग आज कसा माघार घेणार होता. डोळे भरून आले होते त्याचे… त्याने तिला मिठीत घेतलं.
“माझी आरू इतकी मोठी आणि समजूतदार कधी झाली कळलंच नाही!” तिला कुरवाळत म्हणाला. त्यावर तिने रडतच हसून घेतलं.
फोन कॉल संपवून आलेला पवन पण त्यांना पाहून भावूक झाला.
“खरंच की दादा, आपली नकटी मोठी झाली की…!” पवन जवळ येत तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला.
“ओ दाजी… नकटी म्हणायचं नाही हां मला!” ती लटका राग दाखवत नाक वर ओढत म्हणाली.
“म्हणणार मी! काय करणार? तुझं लग्न झाल्यावर पण म्हणणार….” तिचं नाक ओढत म्हणाला. या दोघांची परत तू तू मैं मैं सुरू झालं. पण राम मात्र विचारात गढून गेला…
शिव त्याच्या रूममध्ये बनवलेल्या जिममध्ये पंचिंग बॅगवर आपला सगळा राग काढत होता… बनियान आणि ट्रॅक पँटवर होता तो, घामाने पूर्ण शरीर भिजलं होतं त्याचं…
नेमका राग कशाच येतोय, हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.. सियाने लग्नाला नकार दिला याचा की, एका अनोळखी मुलीसोबत लग्नाला होकार देऊन आला याचा?
“उव… उव…” असा आवाज त्याच्या कानी पडला आणि त्याचे हात जागेवरच थांबले… आणि त्याने पडदे बाजूला सारून खाली गार्डनमध्ये पाहिलं तर तिथे कुत्र्याचं पिल्लू भुंकत होतं, त्याच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला बांधून ठेवलं होतं… ते पिल्लू रस्त्यावरच मोकाट असल्यामुळे, त्याला असं बांधून राहायची सवय नसल्यामुळे ते सुटण्यासाठी धरपड करत होतं… शिवने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला आठवली ती, गुलाबी ड्रेसमधली मुलगी! तीच तर त्याच्या हातात देऊन गेली होती त्या पिल्लाला… दोनच तर दिवस झाले होते…
त्याने दीर्घ श्वास घेत डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर आला तिचा तो निरागस चेहरा… आपोआपच शिवचा राग शांत होऊ लागला. नुसत्या तिच्या आठवणीने त्याच मन शांत झालं होतं आणि चेहऱ्यावर स्माईल आली…
त्याने टॉवेलने घाम पुसला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला.
तो फ्रेश होऊन खाली आला तर सुधा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. सगळे डायनिंग चेअरवर बसले होते… वातावरण तसं शांतंच होतं. सिया पण आली होती खाली जेवायला… शिवची नजर तिच्यावर गेली… ती शांतपणे ताटात जेवण वाढून घेत होती.
“अरे शिव, ये तू पण जेवून घे. मी आता तुलाच बोलवणार होते…” सुधा म्हणल्या.
तो पण येऊन जेवायला बसला… कोणीच कोणाशी बोलत नव्हतं… शांततेत सगळे जेवत होते. जेवण झालं तसं सिया वर निघून गेली… सगळ्यांची जेवणं होत आली होती. शिवने पण त्याचं अवरलं आणि उठून जात होता, तोच आजी म्हणाल्या, “शिव कधी जायचं त्या लोकांकडे लग्नाची बोलणी करायला? लवकरात लवकर उरकून घेऊ… तसंही सियाचं हे दुसरं लग्न आहे, पद्धतीने उरकून टाकू!”
हेही वाचा – …अन् सिया बाबा आणि शिववर संतापली!
त्यांच्या अशा बोलण्याचा रागच आला त्याला… “उरकून टाकू म्हणजे? …आणि काय दुसरं लग्न लावलंयस? तिच्या सुखासाठी हा लग्नाचा घाट घातला आहे मी, जबदारी झटकायची म्हणून नाही! यावेळी जे काही होईल ते तिच्या मनानुसारच! त्यासाठी तिला फोर्स करणार नाही कोणी… ..” तो रागात म्हणाला आणि बाहेर निघून गेला.
इकडे आरू अंथरुणावर पडून विचार करत होती, “काय झालं हे? कोण होता तो मुलगा? मी तर ओळखत पण नाही! कधी पाहिलंय का, तेही आठवत नाही… ही तुझी वाईट सवय आहे आरू, कोणाचा चेहराच लक्षात राहात नाही! कसा राहील .. कधी कोणाच्या तोंडाकडे बघितलंच नाही तर काय करणार? कोणाकडे सहज बघितलं तरी लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात आपल्या इकडे! म्हणून नाही बघत मी कोणाकडे निरखून. पण त्यामुळेच झाली ना ही बोंब. आठवला असता तर? कुठे भेटला? कोण आहे? काय दुश्मनी आहे त्याची माझ्यासोबत? विचारल असतं त्याला. पण दादाने शोधलंच असेल ना… दादा शांत बसणार नाही. पण त्याने काय होणार? जे झाल ते थोडंच बदलणार आहे! लग्न तर होणार ना… पण चांगली गोष्ट ही की दादाचं पण लग्न होणार आणि त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्यासोबतच होणार! किती छान ना… पण ते असे कसे अचानक आले आणि लग्न करणार म्हणून सांगून गेले! त्यांनीच तर हे सगळ घडवून तर आणलं नसेल ना? दादाने त्यांच्या बहिणीला फसवलं म्हणून तर बदला घेण्यासाठी हे सगळ केल नसेल? मी बघितलंय ना टीव्ही सीरियलमध्ये असंच होतं… पण दादा का फसवेल त्यांच्या बहिणीला? त्याचं तर प्रेम होतं आणि माझा दादा असं कधीच करणार नाही… मला खरं काय, काहीच माहिती नाही आणि कसं कळणार? आणि सगळयात मोठा प्रश्न… त्या प्रश्नाचा तर विचारच केला नाहीऍ पण करावा लागेल बाबा… डोकं दुखायला लागलं माझं… जाऊदे सोड, बघू उद्या काय होइल ते… आत्ता झोपते मी ” ती विचार करतच कधी तरी झोपून गेली ..
उद्याचा दिवस काय घेऊन येणारा होता देवच जाणे…
क्रमशः
एक भाऊ आपल्या बहिणीच लग्न लाऊन देण्यासाठी काहीही करायला तयार आहे तर.. एक भाऊ आपल्या बहिणीच लग्न होवु न देण्यासाठी .. काय होइल यांच पुढे?


