डॉ. किशोर महाबळ
घराघरातील पालकांनी, मोठ्या माणसांनी मनावर घेतले तर लहान मुला-मुलींना वाचनाची आवड लावणे अगदी सोपे आहे. हे कसे साध्य करायचे याचा आता विचार करू…
सर्वप्रथम घरातील सर्व पुस्तके, ग्रंथ, पाठ्यपुस्तके, शब्दकोश, वर्तमानपत्रांचे अंक यासारखे वाचनीय साहित्य घरात एका विशिष्ट ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवण्यास सुरुवात करावी. शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी घरात, भरपूर खर्च करून जशी सोय केली जाते, तशीच आणि शक्य असल्यास त्यापेक्षाही उत्तम सोय, वाचनीय साहित्य ठेवण्यासाठी केली जावी. यामुळे वाचनीय साहित्य हे शोभेच्या वस्तूंपेक्षाही जास्त मौल्यवान आणि महत्त्वाचे आहे, या बाबीचा मुलांवर संस्कार होईल. खाण्यापिण्यावर, चैनीच्या वस्तूंवर आपण जेवढा खर्च करतो, त्याच्या कमीतकमी एक टक्का खर्च हा वाचनीय पुस्तकांवर, ग्रंथांवर, वर्तमानपत्र तसेच नियतकालिकांवर करायचा असे पालकांनी ठरवायला हवे. त्यानुसार नियमितपणे वाचनीय साहित्य विकतही घेतले पाहिजे. यामुळे मुलांनाही वाचनीय साहित्य विकत घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे कळेल.
गावात जर ग्रंथालय असेल तर अशा ग्रंथालयाचे घरातील मोठ्या माणसांनी आवर्जून सदस्यत्व घेतले पाहिजे. ग्रंथालयातून वाचनीय पुस्तके आणण्यासाठी जाताना घरातील लहान मुलांना सोबत नेले पाहिजे. लहान मुलांना भरपूर चित्रे असलेली पुस्तके बघायला आणि गोष्टी, चित्रमालिकांसह असलेल्या कथा, विनोदी साहित्य, विविध खेळांबद्दल, स्पर्धांबद्दल, खेळाडुंबद्दल वाचायला आवडते. साहस, पराक्रम, व युध्दाच्या कथा आवडतात. अशी पुस्तके ग्रंथालयातून कशी शोधायची हे मुलांना शिकवावे. त्यांना पुस्तके निवडायला सांगा ती पुस्तके घरी आणून वाचण्यास प्रोत्साहन द्या. शक्य असेल तेव्हा अशी मुलांच्या आवडीची तसेच आपल्याला चांगली वाटतील अशी पुस्तके विकतही घ्यावीत.
हेही वाचा – पाल्यांच्या शिक्षणासाठी टीका नको, प्रोत्साहन हवे!
अमूल्य माहिती, विचार, ज्ञान देणारे मराठी विश्वकोषाचे खंड महाराष्ट्र शासनाने अतिशय स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. ते एक एक करून जरूर विकत घेतले पाहिजेत. इतर पुस्तकांच्या तुलनेत ते अगदी कमी किमतीत मिळतात. ते आपल्या घरी असलेच पाहिजेत, असा प्रयत्न करायला हवा. या पुस्तकातील, ग्रंथांतील माहितीकडे मनोरंजक पद्धतीने लक्ष वेधले पाहिजे. काही भाग मोठ्या माणसांनी मुलांसोबत वाचावा. मुलांना वाचायला सांगावे आणि आपण श्रोता व्हावे. चांगले वाचन केल्याबद्दल प्रोत्साहन द्यावे. पुस्तके, मासिके यावरील खर्च ही मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने केलेली सर्वात मोठी गुंतवणूक मानली पाहिजे.
मुलांना वेळोवेळी असंख्य प्रश्न पडतात. त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे हवीच असतात. त्या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असतात. अनेकदा पालकांना हे प्रश्न ऐकून ऐकून कंटाळा येतो. मुलांनी प्रश्न विचारणे ही एक अतिशय चांगली गोष्ट मानली पाहिजे. या जिज्ञासेमुळे शिकण्याची इच्छा वाढत असते. विश्वकोशांच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची, हे शिकविता येते. माहिती कशी आणि कुठे शोधायची, हे शिकविल्यास मुले आपणहून त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधू लागतात. प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विश्वकोश बघता बघता त्यांच्या मनातील प्रश्नांची त्यांना जशी उत्तरे मिळतात, तसेच अनेक अन्य विषयांचा परिचय सुद्धा होतो. यामुळे मनात अधिक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता वाढते. उत्तर मिळाल्यावर मिळणारा आनंद त्यांनी एकदा का अनुभवला की, मग वाचनाची आवड वाढतच जाते.
लहान मुले घरात असताना पालकांनी तसेच घरातील अन्य सर्व मोठ्या माणसांनी वर्तमानपत्रे, मासिके किंवा आवडत्या विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी रोज काही वेळ काढायला हवा. या उपक्रमाची सुरुवात रोजचे वर्तमानपत्र विकत घेऊन ते वाचण्यापासून व्हावी. वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताज्या घडामोडींची आणि विविध विषयांची माहिती, नव्या काळातील आव्हाने, होणारे बदल कळतील. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, क्रीडा यासारख्या असंख्य विषयांवर विद्वानांचे, तज्ज्ञांचे लेख येतात. याशिवाय सुविचार, कथा, कविता असे अन्य बरेचसे वाचनीय साहित्य वर्तमानपत्रांतून प्रकाशित केले जाते.
पुस्तकांच्या तुलनेत वर्तमानपत्र हे अत्यंत स्वस्त असते. वर्तमानपत्र घेतल्याने रोज भरपूर वाचनीय साहित्य घरात येऊ लागेल. घरातील मोठ्या माणसांनी रोजच्या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या, चांगले लेख, कथा, कविता आणि आवडलेला मजकूर याकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. हे नियमितपणे होत गेले तर, लहान मुलांनाही वर्तमानपत्र वाचणे हे उपयोगाचे आणि महत्त्वाचे आहे हे कळू लागेल आणि आपोआपच ते वाचावे, असेही वाटू लागेल. मुलांसाठी असलेली पुरवणी मुलांनी जरूर वाचावी, यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिले तर मुले खरोखरीच वाचन करू लागतील. काय वाचले? जे वाचले ते आवडले का? आवडले असेल तर का आवडले? आवडले नसेल तर का आवडले नाही? हेही जाणून घ्यावे. त्यांच्या मतांवर कोणतीही टीका करू नये, उलट त्याबद्दल मुलांचे कौतुक केले पाहिजे.
वर्तमानपत्रातील आवडलेल्या मजकुराचे कात्रण काढून त्यांचा संग्रह करण्याची सवय मोठ्या माणसांनी लावून घ्यावी. वेगवेगळ्या विषयांनुसार स्वतंत्र फायलींमध्ये ही कात्रणे ठेवण्याचा नियम केला तर, घरातच विविध विषयांवरील वाचनीय साहित्याचा उपयुक्त संग्रह तयार होऊ शकतो. हे साहित्य मुलांना प्रकल्प तयार करण्यात उपयोगी ठरू शकते. असा संग्रह करण्यात मुलांना सहभागी करून घेणे उत्तम. यामुळे या वाचनीय साहित्याकडे तसेच त्यातील माहितीकडे मुलांचे लक्ष वेधता येऊ शकते. घरातच ग्रंथालय तयार झाल्याने विविध विषयांची माहिती मिळविण्याचे साधन उपलब्ध होईल.
हेही वाचा – माहिती तंत्रज्ञानातून सर्वोत्तम अध्यापन
प्रत्येक घरात एक तरी चांगला शब्दकोश असलाच पाहिजे. शब्दकोशातून शब्द व त्यांचा अर्थ कसा शोधायचा हे मुलांना शिकविले पाहिजे. एका शब्दाचा अर्थ शोधण्याच्या निमित्ताने अनेक शब्द सापडतात आणि त्यांचाही अर्थ बघण्याची उत्सुकता निर्माण होते. शब्दकोशांचा उपयोग केल्याने शब्दांचे विविध अर्थ कळतात. शब्दांचा योग्य उपयोग कसा करायचा हे कळते.
गावागावात आजकाल पुस्तकांची प्रदर्शने आयोजित केली जातात. अशा प्रदर्शनांना मुलांना जरूर नेले पाहिजे. त्यामुळे विविध विषयांवरील नव्या पुस्तकांची त्यांना माहिती होईल. त्या विषयाबद्दल समजून घेण्याची इच्छा होईल. लहान मुलांना आपणहून वाचण्याचा कंटाळा असतो, मात्र कोणी वाचून दाखविले तर हवेच असते. अशा मुलांना वाचनाची सवय लागण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींनी पुस्तके वाचून दाखविण्यात पुढाकार घ्यायला हवा. हे वाचन अत्यंत रंजकपणे आणि प्रभावीपणे होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. उत्तम कथा, कविता, निबंध प्रभावी भाषेत वाचून दाखविले तर मुले निश्चितच वाचनाचे महत्त्व ओळखू लागतात आणि वाचनानंद घेऊ लागतात. पालकांनी जर एवढे केले तर घराघरात वाचनाची संस्कृती विकसित होईल.


