भाग – 6
आराध्याच्या घरच्यांचा विषय काढला, पण… शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आहे. क्षणभर त्या दोघांत नीरव शांतता होती… फक्त आजूबाजूचा निसर्ग आणि मनातल्या उसळणाऱ्या भावना… आराध्याने अलगद श्वास घेतला आणि नजर न उचलता फक्त एवढंच पुटपुटली — “शिवा, काही वेळ शांत बसू शकतोस का? मी सांगेन… पण थोडा वेळ लागेल…”
शिवाने फक्त मान हलवून होकार दिला.
आता त्या गुहेबाहेर, त्या शांत निसर्गात, एक हळवं… पण थरारक सत्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर होतं.
आराध्याचं मौन आता झाकोळलेल्या आभाळासारखं होतं… क्षणभर ती फक्त त्याच्याकडे पाहात राहिली, त्या नजरेत अपराधगंड नव्हता. पण त्यात काहीतरी खोल, जखमी… आणि न सांगता येण्यासारखं होतं. शिवाने तिच्या त्या नजरेत एक असहायता पाहिली, जी कुणालाही हळवं करेल!
तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला… आणि अगदी हलक्या स्वरात बोलायला सुरुवात केली,
“मागच्या वर्षी आम्ही इथे पिकनिकला आलो होतो. तेव्हा मी इतकी शांत वाटले नव्हते कधीच… झाडांच्या सावलीत बसले होते आणि पानांमधून येणाऱ्या प्रकाशरेषा माझ्या डायरीवर नाचत होत्या… मी सगळं लिहून ठेवलं होतं. त्या क्षणाचा, त्या शांततेचा, त्या नजरेचा मी इतका भाग बनले की… मला वाटलं, हेच खरं आहे!”
शिवा अजूनही तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता. ती पुढे म्हणाली,
“नंतर पुन्हा शहरात गेले… पण काहीच पूर्वीसारखं वाटलं नाही. आई-बाबा… त्यांच्यासाठी मी फक्त त्यांची ‘इज्जत’ होते. माझे विचार, माझं स्वप्न, माझं आयुष्य… कधी त्यांना दिसलंच नाही. फक्त त्यांच्या नावाला काळीमा नको, एवढंच!”
तिने नजर खाली झुकवली, मग उंचावून थेट शिवाच्या डोळ्यांत पाहत ती म्हणाली, “माझं घर मी नाही सोडलं, त्यांनीच दूर ठेवलं… प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण… काळजीच्या नावाखाली बंदी… आणि या सगळ्यात मी… मी कुठेच नव्हते.”
शिवा गप्प झाला. त्या क्षणी त्याला कुठलाही सल्ला द्यावा, असं वाटलंच नाही. तो फक्त तिच्या समोर शांतपणे होता… आधारासारखा.
आराध्या म्हणाली, “शिवा, मला माहिती आहे, माझं पळून येणं चुकीचं वाटेल. पण जेव्हा तुमचं अस्तित्वच कुणाला नकोसं वाटतं… तेव्हा ‘चूक-बरोबर’ हेही पुसट होतं जातं.”
आता तिच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू तरळले… पण या वेळेस त्यात कमकुवतपणा नव्हता, तर अनुभवाची सखोलता होती. शिवाच्या हातातली केळी तशीच राहिली. त्याला फक्त एवढंच म्हणावसं वाटलं… “तू इथे आहेस… आणि सुरक्षित आहेस… एवढंच पुरेसं आहे आत्तासाठी.”
त्या शांततेत दोघांचं अंतर आणखी कमी झालं होतं.
आराध्या बोलत होती… पण ते केवळ शब्द नव्हते तर, ती आपल्या आतल्या खोल खोल दुःखाचं, रागाचं, अस्वस्थतेचं ओझं मोकळं करत होती… तिचा चेहरा आता एखाद्या जखमी लढवय्या सारखा दिसत होता, ज्याने जगाच्या विरोधात उभं राहायचं ठरवलं होतं!
“कोणता समाज शिवा?” ती बोलत होती, तिच्या डोळ्यांत स्फटिकासारखी चमक होती… पण ती आनंदाची नव्हती, ती विद्रोहाची होती. “ज्यांच्या समोर उभं राहिलं की, ते फक्त चेहरा पाहतात… रंग, दिसणं, वागणं, कपडे… आणि मग निकाल लावतात! त्या समाजाला माझ्या मनाचं, माझ्या स्वप्नाचं, माझ्या हुशारीचं… कधी काही वाटलंय का? नाही!”
ती आता थोडी उसासून बोलत होती, आवाज थोडा चढत होता, पण डोळ्यांतून अश्रू वाहात नव्हते, कारण ते आधीच आत ओघळून गेले होते. “तेच आई-बाबा… त्यांच्या डोक्यावरचा ‘समाजाचा’ भार एवढा होता की, त्यांनी कधी माझ्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला नाही. सावळी, कुरूप, मुलगी हीच ओळख… आणि म्हणूनच मी नाही, माझी गैरहजेरी सुखावतेय त्यांना. त्यांना माझा गायब होणं शाप वाटत नाहीय…”
हेही वाचा – आपलं नाव सांगताना शिवा का गडबडला?
शिवा तिच्याकडे बघत होता, स्तब्ध. त्याचे डोळे आता तिच्या वेदनांचा आरसा बनले होते. त्याला वाटलं, त्यानं बरंच काही पाहिलं आहे, पण एवढ्या दुखावलेल्या आत्म्याचं असं स्पष्ट बोलणं… हे काही वेगळंच होतं!
आराध्या किंचित थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली, “मी लपले नाहीये इथं… मी फक्त एक मोकळा श्वास शोधतेय, शिवा… आणि मला असं वाटतं, मी या जंगलात आली नाही, जंगलानेच मला पोटात घेतलं.”
त्याच क्षणी वाऱ्याची एक झुळूक आली आणि आजूबाजूच्या झाडांनी अलगद सळसळ केली… जणू निसर्गही तिच्या त्या वेदनेला सामावून घेत होता.
शिवा काही बोलू शकला नाही. त्याने फक्त एक उसासा सोडला… आणि त्या क्षणाला, त्याला फक्त एकच गोष्ट ठामपणे वाटली… “ही मुलगी जितकी अंतर्बंधित आहे, तितकीच ती विलक्षण आहे आणि ती एकटी नाहीये आता!”
आराध्या बोलत होती आणि तिच्या शब्दांत एक खोल दुःख वाहत होतं — जणू आभाळाखाली वाहणाऱ्या शांत, पण खोल नदीसारखं. शिवा तिचं प्रत्येक वाक्य ऐकत होता आणि त्याच्या मनात आराध्याच्या आयुष्याचा एक नवा पट उलगडत होता…
“माझ्या आईचं नाव प्राजक्ता आणि वडिलांचं सुशांत. लग्नाला पाच वर्षं झाली तरी मूल होत नव्हतं… डॉक्टर, देव, नवस सगळं करूनही फुल उमलत नव्हतं त्यांच्या जीवनवेलीवर… आणि घरात सतत ऐकू यायचं — ‘वांझोटी आहेस’! अगदी माझ्या आजीकडून सुद्धा. आईचं मन नुसतंच नव्हतं तुटत, ते अक्षरशः रक्तबंबाळ व्हायचं.”
आराध्याची नजर आता दूर कुठेतरी खिळली होती, पाणवलेल्या डोळ्यांत भूतकाळाच्या प्रतिमा नाचत होत्या… “आमचं घर एकत्र होतं. बाबांची मोठी बहीण — सुमती. ती तिच्या नवऱ्यासोबत लग्नानंतर सुद्धा आमच्याच घरी राहायची. तिचा नवरा — मधुकर काका, आणि त्यांची दोन मुलं — मोठा निनाद आणि लहान शिल्पा. हे सगळे मिळून एकाच छताखाली राहत होते. माझ्या आईवडिलांसाठी मी म्हणजे आकाशातून मिळालेला आशीर्वाद… पण बाकी सगळ्यांसाठी — एक शाप, एक कलंक. आईचं सौंदर्य, बाबांचं रुबाब… आणि मी? सावळी! लहानपणी खूप सळसळणारी, सतत प्रश्न विचारणारी मुलगी. माझ्या रंगामुळे, रूपामुळे मी ‘दुसरी’ ठरले.”
त्या क्षणी ती फक्त स्वतःबद्दल सांगत नव्हती… ती एका संपूर्ण समाजबाधित… विद्रूप मानसिकतेच्या चौकटीचे वास्तव सांगत होती. शिवाला आता तिच्या सौंदर्यातील तेजाचा खरा अर्थ उमगत होता. ती सुंदर आहे… कारण तिचं हृदय जखमी असूनही ते अजूनही प्रेम करते, बोलते आणि एक चैतन्य आहे.
त्या क्षणाने दोघांच्या नात्यात एक अनाम बंध तयार झाला — न सांगता, न ठरवता!
सुशांतच्या घरात मोठ्या भावांची लग्नं काही ठरत नव्हती. एकाला इतक्या अपेक्षा होत्या की, कुणीच त्याला पसंत पडेना, आणि दुसऱ्याच्या इतक्या अटी होत्या की, कुणीच तयार होईना! अशा गोंधळलेल्या वातावरणात सुशांत मात्र शांत, सुसंस्कृत आणि समजूतदार स्वभावाचा होता. याच दरम्यान प्राजक्ताचे वडील — लग्न जुळवण्याचं काम करणारे, सतत सुशांतच्या घरी ये-जा करत असायचे. मोठ्या भावांची लग्नं काही होत नाहीत, हे पाहून, शांताबाईंनी — सुशांतच्या आईने — एक दिवस सूचवलं, “आपल्या सुशांतसाठी बघ ना एखादी मुलगी!”
खरंतर, प्राजक्ताचं घर तसं साधंसंच, साधारण परिस्थितीतलं. मध्यमवर्गीय, गरिबीची किनार… पण माणसं मात्र मनमिळावू, प्रामाणिक. सुशांतचं वागणं, घरचं वातावरण, त्यांचं एकत्र कुटुंब हे सगळं प्राजक्ताच्या वडिलांनी अनुभवलेलं होतंच आणि म्हणूनच स्वतःच म्हणाले, “माझी लेक आहे एक… बघाल का?”
मुलगी पाहायची तारीख ठरली. पण शांताबाईंनी हट्टाने सांगितलं, “मुलगी इथेच यावी. आपल्या घरात राहून, इथलं वातावरण, माणसं, सवयी, सगळं अनुभवेल… त्यातच खरी ओळख होईल.”
प्राजक्ताचं मन खूप हलकं झालं होतं — एक वळण, एक संधी. सुशांत दिसायला देखणा होता, शिक्षण घेतलेलं, चांगली नोकरी करणारा. प्राजक्ताने स्वतःच्या मनाशी बोलून टाकलं, “हो… हेच नातं आपलं असावं.”
ती त्यांच्या घरी आली. आणि जणू तिला त्या घराने कवेत घेतलं. सुशांतही तिच्या साधेपणावर आणि शांत डोळ्यांवर भारावून गेला. प्राजक्ताच्या त्या होकाराने, दोन घरांची, जिवांची गाठ बांधली गेली — प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि नव्या स्वप्नांच्या धाग्याने.
साखरपुडा साधा, पण ठसठशीत झाला होता. प्राजक्ताच्या घरची परिस्थिती साधारण असल्याने केवळ साखरपुड्याचा सगळा खर्च नव्हे तर, पुढचीही सर्व सूत्रं सुशांतनेच हाती घेतली. प्राजक्ताच्या वडिलांनी केवळ एक साडी आणि चार बांगड्या दिल्या! पण त्या वेळेस कुणी काही बोललं नाही, परिस्थितीचं भान ठेवत शांताबाईंनी बाकी काही विचारलंही नाही.
हेही वाचा – आराध्या या जंगलात का आली होती?
तसं बघितलं तर, प्राजक्ताचं आणि सुशांतच्या मोठ्या भावाचं लग्न एकाच मांडवात पार पडलं. एका घरात एकाच वेळी दोन बायका, दोन नवीन संसार…
प्राजक्ताच्या मनात भीती होती, “सगळ्यांना सांभाळणं जमेल का?” पण तिने कधी विरोध केला नाही, कधी नकार दिला नाही. ती मुळातच “स्वतःपेक्षा घर मोठं” मानणाऱ्या स्त्रियांपैकी होती. सासरी आल्यानंतर ती अगदी घरात मिसळून गेली. कामांची जबाबदारी, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीचे नाजूक मन याचा समतोल साधणं सुरू होतं. या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता.
पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच… हे निमित्त ठरलं. घरोघरी मातीच्या चुली. घरात गोकुळ नांदवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही आणि एकीचं बळ कळतंच असं नाही!
क्रमशः


