सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
अगा नांवें घेता वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥ ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें ॥444॥ जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टि भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥ माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥446॥ जयांचें नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एऱ्हवीं मरण ॥447॥ ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥448॥ ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतुं कां । परि मजसी तुकितां तुका । तुटी नाहीं ॥449॥ पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें । माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे ॥450॥ तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी । कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥451॥ एऱ्हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें । म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥452॥ राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥453॥ वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥454॥ तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे । जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥455॥ म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥456॥ तेंचि भलतेणें भावें । मन मजाआंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ॥457॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं सूर्य जो वेळु नुदैजे, तया वेळा कीं रात्रि म्हणिजे…
अर्थ
अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार करणे वाईट आहे, (फार काय सांगावे?) जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत, ॥443॥ ते पापी जातीतील अविवेकी, दगडाप्रमाणे मूर्ख असे असेनात, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे ॥444॥ ज्यांच्या वाणीत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत राहते, ॥445॥ माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ॥446॥ ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे (सर्व इंद्रियाच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे) मिळाले, तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणाप्राय वाटते. ॥447॥ याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे ॥448॥ ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का? ते ऐकून आणि शिकून विद्वान झालेले नसेनात का, परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता, ते वजनात कमी भरत नाहीत. ॥449॥ अर्जुना पाहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्तिमहात्म्यासाठी मला नरसिंहरूप अलंकार धारण करावा लागला ॥450॥ अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला. (माझी भक्ती करण्याच्या ऐवजी प्रल्हादाची भक्ती केली). कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे (प्रल्हादाचे) वर्णन केले असताही मिळते. ॥451॥ एरवी त्याचे कुळ वास्तविक दैत्याचे, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. ॥452॥ राजाच्या हुकूमाची अक्षरे ज्या एका कातड्यावर उमटलेली आहेत, त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. ॥453॥ प्रत्यक्ष सोने, रुपे जरी असले (आणि त्याच्यावर राजाच्या हुकूमाची अक्षरे नसली) तर त्या सोन्यारुप्याची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हा राजाच्या हुकूमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. ॥454॥ त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्या वेळेला सर्व सर्वज्ञता मान्य होईल की, ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. ॥455॥ याकरिता अरे, उत्तम कुळ, जाती अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. ॥456॥ तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना, पण माझ्या स्वरूपात येईल (मद्रूप होईल) असे करावे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील (जाती, कुळ वगैरे) गोष्टी निष्फळ होतात. ॥457॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : निंब निंबोळियां मोडोनि आला, तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला…


