प्रदीप केळूसकर
भाग – 2
स्मिताताईंचा फोन आला म्हणून अंजली त्यांच्या घरी चालली होती. आज रविवार, तसा तिच्या सुट्टीचा दिवस. तिचा नवरा मॅच बघायला स्टेडियममध्ये गेला होता… त्यामुळे रात्रीच उगवणार, हे तिला माहीत होतं. त्यांनी ‘उदयाचं ये’ असं फोनवर सांगितलं, म्हणून तिला काळजी वाटली.
स्मिताताईंचा नवरा पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेला आणि मुलगा अनिरुद्ध, त्याची पत्नी कॅनडात! अनिरुद्ध पाच दिवसांनी पोहोचला… तोपर्यंत स्मिताताईंना तिनेच सांभाळलं होत. त्यांच्या गावाकडील चुलत भावाला बोलावून पुढील विधी केले. अनिरुद्ध आणि रश्मी त्याचवेळी तिच्या ओळखीचे झाले. दोघेही स्वभावाने छान. त्यामुळे त्या तिघांची मैत्री झाली पटकन! स्मिताताईंच्या यजमानानंतरची कामे, बँकेचे व्यवहार वगैरे… करण्यासाठी तिने अनिरुद्धला मदत केलेली.
बारा दिवसांनंतर अनिरुद्ध आईला म्हणाला, “आई. आता तू एकटी कुठे राहतेस? चल आमच्याबरोबर…”
“नाही बाळा… मला हे पुणे सोडवणार नाही. लग्नाआधी आणि नंतर मी याच पुण्यात राहिले.”
“अगं, पण एकटी कशी राहशील तू?”
“अरे, या पुण्यात सर्वच आहेत. माझ्या कंपनीतील सर्व आहेत. मी निवृत्त झाले तरी, सर्व संपर्कात आहेतच आणि मुख्य म्हणजे माझी लेक आहे ना अंजू!”
“हो गं, अंजलीची माझी हल्लीच ओळख झाली. खूप प्रेमळ आहे ती. पण शेवटी ती…”
“मानलेली… असं म्हणायचंय ना तुला? नसेल तिला मी जन्म दिला पण, माझी मुलगीच ती. तसेच तिला माझ्यावर आणि मला तिच्याबद्दल प्रेम आहे. काही गरज असेल तर, मी बोलवीन तिला… आणि बाकी मी एकदम ओके आहे. कसलाही आजार नाही मला. अगदीच थकले तर येईन तुझ्याकडे… पण आत्ता नाही.”
गाडी चालवता चालवता अंजलीला हे आठवत होतं. अंजलीचा मुलगा मुंबईच्या कॉलेजमध्ये… त्यामुळे ती दोघंच पुण्यात. नवऱ्याने बोटीवरील नोकरीतून निवृत्ती घेतलेली. पण तिचा नवरा हौशी… पुण्यातील नाटकें, संगीत, नृत्य, खेळ सर्वात त्याला इन्टरेस्ट. त्यामुळे रोज त्याला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला जायचं असे किंवा ट्रेकिंग तरी! अंजली नोकरी करत होती आणि तिला असल्या गोष्टीत फार मजा वाटायची नाही… त्यामुळे दोन-तीन दिवसांनी ती स्मिताताईंकडे जात असे. त्यांना काय हवं, नको ते पाही. त्त्यांची औषधे आणुन देई. त्यांच्यासोबत अंधशाळेत जाई. दोघी तिथे अंधबांधवांसमोर वाचन करीत. स्मिताताई तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ करत अन् अंजली आणि तिच्या नवऱ्याला खायला बोलवत. दोघींना एकमेकांशिवाय चैन पडत नसे. आजूबाजूची लोक तिला स्मिताताईंची मुलगीच म्हणत.
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
काल रात्री स्मिताताई तुटक बोलल्या, असं तिला वाटले.. त्या आपल्याच तांद्रित होत्या की काय, अशी शंका तिला आली. स्कूटर त्यांच्या घरासमोर थांबवली आणि गेट उघडून ती बंगल्याच्या आवारात गेली… पाहाते तो दाराला कुलूप! असं कसं झाले? ती येणार म्हटल्यावर स्मिताताई नेहमी घरी असत. तिने मोबाइल बाहेर काढला आणि फोन लावला… बऱ्याच वेळानंतर त्यांनी फोन उचलला.
“कोण… अंजू? काय गं?”
“अहो स्मिताताई. उदया सकाळी येऊन जा, असा काल फोन केलेलात ना?”
“फोन? कुणी? मी? नाही गं.. मला आठवत नाही…”
“तुम्हीच फोन केलेलात, म्हणूंन मी तुमच्या घरी आले. बरं, तुम्ही आहात कुठे?”
“मी बँकेत आले आहे. पेन्शन जमा झाली काय, ते पाहायला…”
“अहो, आज रविवार नाही का, आज कशी बँक उघडणार!”
“अरे, आज रविवार नाही का.. तरीच अजून बँक का उघडली नाही, याचा मी विचार करत होते…”
“तुम्ही कोथरूडच्या बँकेत आहात ना? थांबा, मी तिथे येते…,” असं म्हणून अंजलीने स्कूटर सुरू केली. दहा मिनिटांत ती बँकेकडे पोहोचली, तेव्हा त्या बँकेच्या पायऱ्यांवर बसल्या होत्या. तिला पहाताच त्या मागे बसल्या आणि तिने गाडी त्यांच्या घराकडे वळवली.
“स्मिताताई, आज रविवार हे तुमच्या लक्षात नाही?”
“नाही गं, अशी कशी मी विसरले?”
“बरं, अनिरुद्धचा फोन आलेला का?”
“होय.. बहुतेक आला असेल…”
“बहुतेक? हे बहुतेक काय स्मिताताई? तुम्हाला आठवत नाही काय?”
“नाही गं… असं काय होतंय मला?”
स्मिता गप्प राहिली… थोडे दिवस पाहू नाहीतर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा, हे तिनं मनोमन ठरविलं.
त्या दोघी घरी आल्या. बहुतेक स्मिताताईंनी सकाळपासून काहीच खाल्ले नसावे.. कारण धुवायला एकही भांडे नव्हते, हे लक्षात आल्यावर तिने कणीक घेऊन पटपट चपात्या केल्या. भेंडी होती, त्याची भाजी केली. तिने विचारले, “स्मिताताई, दही आहे का?”
‘अगं नाही गं… हल्ली दही लावलेलंच नाही!”
“बरं,” म्हणत तिने ताटे घेतली आणि ताईंना बोलावलं. चपात्या, भाजी वाढली आणि गार पाण्याची बाटली घ्यावी म्हणून तिने फ्रीझ उघडला.. तर तेथेच तिला बाऊलमध्ये दही दिसलं! तिला आश्चर्य वाटलं.. आत्ताच ताईंनी दही नसल्याचे सांगितलं होतं!!
अंजली गप्प राहिली. स्मिताताईंकडे ती गेली दहा वर्षं येत होती. त्याआधीपासून त्या एकाच कंपनीत काम करत होत्या. त्या दोघींचे नाते आई-मुलीचे होते, तरीपण काही तरी बिघडले होते… तिला स्मिताताईंची काळजी वाटू लागली.
दर रविवारी ताई अंधशाळेत जात. म्हणून अंजली त्यांना घेऊन गेली… पण नेहमी तिथे असणाऱ्या लोकांची नावे त्यांना आठवत नव्हती. अंजलीनेच त्या दिवशी अंध मंडळींसमोर वाचन केले.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सरळ ती स्मिताताईंच्या घरी आली. त्यांना घेऊन ती डॉ. गोगटेंच्या क्लिनिकमध्ये आली. डॉ. गोगटे स्मिताताईंचे नेहमीचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणाले, “बोला, काय प्रॉब्लेम?”
अंजली बोलू लागली… “डॉक्टर, ही तुमची पेशन्ट बरेच विसरू लागलीय. तिने परवा फोन करून बोलावलं, मी गेले तर दाराला कुलूप! मला बोलावलं हे तिलाच आठवत नव्हतं. तसेच तिच्या मुलाचा फोन येऊन गेला हे तिला आठवत नव्हतं.”
“बरं… असं होतं… सत्तरी पार झाली ना… स्मरणशक्ती कमी होते. तरीपण, तुम्ही न्युरोलॉजिस्ट डॉ. मेहता यांचा सल्ला घ्या. हे डॉ. मेहता यांचं कार्ड… अपॉइंटमेंट घेऊन जा…”
“बरं” म्हणत त्या दोघी बाहेर पडल्या.
स्मिताने नवऱ्याला फोन करून कळवले. स्मिताताईंना बरं नाही. मी काही दिवस येथेच रहाते. तिचे बारीक लक्ष होतं.. त्या बरेच विसरत होत्या.. तिने अनिरुद्ध याच्या कानावर ही परिस्थिती घातली, “अनिरुद्ध, अशी परिस्थिती आहे… मी डॉ. मेहता यांची शुक्रवारची अपॉइंटमेंट घेतली आहे.”
“बरं अंजू… तू असताना मला काळजी नाही. डॉक्टर मेहता काय म्हणतात ते कळव, मग बघू…”
शुक्रवारी ती स्मिताताईंना घेऊन डॉ. मेहता यांना भेटली..स्मिताताई हल्ली बऱ्याच गोष्टी विसरतात, हे तिने सांगितले. डॉक्टरांनी सिटी स्कॅन केले, मग EEG घेतला. त्यानुसार काही औषधे लिहून दिली. डॉक्टर स्मिताताईंना म्हणाले, “आता एकट्या बाहेर जाऊ नका. कुणाला तरी सोबत घेऊनच बाहेर जायचं… तुम्हाला रामरक्षा, स्तोत्रं येत असतील ना?”
‘होय डॉक्टर..”
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
“ते रोज सकाळ-संध्याकाळ मोठ्याने म्हणा… म्हणजे आपली स्मरणशक्ती वाढते. एक ते शंभर आकडे सरळ म्हणा.. उलटे म्हणा… गाणी येत असतील तर ती म्हणा… मित्रमैत्रिणींना फोन करा, त्यांच्याशी बोला… आणि ही औषधे लिहून देतो, ती वेळेवर घ्या आणि एक महिन्यांनी परत भेटा.”
अंजलीला डॉक्टर हळूच म्हणाले, “तुम्ही रात्री दहा वाजता मला फोन करा… ओके.”
त्या दोघी घरी आल्या. रात्री दहा वाजता तिने डॉ. मेहता यांना फोन लावला…
“त्यांच्यासमोर काही गोष्टी बोलता येत नव्हत्या म्हणून मी तुम्हाला फोन करायला सांगितलं. तुमच्या आईला अल्झायमर सुरू झाला आहे…”
“अरे बापरे.. मग त्यावर उपाय?”
“त्यावर निश्चित असा उपाय नाही. फक्त त्याना सांभाळायचं…”
“पण कसं सांभाळायचं?”
“त्यांना एकटं कुठे बाहेर जाऊ द्यायचं नाही… आणि त्त्यांची स्मरणशक्ती वाढवायचा प्रयत्न करायचा. त्यांच्या ओळखीच्या आणि जवळच्या व्यक्तीचे फोन नंबर मोठ्या अक्षरात भिंतीवर चिकटवून ठेवायचे आणि ते पाठ करायला सांगायचे…”
“पण डॉक्टर किती दिवस…?”
“ते सांगता यायचे नाही… हळूहळू गाडी घसरगुंडीला लागणार. त्यांना आताचे आठवणार नाही, जेवलेले समजणार नाही, त्या काही दिवसांनी तुम्हाला सुद्धा ओळखणार नाहीत, तेव्हा काळजी घ्यायला लागेलच… आणि त्याना एकट्याला ठेवू नका… सतत कुणाला तरी बरोबर ठेवा.”
तिने फोन बंद केला. बाजूच्याच खोलीत झोपलेल्या स्मिताताईंजवळ जाऊन ती बसली. ‘या माऊलीने मला माहेर दिलं…. मला आईची माया दिली… माहेर म्हणजे काय असतं हे बाईला लग्न झाल्यावर समजते. आपले वडील गेले, मग आई… आणि माहेर संपले, असे वाटत असताना स्मिताताईंनी घरी बोलावलं… केसांना तेल लावून दिले, आवडीचे खाऊ घातलं, फिरवलं आणि मग आपण येतच राहिलो… आईची माया ताईंनी दिली, जवळजवळ मागील दहा वर्षं… आणि आता… स्मिताताई.. पुढे काय?’
तिने रात्री अनिरुद्धला फोन करून डॉ. मेहता यांचे मत सांगितले… तो आणि रश्मी सुद्धा हादरले…
रश्मी- “अंजली, ऐकून धक्का बसला. आजूबाजूला आहेत असे पेशन्ट! त्त्यांचे प्रॉब्लेम्स बघून वाईट वाटते. असे रुग्ण आपल्या मुलास ओळखत नाहीत.. बायको नवऱ्याला आणि नवरा बायकोला ओळखत नाही.. आम्ही पुढील आठवड्यात येतो तिकडे. तोपर्यंत…”
अंजली – “मी आहे इथे… सावकाश या.. मग विचार करू.”
अंजलीने रजा टाकली. तिच्या नवऱ्याला ती म्हणाली, “तू इकडेच ये. तुझी पण गरज लागेल.” तिचा नवरा पण या घरात आला. ती आता संपूर्ण दिवस आणि रात्र त्यांच्यासमवेत राहू लागली. स्वतः मोठ्याने रामरक्षा म्हणू लागली… मनाचे श्लोक म्हणू लागली.. तिचे ऐकून स्मिताताईपण पाठोपाठ म्हणू लागल्या. कधी कधी विसरायच्या… पुन्हा त्यांना आठवायचं. पुन्हा विसरायच्या… ती त्यांना घेऊन घराजवळच्या बागेत जायची. त्त्यांची आवडती मराठी गाणी… शास्त्रीय संगीत ऐकवायची.. तिचे प्रयत्न सुरूच होते. पण मधेच त्या स्वमग्न व्हायच्या, तेव्हा त्या अंजलीला किंवा तिच्या नवऱ्याला पण ओळखायच्या नाहीत!
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’
लगेचच्या आठवड्यात अनिरुद्ध आणि रश्मी आली. त्यानी अनिरुद्धला ओळखले पण रश्मीला… “ही कोण?” म्हणून विचारले.
अनिरुद्ध आल्यावर तिने पुन्हा डॉ. मेहता यांची अपॉइंटमेंट घेतली आणि ते तिघे त्यांना भेटायला गेली. डॉक्टरांनी स्मिताताईंची तपासणी केली आणि काही गोळया बदलून दिल्या. अनिरुद्ध डॉक्टरांना म्हणाला, “डॉक्टर.. बरे व्हायचे चान्सेस आहेत?”
“उगाच आशेवर ठेवण्यात अर्थ नाही… सध्यातरी यावर काही उपाय नाही. भविष्यात होईल कदाचित. फक्त त्याना जपायचं. काही पेशन्ट बरेच वर्षे जगतात काही थोडी वर्षं… पण नातलगांनी धीर सोडायचा नाही. काही चमत्कार पण होऊ शकतो…”
ती तिघे घरी आले. स्मिताताई हळूहळू बरेच विसरू लागल्या होत्या… अंजली सतत बरोबरच असायची. अनिरुद्ध आणि रश्मी दहा दिवस राहिले आणि एकदिवस ते अंजलीला म्हणाले, “अंजू, आम्ही आईला घेऊन कॅनडात जातो.”
“कॅनडात? पण तुम्ही दोघे नोकरी करता ना?”
“होय, नोकरी करावीच लागते दोघाना. त्याशिवाय तिथले खर्च झेपायचे नाहीत?”
“मग आईला कुठे ठेवणार?”
“अशा पेशन्टसाठी ठिकाणे आहेत तिथे… ती लोक सगळी काळजी घेतात.”
“थोडक्यात वृद्धाश्रम…. परदेशातील वृद्धाश्रम!”
“पण तिथे सर्व असते…”
“पण माया, प्रेम, आपुलकी नसते ना…”
“माया तिथे कशी असेल? आपला पण नाईलाज असतो ना…”
“अनिरुद्ध.. स्मिताताई इथेच राहतील…”
“पुण्यात? तशी व्यवस्थित सोय आहे का?”
“त्या आपल्याच घरात राहतील अखेरपर्यत…”
“म्हणजे?”
“म्हणजे, मी आणि माझा नवरा त्त्यांची काळजी घेऊ. त्यांच्या अखेरपर्यत…”
“अगं, पण तुझी नोकरी? संसार…”
“मी दोन दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिलाय… आणि माझा संसार म्हटशील तर, माझा मुलगा मुंबईत शिकतोय. नवरा आहेच सोबत. पण स्मिताताई म्हणजे आईच ती माझी… तिने मला माहेर दिलं, माझी आई गेली, पण ही आईच झाली माझी! माझ्या आईला परक्याचा हात लावू देणार नाही… मला माहीत आहे, हळूहळू ही माझी आई लहान मुलं होईल… लहान मुलाचं करावं तसं तिचं करावं लागेल… पण त्याची तयारी आहे माझी. माझ्या आईला मी असताना बाहेर ठेवलं असतं का? नाही… मग ज्या मातेने मला माहेर दिलं, तिच्याबाबत ते शक्य नाही… अनिरुद्ध, रश्मी तुम्ही कॅनडात जा. वाटले तर आईशी व्हिडीओकॉलवर बोला.. आता मी आणि माझं लेकरू…”
समाप्त
मोबाइल – 9307521152 / 9422381299