Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितअंतरीची खूण पटली...

अंतरीची खूण पटली…

दिप्ती चौधरी

बंगलोरला जाण्यासाठी आमची गाडी निघाली. प्रवास मोठा होता त्यामुळे त्या छोट्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे शक्य नव्हते.  त्यांच्याकडील मोठ्या पिंजऱ्यात आम्हाला ठेवणे भाग होते. वाटेत अदलाबदल करू असे ठरवून गाडी निघाली आणि आमच्या जन्मभूमीला… मुंबईला…. त्या सोसायटीला… आणि दुरून आम्हाला बघणाऱ्या डिगरला आम्ही अखेरचा दंडवत केला… एक आयुष्य मुळापासून बदलून टाकणारे वळण घेऊन आमचा प्रवास सुरू झाला..!

जवळ-जवळ चोवीस तास प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बंगलोरला पोहोचलो. प्रवासात आई सतत फोनवरून संपर्कात होतीच. आम्ही इमारतीत पोहोचताच आई आणि दिदी धावतच खाली आल्या. आमचा पिंजरा गाडीतून काढतच होते… आमचं पहिलं दर्शन आईला झालं तेव्हा मी पाय मुडपून बसलो होतो आणि डंपर माझ्या डोक्यावर बसला होता!

आम्हाला घरात घेताना आम्हाला कशा प्रकारे हळूहळू घराची ओळख करून रुळवायचे याची आखणी दिदी आणि आईने बरेच संशोधन करून ठरवून ठेवलं होतं. त्यानुसार प्रथम आमचे पिंजरे एका बाथरुममध्ये ठेवले. घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे जाळ्या लावून बंद केले होते. इतर कोणी चुकून उघडे ठेवू नये म्हणून जाळ्यांना सेलोटेप चिकटवून टाकली. पिंजऱ्यातून काढल्यावर आम्ही काय करू, हे सांगता येत नाही. उघड्या खिडकीतून पोबारा केला तर, परत येणे मुश्किल. मोठ्या खोलीत काही वेड्या वाकड्या उड्या मारल्या तर दुखापतीची भीती म्हणून छोट्या मोकळ्या जागेत  प्रथम मोकळे करून मग हळूहळू आमच्या इच्छेप्रमाणे बाकी भाग धुंडाळू देणे उत्तम…

पिंजऱ्यातून काढल्यावर लगेच आम्ही पळत बाहेर आलो. दूर उभे राहून आम्हाला आमच्या जागा पकडू दिल्या. कोणीही आमच्या जवळ यायचा प्रयत्न केला नाही. आधी शांत आवाजात बोलत राहिले, आम्ही थोडे सावरल्यावर थोडे खाणे, पाणी ठेवले. लिटर बॉक्स आधीच कोपऱ्यात होता. आम्हाला मातीची सवय असल्याने आधी बॉक्समध्ये फक्त माती होती, हळूहळू मातीचे प्रमाण कमी करून लिटरचे प्रमाण वाढत नेले. माती बघून पहिल्या वेळेपासूनच आम्ही न सांगता तिचा वापर करायला सुरुवात केली! आणि ठराविक ठिकाणी लिटर बॉक्स ठेवल्याने कधीच आम्ही कुठे घाण केली नाही

थोडावेळ आम्हाला एकटे सोडल्यावर आम्ही थोडे शांत झालो. मग आई हळूच आत आली,आमचा अंदाज घेतला. तिला कळले की, आम्ही तिला छानपैकी ओळखत होतो. जवळ येऊन तिने डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यानी जे सांगायचं होते ते आम्ही एकमेकांना सांगितले! अंतरीची खूण पटली…

आणि आमच्या वाटा आता एक झाल्या…


क्रमश:

(पिदू या मांजराची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!