सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥496॥ आतां सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी कीजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ॥497॥ अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रस घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥498॥ तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥499॥ कां शीस खांडुनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥500॥ म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं । कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळांचां ॥501॥ जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं । दुःख लेऊनि सुखाची आंगीं । सळित जगातें ॥502॥ जेथें मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी । मृत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी ॥503॥ जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेईजे गंधर्वीं । गेलियाची कवणे गांवीं । शुद्धी न लभे ॥504॥ अगा गिंवसितां आघवां वाटीं । परतलें पाउलचि नाहीं किरीटी । सैंघ निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥505॥ जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी । कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥506॥ ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयांचिये निश्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥507॥ पैं दृष्टादृष्टींचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥508॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जे पृथ्वीतळींचे देव, जे तपोवतार सावयव…
अर्थ
‘बाप रे बाप!’ जेथे दु:खरूपी माल आलेला आहे आणि तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे, अशा त्या मृत्युलोकातील (नरदेहरूपी) शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. ॥496॥ आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय? ॥497॥ अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्य़ावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून (त्याच्या सेवनाने) ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी ॥498॥ त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे, ते निव्वळ कडेलोटीचे दु:खच आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचून त्यांचे चालतच नाही. ॥499॥ किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे, तसे या मृत्युलोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. ॥500॥ एवढ्याकरिता या मृत्युलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणार्या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार? ॥501॥ ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्याकरिता (सूर्याचा) उदय होत असतो, (जेथे) दु:ख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे, ॥502॥ जेथे मंगलरूप अंकुराबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते आणि (जेथे) पोटात असतानाच गर्भाला मरण घेरते, ॥503॥ जे प्राप्त नाही, त्याचे चिंतन करावयास (मृत्युलोकची वस्ती) लावते. (बरे, ते प्राप्त झाले) तेव्हा त्याचवेळी ते गंधर्व (अदृश्य पुरुष) नेतात. बरे, ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. ॥504॥ अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी, मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही आणि जेथील पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत, ॥505॥ या मृत्युलोकाची रचना करणार्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट ऐक. ॥506॥ (अशा तर्हेची) ज्या लोकातील वागणूक आहे, त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते! ॥507॥ अरे, ज्यापासून इहपरलोकीचा लाभ होतो, त्याकरिता (हे लोक) एक कवडी देखील भांडवल सोडीत नाहीत आणि ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते, तेथे कोट्यवधी रुपये खर्च करतात. ॥508॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण…


