सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥417॥ तो आधीं जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला ॥418॥ तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥419॥ यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला । तरि अनुतापतीर्थीं न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥420॥ तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ । जन्मलेया फळ । तयासीच जोडलें ॥421॥ तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥422॥ हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा । जयाची अखंड आस्था । मजचिलागीं ॥423॥ अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी । जेणें मजमाजीं किरीटी । निक्षेपिली ॥424॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥31॥
तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसाही भाव तुज जाईल । हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ॥425॥ पैं सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे । तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहे ॥426॥ म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पांडुसुता । तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरुप माझें ॥427॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तें उगाणिलें मज कर्म, तेव्हाचि पुसिलें मरण जन्म…
अर्थ
अरे, मरणप्रसंगी जशी वासना असते, त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. याकरिता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्तीकरिताच खर्च केले ॥417॥ तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी, तो सर्वतोपरी उत्तमच आहे, असे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता, त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, ॥418॥ तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची (पूर्वीची) बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली; त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. ॥419॥ याकरिता पूर्वीचा दुराचरण करणारा असला तरी, नंतर त्याविषयीच्या पश्चात्तापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी (तो) माझ्या ठिकाणी अनन्य झाला, ॥420॥ तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. ॥421॥ त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपांची आचरणे केली किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. ॥422॥ अर्जुना हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. ॥423॥ हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून, ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली. ॥424॥
तो अल्पकाळात धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौंतेया, माझा भक्त (कधीही) नाश पावत नाही, हे तू निश्चयपूर्वक जाण. ॥31॥
तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल, अशीही कल्पना तुझ्या अंत:करणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहाणार्याला मरण कसे येईल? ॥425॥ ज्यावेळेस सूर्योदय नसतो, त्या कालास रात्र असे म्हणावयाचे, तसे माझ्या भक्तीवाचून जे जे करणे, ते ते महापातक नव्हे काय? ॥426॥ अर्जुना, याकरिता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूपसान्निध्य ज्यावेळेस प्राप्त होते, त्यावेळेसच खरोखर तो मद्रूप होतो. ॥427॥
हेही वाचा – Dnyaneshwari : परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं…
क्रमश:


