सतीश बर्वे
ह्यांच्या इच्छेनुसार त्यांचे सगळे दिवसकार्य घरच्या घरी छोट्या प्रमाणात केले आणि उरलेली रक्कम आलोकने त्यांच्या आवडीच्या संस्थेला शैक्षणिक मदत म्हणून दान दिली. एक आलोक सोडला तर, मुक्कामाला कोणी पाहुणे मंडळी अशी नव्हतीच.
घरातला मुख्य श्वास कायमचा थांबला होता. आता हळूहळू ते अंगवळणी पडणार होतं. आलोक होता म्हणून मग मी तेव्हाच बॅंकेची कामं उरकून घेतली. जेणेकरून मला बॅंकेतून पैसे काढता येतील. इतकी वर्षे हेच सगळं बघत आले होते. पैसे मागितले की, हातावर मिळत होते दर महिन्याच्या अगदी ठरलेल्या दिवशी. मला एकटीला ते कदाचित जमलं नसतं. ह्यांच्या बाकीच्या गुंतवणुकीची माहिती मुद्देसूद लिहिलेली वही मी आलोकच्या ताब्यात दिली होती. तो परत इंदोरला गेल्यावर वेळ मिळेल तेव्हा एकेक करत सर्व कंपन्यांमध्ये, आवश्यक ते बदल करण्याची कागदपत्रे जमा करणार होता.
बघता बघता आलोकचा जाण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला आणि माझा जीव अधिकाधिक कासावीस होत चालला होता. माझी होणारी घालमेल आलोकच्या लक्षात येऊन संध्याकाळी त्याने मला सुचवलं की, आई आज रात्री झोपण्यापूर्वी पूर्वीच्या प्रमाणे डोक्यावर तेल चोळून देशील का?
मला किंचितसं हसू आलं आणि मी त्याला म्हणाले, “खरंच देईन बाळा. इतके वेळा घरी यायचास, पण तेव्हा कधी म्हणाला नाहीस असं!… आणि आज का अचानक आठवलं तेल चोळून घ्यायचं?”
“आई ते फक्त निमित्त आहे. तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतंय… का कोण जाणे!”
हेही वाचा – Mother and motherhood : बेअरर चेक
जेवणं झाल्यावर दिवाणखान्यात आलोक माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि मला झर्रकन जुने दिवस आठवले. शाळा संपून कॉलेजात जायला लागला तरीही आठवड्यातून एकदा आलोक हट्टाने डोकं चोळून घ्यायचा. तेव्हा हे त्याला चिडवायचे देखील.
मी हाताच्या ओंजळीत खोबरेल तेल घेऊन आलोकच्या टाळूवर चोळायला सुरू केले. ह्यांच्या हट्टापायी आलोकने फक्त शास्त्रापुरते थोडे केस कापले होते.
“आई…”
“हं.”
“बाबा गेलेत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. सतत वाटतं की, अजूनही पाठीवर थाप मारत म्हणतील, ‘मला राजे काय खबरबात आहे, तुमच्या इंदूरची?’ बाबा म्हणजे शिस्त आणि करारी बाणा. अमुक वेळेला अमुक एक गोष्टच व्हायला पाहिजे. काय बिशाद होती आमची तेव्हा हू़ं का चूं करायची. निमूटपणे खाली मान घालून मी आणि दिदी दिलेलं काम किंवा सांगितलेली गोष्ट करायचो. वेळेत काम झालं नाही किंवा अभ्यास नीट झाला नाही की, बाबांच्या आवडीची पायाचे अंगठे धरुन उभं रहाण्याची शिक्षा ठरलेली हमखास ठरलेली असायची. प्रसंगी उपाशी रहाण्याची शिक्षा देखील भोगली आहे आम्ही. त्यावेळी खूप राग यायचा बाबांचा! हाताची मूठ गच्च आवळून बंड करावसं वाटायचं. पण तशी हिंमत नाही झाली कधी…” आलोक भूतकाळात गेला.
“पुढे शाळा संपून कॉलेजात जायला लागल्यापासून मात्र शिक्षा हा प्रकार खूप सौम्य झाला. किंबहुना संपल्यातच जमा होता तो. आठवतो मला माझ्या कॉलेजचा पहिला दिवस. मी जणू हवेतच तरंगत होतो. घरी आल्यावर संध्याकाळी बाबांनी घेतलेलं बौद्धिक आठवलं. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक छानपैकी समजावून सांगितला होता त्यांनी. आयुष्याला सकारात्मक किंवा नकारात्मक कलाटणी देणारी ही कॉलेजची वर्षं का आणि कशी आहेत, हे त्यांनी उदाहरण देऊन मनावर बिंबवले होते. वर्षभर जरी मौजमस्ती केली तरी, प्रत्येक वर्षी फायनल परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता त्यांनी डोक्यात फिट्ट बसवली होती…”
“शाळेचा युनिफॉर्म, तिथली उपस्थिती, घरचा अभ्यास, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रयोग परीक्षा, दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास या सगळ्या चक्रव्यूहातून सुटका होत असतानाच आमच्याभोवती उच्च आणि चांगले आचार विचार, शिकवण, संस्कार आणि जीवनमूल्यांची आजन्म न तुटणारं कुंपण मात्र त्यांनी मोठ्या खुबीने आणि शिताफीने बांधून ठेवलं जेणेकरून भविष्यात परिस्थितीने कितीही प्रयत्न केला किंवा मोहमायेचे क्षण आमच्या पुढ्यात आणून ठेवले तरीही आमचं पाऊल घसरणार नाही आणि अंतिम ध्येयावरची आमची नजर किंचितही ढळणार नाही, याची तजवीज बाबांनी करून ठेवली होती…”
“तुझासुद्धा मोलाचा वाटा होता बाबांच्या या प्रयत्नात. त्यामुळेच आजवर क्षणिक सुखासाठी आणि विशेष कष्ट न करता सहज मिळणारा घसघशीत आर्थिक फायदा समोर असताना देखील आमच्या नीतीमूल्यांशी कधीच तडजोड करायला मी धजावलो नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख माझ्या वरिष्ठांनी मला वेळोवेळी मिळालेली प्रमोशन जाहीर करताना केला होता. आई आज इतक्या लहान वयात माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांनाच आश्चर्यचकित करते. पण मी देखील वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करतो, याचा मला अभिमान आहे…” आलोक बोलत होता.
हेही वाचा –
त्यावेळी अचानकपणे गालावर पाणी पडल्याचा भास झाला आणि त्याने वळून बघितलं. माझ्या डोळ्यांची धरणं काठोकाठ भरून अश्रू ओघळत आलोकच्या गालावर पडत होते.
“आई काय झालं तुला अचानक…” आलोकने जरा धास्तावत विचारले.
“नाही रे… काही नाही. तू भूतकाळात डोकावून बघितलेस, मग मी कशी मागे रहाणार. मला देखील तेव्हा तुझ्या बाबांनी तुम्हाला केलेली शिक्षा नकोशी वाटायची. मी एक-दोनदा हिंमत करून याबाबतीत त्यांच्याशी बोलले देखील होते. पण मला विश्वासात घेऊन आणि माझी समजूत काढून ते तेव्हा म्हणाले होते की, ‘तुला काय वाटतं मला आनंद मिळतो मुलांना अशी शिक्षा करून? पण आज केलेल्या शिक्षेच्या आणि संस्कारांच्या भक्कम पायावर उद्या त्यांच्या आयुष्याचा आयफेल टॉवर मोठ्या दिमाखात उभा राहील. मला खात्री आहे की, आपण असताना आणि नसताना देखील मोठं झाल्यावर आपली मुलं आपण केलेल्या शिक्षेचा कधीच तिरस्कार करणार नाहीत आणि आपल्या संस्कारांचे महत्त्व ते त्यांच्या मुलांना देखील पटवून देण्यात यशस्वी ठरतील.’” मीही आठवणींना उजाळा दिला.
“मागे काही वर्षांपूर्वी तुझ्या दिदीचं अपघाती जाणं त्यांनी फार मनाला लावून घेतलं होतं. त्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या आशा तुझ्यावर केंद्रीत झाल्या होत्या. तू केलेली प्रगती आणि मिळवलेले यश बघून ते अतिशय समाधानी होते.”
माझं बोलणं ऐकून आलोक बाबांच्या आठवणीने ढसाढसा रडायला लागला. त्याचवेळी नकळतपणे आपल्या आयुष्याभोवती आईबाबांनी त्याकाळी घातलेले संस्कारांची आणि चांगल्या विचारांचे कुंपण आणखी मजबूत झाल्याचे त्याला जाणवले.