मानसी देशपांडे
कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे मातृत्व… असं म्हणतात, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी…’ आई होणं खरंच सोपं असतं का? अजिबात नाही. आज माझ्यावरून हे जाणवत आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात तसं, “आपल्या जोडीदाराचं मुल वाढवणं म्हणजे त्याला अंश रुपाने स्वतःच्या शरीरात जागा देणं. स्त्री ही काही प्रमाणात आपल्या जोडीदाराची आई देखील होते. जेव्हा जेव्हा ती संघर्षासाठी उभी असते, तेव्हा ते नाते भलेही पत्नीचे असेल, पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करते, तेव्हा ते नाते आईचेच असते…” गरोदरपणात किती बदल होतात शरीरात ते प्रत्येक स्त्री अनुभवत असते. कधी खूप राग येतो, तर कधी मन आनंदात असते. भावनांचा आवेग त्या वेळी तरी आवरता आणि सावरता येत नाही हे खरं…
हेही वाचा – विष्णूरुपी जावई…
जसं म्हणतात, डिलिव्हरी म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म, होयच मुळी! कारण, एका नवीन जीवासाठी ती आता जगणार असते. त्याच्या एका स्पर्शाने साऱ्या कळांचा तिला विसर पडतो. पण त्याच्या जन्माच्या आधी अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जाताना ती थकून जाते. उदाहरणार्थ, साधी कूस बदलताना देखील पोटावर हात ठेवावा लागतो, कारण गर्भाचे येणारे प्रेशर हे तेव्हा जास्त असते. खूप वेळा विनाकारण डोळ्यांतून पाणी येते, मनातलं बोलावंसं वाटतं… तेव्हा गरज असते ती जोडीदाराची… कारण, त्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचं माणूस तोच असतो! शब्दांत व्यक्त करता येत नाही त्या भावना… पोटात असणारं बाळ हालचाल करतं, तेव्हा वाटतं ते देखील मूक संमती देत आहे. म्हणून मला इथे व.पुं.चा हा विचार अगदी पटतो, “नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकलं की, ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं…”
हेही वाचा – सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला…
पण काही म्हणा, त्या आतल्या इवल्याशा बाळाच्या हालचाली जेव्हा जाणवायला लागतात, तेव्हा काही वेगळंच वाटतं. न बोलता पण हालचालीतून ते सगळं बोलतं. हे सुखच काही निराळं नाही का! म्हणून तर छोटुशा त्या जीवाकडे बघून सहज ओळ मनात येते आणि जन्म कृतार्थ झाल्यासारखा वाटतो,
बाळा होऊ कशी उतराई,
तुझ्यामुळे मी झाले आई…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


