Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितभीती… लेक तन्वीचं वक्तव्य ऐकून शैलेश चमकला!

भीती… लेक तन्वीचं वक्तव्य ऐकून शैलेश चमकला!

दीपक तांबोळी

भाग – 2

नऊ वाजता तेजलने ओरडूनच तन्वीला जेवायची तयारी घ्यायला बोलावलं. तन्वीने पटकन जाऊन टेबलवर ताटं घेतली. पाण्याचा तांब्या, ग्लास घेतले. मयूरला बोलावलं. खरंतर, दोन्ही पोरं भुकेने कासावीस झालेली. पण ‘भूक लागली’ असं आईला सांगितलं तर, ती चिडते हे बऱ्याच महिन्यांपासून ती बघत आली होती, त्यामुळे भूक लागूनही ते एकही शब्द तोंडातून काढत नसत.

तन्वीने तिला आणि भावाला वाढून घेतलं. मयूरने जेवायची सुरुवात केली. तन्वी पहिला घास घेणार तेवढ्यात तेजलने विचारलं,

“तन्वी ताटं पुसली होती?”

तन्वीच्या हातातला घास हातातच राहिला.

“नाही.”

तेजलचा पारा एकदम चढला, “कारटे तुला किती वेळा सांगितलं, वाढून घ्यायच्या आधी ताटं पुसत जा म्हणून. कधी वळण लागणार आहे तुला? एवढी दहा वर्षांची झाली तरी अक्कल नाही आली तुला. इथे मी मरमर करते आणि तुला एवढंही काम जमत नाही? आता रडतेस काय? जेव मुकाट्यानं…”

तन्वीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. बहिणीला रागावलं म्हणून मयूरही मुसमुसत होता. भूक लागलेली असूनही परत काही न मागता दोघं ताटात वाढलेलं संपवून उठले. टेबल आवरून तन्वी मयूरला घेऊन बेडरुममध्ये गेली.

“ताई गोष्ट सांग ना! मला आज झोप येत नाहिये.”

“आज नको बाळा, उद्या नक्की सांगेन हं. बाबा आले ना की, मी त्यांना आईबद्दल सांगणार आहे…”

“नक्की सांग बरं का! आई खूप त्रास देते, असं सांग. आम्हाला व्यवस्थित जेवू पण देत नाही.”

“बरं बरं… सांगते. तू झोप आता.” त्याला थोपटत ती म्हणाली. तो झोपला तशी ती बाहेर हॉलमध्ये बसून बाबांची वाट बघत बसली.

शैलेश साडेनऊला आला. पण आल्या आल्या तेजलला म्हणाला,

“तेजू मी फ्रेश होतो, तोपर्यंत जेवणाची तयारी कर. मला खूप भूक लागलीय आणि झोपही येतेय. खूप थकलोय आज. आज नेहमीची लोकल चुकली. दुसऱ्या लोकलला जागाच नव्हती. कल्याणपर्यंत उभा राहून येतोय बघ…”

हेही वाचा – भीती… दोन चिमुरड्यांच्या मनातली!

मग एक थकलेली नजर तन्वीकडे टाकून तो म्हणाला,

“बेटा मयूर झोपला? आणि तू अशी रडवेली का दिसतेय?”

तन्वी काही बोलणार तेवढ्यात तेजल मधेच म्हणाली,

“काही झालं नाही. मी तिला जरा ताटं पुसण्यावरून रागावले म्हणून ती रडली.”

शैलेशने तन्वीला जवळ घेतलं… “बेटा असं थोड्या थोड्या गोष्टींनी रडायचं नसतं. अगं, आमचे वडील तर आम्हाला इतके मारायचे की, दोन-तीन दिवस सगळं शरीर दुखायचं. पण आम्ही इतके बेरड की, परतपरत त्याच खोड्या करायचो!”

“बघा ना. माझी आई तर हेडमास्तरीणच होती. आम्हाला ती विद्यार्थीच समजायची. उठसूठ मारायची. चिमटे काय घ्यायची. तुम्हाला तर एवढंसं रागावलं तर तोंड फुगवून बसता…”

आई समोर असताना बाबांना तिच्याबद्दल काही सांगणं शक्य नाही, हे तन्वीच्या लक्षात आलं. तिनं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड बंद केलं. तन्वीला काहीतरी बोलायचं होतं, पण ती बोलू शकली नाही, हे शैलेशच्या ध्यानात आलं. तो तिला म्हणाला,

“बरं बेटा, मी उद्या बोलेन हं तुझ्याशी. आज खूप थकलोय मी…”

बापापुढे तन्वी काय बोलणार होती? ती बिचारी उठली आणि बेडवर जाऊन झोपली. एक मात्र खरं की, बापाच्या शब्दांनी आणि त्याने जवळ घेतल्यामुळे तिच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली होती…

दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेश कामावर जायला निघत असतानाच तन्वी बाहेर आली आणि शैलेशला म्हणाली,

“बाबा संध्याकाळी लवकर याल ना?”

“का गं बेटा?”

“तुम्ही काल म्हणाला होता ना की, मी तुमच्याशी उद्या बोलेन…”

शैलेशला ते आठवलं आणि त्याला हसू आलं… “अगं बेटा, मी ते सहज बोललो होतो.”

तेवढ्यात छोटा मयूर डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, “बाबा लवकर या ना घरी. आम्हाला खूप भीती वाटते…”

तन्वीने डोळे वटारले तसा मयूर चूप झाला. शैलेश खाली वाकून बुटाची लेस बांधत असल्यामुळे त्याचं तन्वीच्या वटारलेल्या डोळ्यांकडे लक्ष गेलं नाही.

“बरं बेटा, प्रयत्न करतो. बाय… हॅव अ नाईस डे!”

तो निघाला तसा दोन्ही मुलांनी निरोपाचा हात हलवला.

शैलेश बोलला खरा, पण लवकर काही येऊ शकला नाही. तो रात्री दहाला आला, तेव्हा दोन्ही मुलं झोपून गेली होती. जेवता जेवता तो तेजलला म्हणाला,

“तेजू मुलं काही तरी दडपणाखाली आहेत असं वाटतं. मयूर म्हणत होता की, त्यांना भीती वाटते म्हणून. कसली भीती वाटत असेल त्यांना?”

“काय माहीत!” तेजू फणकाऱ्याने म्हणाली, “इथे मीच नेहमी भीतीखाली वावरत असते. त्यांची भीती जाणून घेऊन काय करू?”

अजून काही बोललं तर, ही जेवताना भांडत तर बसेलच शिवाय दुसऱ्या दिवशीही तोंड फुगवून बसेल, या भीतीने शैलेश चूप बसला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेश जायला निघाला तेव्हा मुलं उठली होती, पण तेजल समोर असल्यामुळे काही बोलली नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलातरी ताण आहे, हे शैलेशच्या लक्षात आलं.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे आवराआवर करून तन्वी आणि मयूर तेजलची वाट बघत बसले होते. अचानक मयूर तन्वीला म्हणाला,

“ताई खूप गरम होतंय मला, सरबत करून दे ना!”

“आता थोड्या वेळाने जेवायचंच आहे ना बाळा. आता कशाला सरबत पितोस?”

“दे ना ताई प्लीज. मला भूकही लागलीय…”

“ठीक आहे, आणते.”

ती आत गेली आणि स्वतःसाठी आणि मयूरसाठी सरबताचे ग्लास घेऊन आली. मयूरने टीव्हीवर कार्टून सीरियल लावली होती. ती बघता बघता तो उभं राहून सरबत पित होता. टीपॉयला धक्का लागून त्याच्या हातातलं थोडं सरबत टाइल्सवर पडलं. तन्वीच्या ते लक्षात आलं, पण कार्टून बघण्याच्या नादात ते पुसायचं तिच्या लक्षात आलं नाही.

दारावरची बेल वाजली. तसं तन्वीने घाईघाईने टीव्ही बंद केला. दार उघडलं. तेजल उभी होती. नेहमीप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावर चिडके भाव होते. तन्वी भिऊन तिच्या वाटेतून दूर झाली. तेजलने पर्स टीपॉयवर ठेवली आणि जशी ती आत जाऊ लागली, मयूरने गुळगुळीत टाइल्सवर सांडलेल्या सरबतावरून तिचा पाय सरकला आणि ती जोरात कमरेवर आपटली.

“आई गंSSS” ती किंचाळली तशी तन्वी धावत आईजवळ गेली. टीपॉयजवळ सांडलेलं सरबत तिला दिसलं, तशी मयूरची आता काही खैर नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती थरथर कापू लागली. तेजलच्या हाताला ते चिकट सरबत लागलं. त्याचवेळी मयूरच्या हातातल्या सरबताच्या ग्लासकडे तिचं लक्ष गेलं आणि आपण कशावरून घसरलो, हे तिच्या लक्षात आलं. संतापाने तिचा चेहरा वाकडा झाला.

“कार्ट्या तू सांडलं ना हे सरबत?” ती जोरात किंचाळली. मयूर घाबरुन थरथर कापू लागला. तेजल उठली  मयूरच्या हातातला ग्लास हिसकावून तिने जोरात जमीनीवर आपटला. सगळीकडे काचांचे तुकडे पसरले. मयूरला मारण्यासाठी ती काहीतरी शोधू लागली. समोरच स्टिलची पट्टी होती, ती तिने उचलली… मयूरला डाव्या हाताने धरून उजव्या हातातल्या पट्टीने ती त्याच्या पाठीवर सपासप मारू लागली. तोंडाने बडबड सुरूच होती… तन्वीने ते पाहिलं आणि तिच्या हातापायातलं जणू त्राणच नाहीसं झालं… वर्तमानपत्रातल्या बातम्या तिच्या डोळ्यासमोर आल्या आणि आई आज आपल्या लाडक्या भावाला मारून टाकणार तर नाही ना, अशी तिला भीती वाटू लागली. त्या कल्पनेने तिचे हातपाय लटपटू लागले. घशाला कोरड पडली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अचानक कसल्याशा उर्मीने तिनं रडणं थाबवलं. आईला कसंही करून थांबवायला पाहिजे, हे तिच्या लक्षात आलं. काय सांगता येतं? संतापात ती मयूरला गच्चीवर घेऊन जाईल आणि खाली फेकून देईल. या विचारासरशी ती आईजवळ धावत गेली आणि तिचा पट्टी घेतलेला हात धरून ती रडतरडत म्हणाली,

“आई नको मारू ना. आई लहान आहे गं तो… प्लीज, आई नको मारू ना त्याला!”

तेजलने तिच्या हाताला हिसका दिला आणि ती परत मयूरला मारणार तशी तन्वी त्याला पाठीशी घेऊन तिच्या समोर उभी राहिली आणि त्वेषाने म्हणाली,

“तुला मारायचंच आहे ना तर, मला मार. मारून टाक मला. पण त्याला मारू नको. किती छोटा आहे गं तो…”

हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!

तिच्या “मारून टाक” शब्दांवर तेजल चमकली. पट्टी घेतलेला तिचा हात हवेतच राहिला…

“काय म्हणालीस तू? मारून टाक म्हणालीस ना?”

“हो. तेच म्हणाले मी. घेऊन जा मला गच्चीवर आणि फेकून दे मला खाली. पण त्याला नको मारू ना आई…”

“कारटे…” असं म्हणून तेजल तिला मारणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने तन्वी आणि मयूर दोघंही क्षणभर रडायचे थांबले.

तेजलने पट्टी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये टाकली आणि तन्वीकडे पाहून ओरडली,

“जा, बघ कोण आलंय ते…”

तन्वी मयूरकडे वळली. त्याला तिने उचलून घेतलं आणि खाली पडलेल्या काचा चुकवत दरवाजाकडे निघाली. दरवाजा उघडून पहाते तो शैलेश उभा होता. त्याला पहाताच दोन्ही मुलं “बाबाSSS”  असं जोरात ओरडून त्याला बिलगली आणि ढसाढसा रडू लागली. शैलेशने मयूरला उचलून घेतलं तसा तो त्याच्या गळ्याला मिठी मारून जोरजोरात रडायला लागला. शैलेशने तन्वीला जवळ घेऊन आत आणलं. सोफ्यावर बसवलं. घरभर पसरलेल्या काचा पाहून त्याने तेजलला विचारलं,

“काय झालं तेजू? मुलं रडताहेत. सगळीकडे काचा पडल्याहेत. काय आहे हे?”

“त्यांनाच विचार. नालायक कुठले! फार शेफारुन ठेवलंय तू शैलेश त्यांना,” तेजल संतापून म्हणाली.

तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याने तन्वीला विचारलं, “काय झालं तन्वी बेटा?”

तन्वीला भडभडून आलं. रडतरडतच ती म्हणाली, “मयूरच्या हातून टीपॉयजवळ सरबत सांडलं. आई आली, तिचा पाय त्यावर पडला आणि ती घसरून पडली. तर, ती ना मयूरला पट्टीने जोरजोरात मारायला लागली. मी तिला मारू नकोस म्हणत होते, पण ती ऐकतच नव्हती. ती मयूरला मारून टाकणार होती…”

ते ऐकून शैलेशला धक्काच बसला. त्याने चमकून तेजलकडे पाहिलं…

क्रमश:


मोबाइल – 9209763049

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!