सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हें असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥121॥ म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥122॥ जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली । तेंविं मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥123॥
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥9॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु । तेवीं सकळ कर्मा मीच शेवटु । तें काइ बांधती मातें ॥124॥ धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाघारीं । आंधारे रिगे ॥125॥ हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥126॥ एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं । एकु मीचि आहें अवधारीं । परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥127॥ दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥128॥ तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥129॥ हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्तीं । तेथ एकवेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥130॥
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद् विपरिवर्तते ॥10॥
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥131॥ कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती । घडे यया ॥132॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें विरजणियाचेनि संगें, दूधचि आटेजों लागे…
अर्थ
स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना अथवा लहानांना, हे राहू दे, सर्व भूतसमुदायास प्रकृतीच मूळ आहे. ॥121॥ म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. ॥122॥ पाण्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढवण्याचे काम जसे चंद्राने केले नाही, त्याप्रमाणे (जगाची उत्पत्ति, स्थिति वगैरे) कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे. ॥123॥
आणि हे धनंजया, या (जगदुत्पत्ति-संहारात्मक) कर्माच्या ठिकाणी अनासक्त आणि उदासीनाप्रमाणे असलेल्या मला, ही कर्मे बंधन करू शकत नाहीत. ॥9॥
आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून धरू शकत नाही, (कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो). त्याप्रमाणे सर्व कर्मांची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर, ती कर्मे मला काय बांधणार? ॥124॥ धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणार्या वार्यास थांबवील अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील, ॥125॥ हे राहू दे, पावसाच्या धारा पर्वताच्या पोटातील पदार्थांना खुपत नाहीत, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कर्ममात्र मला बांधू शकत नाही. ॥126॥ एरवी, या प्रकृतीच्या विचारामध्ये (जगामध्ये) मीच एक आहे, हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वत: काही करीत नाही अथवा दुसर्याकडून काही करवीत(ही) नाही. ॥127॥ घरात ठेवलेला दिवा, कोणाला तू अमूक एक काम कर, असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काही काम करत असले तर, त्याचे निवारण करीत नाही, आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे, तेही जाणत नाही ॥128॥ ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणार्या कर्मांमध्ये मी उदासीन आहे. ॥129॥ हा एकच विचार पुन: पुन: अनेक युक्तिप्रयुक्तीने काय सांगू? अर्जुना येथे (आणखी) एवढे समज म्हणजे झाले. ॥130॥
हे कुंतीपुत्रा, माझ्या आश्रयाने माया चराचर जगत् निर्माण करते. या कारणामुळे जगाची घडामोड होते ॥10॥
ते हे की, लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्तमात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना, जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे, असे समज. ॥131॥ कारण की, मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते; म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे, असे युक्तीला जुळते. ॥132॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी, समुद्र भरतें अपार दाटी…


