Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितमायेचा रहाट...

मायेचा रहाट…

सतीश बर्वे

माझे ऑपरेशन एकदाचे व्यवस्थित पार पडले अन् माझ्यासकट राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. गेले कित्येक दिवस सगळेजण माझ्यासाठी खूप  धावपळ करत होते, कारण माझे घरचे असे कोणीच नव्हते इथे येण्यासारखे. ऑपेरेशनच्या आदल्या दिवशी मात्र सगळेच मनातून घाबरलेले होते. माझ्या खोलीतील वातावरण भावूक झाले होते. प्रत्येकाची समजूत काढणे मला खरोखरच कठीण गेले होते… पण माझा देवावर, डॉक्टरांवर आणि स्वतःवर विश्वास होता. मला खात्री होती यातून मी सहलीसलामत बाहेर येईन! कारण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती. माझ्यात सुधारणा झपाट्याने होत होती आणि कदाचित आठवड्यानंतर मला घरी जायची परवानगी मिळणार होती.

आधी आम्ही ठरल्याप्रमाणे ऑपरेशननंतर अभिषेकने चैतन्यला अमेरिकेत फोन करून सगळे कळवले होते. त्यावेळचा त्याचा थयथयाट अभिषेककडून ऐकून मी देखील क्षणभर घाबरलो होतो. तो एका ट्रेनिंगमध्ये अडकला होता त्यावेळी आणि त्यातून मोकळा झाल्यावर तो अभिषेकला कळवून माझ्याबरोबर वेब-कॅमवर बोलणार होता. एका मोठ्या दिव्यातून मी सुटलो होतो खरा. पण एका वादळाला मला आता धैर्याने तोंड द्यायचे होते आणि ते म्हणजे आमच्या मैत्रीच्या षटकारातील सहावा भिडू आमचा मित्र चैतन्य. तो सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या अमेरिकेतील नवीन नोकरीत रुजू झाला होता. माझ्याच सांगण्यावरून माझा आजार त्याच्यापासून लपवण्यात आला होता, कारण नवीन नोकरीवर लाथ मारून आला असता तो माझ्याजवळ राहायला आणि हॉस्पिटलच्या चकरा मारायला! त्याला तसं वाटायला कारण होते, कारण त्याचे आजवरचे सगळे शिक्षण मी केले होते.

आज अखेर चैतन्याशी बोलायचा दिवस उजाडला. मी राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळ्यांना बोलावले होते, कारण चैतन्य कसा प्रतिसाद देणार त्याबद्दल मी साशंक होतो. लॅपटॉप सुरू झाला आणि आम्ही सगळेच सहा महिन्यानंतर चैतन्यला बघत होतो. चैतन्यला पूर्णवेळ मोकळेपणाने बोलायला द्यायचे, असे आम्ही ठरवले होते. सुरुवातीचे ‘हाय’, ‘हॅलो’… झाले. अभिषेकने बोलायला सुरुवात केली… “चैतन्य, आजचा दिवस तुझा आहे. तू बोलायचंस आणि आम्ही ऐकायचं… आज तुझी बॅटिंग आहे आणि आम्ही फक्त फिल्डिंग करणार!”

आणि चैतन्यने तोंड उघडले…

“दादा, तू घाबरून बसला असशील ना, मी काय बोलेन म्हणून! मी चिडलो तर, मला कसं तोंड द्यायचं. पण मी नाही रागावणार तुला. तुला रागावणारा मी कोण? तुझ्या सावलीबरोबर सुद्धा उभी राहायची लायकी नाही माझी. एक अनाथ मुलगा मी. आर्थिक मदत मिळाली म्हणून तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतली होती मी. कसा काय तुझ्या नजरेला पडलो आणि तुझ्या मित्रांच्या टोळीत तू मला सामावून घेतलेस, ते तुझे तुलाच ठाऊक… राहुल, अभिषेक, सुमेध आणि ऋषिकेश सगळे तुला नावाने हाक मारतात, जरी तू त्यांच्यापेक्षा दोन – तीन वर्षांनी मोठा आहेस… तसं तू आम्हा सगळ्यांना सीनियर होतास कॉलेजमध्ये. पण माझ्यासाठी तू दादाच आहेस आणि शेवटपर्यंत तसाच राहशील…”

हेही वाचा – माणुसकीचे शिल्प…

क्षणभर थांबून चैतन्य पुढे बोलू लागला, “देव तरी बघ ना कसा आहे… आम्हा सगळ्यांचे सगळे करण्याचे काम तुझ्या गळ्यात टाकले आहे त्याने. राहुलचे एक वर्ष नापास प्रकरण आणि त्यानंतर आलेले नैराश्य. आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत पोहोचलेला असताना त्याला त्यातून सहलीसलामत बाहेर काढून मार्गाला लावणे, अभिषेकच्या बाईकचा अपघात, पोलीस आणि कोर्टकचेऱ्या, सुमेधचा संसारीक गुंता, ऋषिकेशच्या घरचे प्रश्न… काय काय आठवू मी! यादी खूप मोठी आहे रे दादा. सगळे आपण वेगळ्या स्वभावाचे. पण तरीही आजवर सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंस तू. त्यासाठी कमी का त्रास तू सहन केलास आजवर? कसं रे जमवलंस तू सगळं? आज हा नाराज तर उद्या तो नाराज… आपापसातील भांडणे, मुलींवरून लफडी, परीक्षेच्या काळातील ताणतणाव, रात्र रात्र जागून तू सगळ्यांकडून करून घेतलेला अभ्यास… भोवती इतक्या कटकटी असून देखील तू जंगलातील ध्यानस्थ ऋषीसारखा राहिलास…”

“…आमची सगळ्यांची लग्ने त्रासाशिवाय झाली. प्रत्येकाच्या लग्नाआधी तू प्रत्येकाच्या घरी दाखल आणि अंगावर पडेल ते काम करून मोकळा. तुझ्या आईबाबांची आजारपणात सेवा करण्यासाठी तू लग्न केले नाहीस, पण आमच्या सगळ्यांच्या लग्नात मिरवून घेतलंस. सगळ्यांच्या सासुरवाडी आदराचे आणि मानाचे स्थान तुझे तू मिळवलेस. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तू दीपस्तंभ बनून राहिलास. त्यासाठी कितीतरी कटकटी आणि मानसिक त्रासाची वादळे तू परतून लावलीस. पण आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला योग्य ती दिशा दाखवण्याचे काम तू अव्याहतपणे केलेस आणि अजून देखील करतो आहेस. आमचे संसार आणि तुझे एकाकीपण खरंतर बरोबरीने वाढले… पण आपल्यातील मैत्रीचे अनोखे नाते तू आणखी वाढवत पुढच्या पिढीत देखील अलगद गुंफून ठेवलेस. केतकी, अनुज, सुकन्या, विराज, अबोली, अक्षय आणि सुखदा यांचा तू लाडका काका बनलास. सगळ्यांचे सगळे हट्ट पुरवत आलास. आमच्या बायकांचा तू लाडका भावोजी झालास आणि आम्हा सर्वांच्या कुटुंबाचा तू अघोषित प्रमुख आहेस!”

“अभिषेकचा फोन आला. त्याने घाबरत घाबरत तुझी बातमी दिली आणि मी कोसळायचा बाकी होतो. तुझ्यासारख्या देवमाणसावर का बरं नजर होती देवाची? पण दादा तू हार मानणाऱ्यातला नाहीस हे कदाचित देवाला माहीत नसेल. तू ज्या धीराने आलेले संकट परतवून लावलेस, त्यासाठी तुला इथूनच साष्टांग नमस्कार. मला इतक्यात तरी येता येणार नाही तिकडे, पण मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलत राहीन तुझ्याशी!”

“आमच्या कोकणात प्रत्येकाच्या विहिरीवर रहाट असतो लावलेला पाणी उपसण्यासाठी. खोल विहिरीत जिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथवर तो पोहोचतो आणि तिथले पाणी न कंटाळता वर काढून सगळ्यांना देतो. वर्षानुवर्ष तो हेच काम करत असतो… सगळ्यांना पाणी देतो पण स्वतः मात्र कोरडाच राहतो… दादा, तूही तसाच आहेस आमच्या सर्वांच्या आयुष्यातील मायेचा रहाट. कॉलेजपासून द्यायला सुरू केलेले तुझ्या आयुष्याच्या आणि मनाच्या विहिरीतील प्रेमाचे, आपुलकीचे पाणी तू आज इतकी वर्षे न थकता न थांबता आम्हालाच नाही तर, आमच्या पुढच्या पिढीत सुद्धा आनंदाने देत आहेस. पण तू मात्र एकटेपणाचा कोरडेपणा सतत जपत राहिलास आजवर. तुला नाही का रे असं कधी वाटलं की, तुझ्या ओंजळीत कोणीतरी सुखाचे आनंदाचे पाणी ओतावे भरभरून?”

हेही वाचा – नात्याची पावनखिंड…

“आम्ही आमच्या संसारात रममाण असताना तू मात्र सतत लांबून आमच्यावर लक्ष ठेऊन राहिलास. आमची आणि आमच्या मुलांची सतत काळजी करत राहिलास. त्यांचे लाड पुरवत राहिलास. त्यांना हवं नको ते सगळं दिलंस हक्काने. त्यांच्या आजारपणात रात्र रात्र जागून काढल्यास आणि आम्हाला जबरदस्तीने झोपायला लावलेस. तेव्हा तुझी देखील नोकरी सुरू होती. मग कुठून आणायचास तू एवढी शक्ती आणि जागरण करण्याची ताकद?”

“लवकर बरा हो आणि सगळ्यांनी मिळून ठरवल्याप्रमाणे ऋषिकेशच्या घरी विश्रांतीला जा…” अजून बरंच काही बोलत राहिला चैतन्य यापुढे भावनिक होऊन… किती बोलू आणि किती नको, असं त्याला झालं होतं. राहुलला आत्महत्येच्या भयानक विचारातून सुखरूप सोडवून आणल्यानंतर आम्ही सहाही जण ढसाढसा रडलो होतो. त्यानंतर तीच अवस्था आम्ही सगळ्यांनी आज इतक्या वर्षांनी अनुभवली, चैतन्यचे भावनिक बोलणे ऐकून.

माझी संध्याकाळची औषधे देण्यासाठी आणि सलाइन लावण्यासाठी आलेल्या दोन नर्स सुद्धा पाणावलेल्या डोळ्यांनी आमच्या मागे उभ्या होत्या, ते चैतन्याचे बोलणे संपल्यावर आमच्या लक्षात आले…

आम्हाला काय बोलावे ते समजेना त्यांना बघून. शेवटी मीच त्या दोघींची माफी मागितली… त्यांचा वेळ विनाकारण फुकट गेल्याबद्दल. त्यावर एक नर्स डोळे पुसत म्हणाली, “दादा आज इतके दिवस तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आहात. आम्ही तुम्हाला कधीच निराश किंवा घाबरलेले बघितले नाही. इतक्या मोठ्या ऑपरेशनमधून तुम्ही सुखरूप बाहेर पडलात. खरंच, तुमच्या जिद्दीला आणि इच्छाशक्तीला सलाम. आज त्या तुमच्या मित्राने सांगितलेले ऐकून तुमच्याबद्दलचा अभिमान आणखी वाढला. तुमचे उदाहरण आता आम्ही घाबरलेल्या रुग्णांना देऊन त्यांचा आत्मविश्वास त्यांना परत मिळून देऊ. तुम्ही लवकर बरे होऊन तुमच्या घरी जाण्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करू.”

दोघी नर्स त्यांचे काम करून गेल्या, पण आम्ही मात्र चैतन्यचे बोलणे ऐकून त्यानंतर कितीतरी वेळ नि:शब्द होतो, ते आमचे आम्हालाच कळले नाही…


(टीप : कथेचा मूळ गाभा हा कोकणातील मातीतला आहे. एका गरीब कुटुंबातील मोठ्या मुलाने घरातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन स्वत:च्या शैक्षणिक इच्छा मारून इतर पाच भावंडांना उच्चशिक्षित करून सुखी आयुष्य जगण्याची संधी दिली आणि तो मात्र मायेचा रहाट बनून राहिला शेवटपर्यंत. हाच गाभा डोळ्यांसमोर ठेवून ही अनोख्या मैत्रीची कथा लिहिली  आहे. वाचकांनो, आपल्या अवतीभवती देखील थोड्याफार फरकाने असे त्याग मूर्ती नक्कीच असतील. अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात ‘मायेच्या रहाटांना’ खणखणीत सलाम.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!