Thursday, February 5, 2026

banner 468x60

HomeललितBookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!

Bookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!

डॉ. अस्मिता हवालदार

लेखिका वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1981 साली आली. त्यावेळी लगेच ते आमच्या घरी आलं, तेव्हा मी सहावी-सातवीत असेन… आई-बाबा दोघेही या पुस्तकाबद्दल बोलत असायचे आणि त्यांच्या सवयीप्रमाणे कोणाकोणाला सांगतही असायचे! त्यामुळे कुतूहलापोटी हे पुस्तक वाचलं. आईने लिहिलेली प्रतिक्रिया दुसऱ्या आवृत्तीच्या मलपृष्ठावर छापली आहे…

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एकोणीसाव्या शतकातले अमेरिकेतले प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ. हा ज्ञानयोगी संतच. कृष्णवर्णी गुलाम आईच्या पोटी जन्म झालेला हा दुबळा मुलगा पुढे विश्वविख्यात झाला. एकेकाळी अन्नान्न दशा असलेला तो अनेकांसाठी अन्नदाता झाला. ही विलक्षण कहाणी जिद्दीची, परिश्रमांची, बंधुभावाची, माणुसकीची, प्रखर बुद्धिमत्तेची आणि देशप्रेमाची सुद्धा! सध्या आपण अशा जगात राहात आहोत, जिथे माणूस सोडून इतरांना जगण्याचा अधिकार नाही, हे गृहितक आहे. सर्व सृष्टीला ओरबाडून स्वार्थासाठी वापरणे आणि भौतिक सुखे मिळवण्यात कृतार्थता मानणे, ही आपली संस्कृती (!) झाली आहे. त्यामुळे कार्व्हरचे जीवन कल्पनातीत आहे.

अमेरिकेतल्या मिझुरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह गावात असलेल्या कार्व्हर कुटुंबाच्या घरातील गुलाम मेरीचा हा मुलगा. तो दोन वर्षांचा असताना मेरीला डाकू पळवून घेऊन गेले, वडिलांचा आणि बहिणीचा मृत्यू झाला. मोठा भाऊ जिमी वाचला. हा मुलगा जॉर्ज दमेकरी असल्याने वाचणे शक्य नव्हते, पण कार्व्हर कुटुंबाने प्रेमाने सांभाळ करून त्याला जगवले. त्याच्या हातात एक जादू होती – झाडांना जगवण्याची! झाडांशी बोलण्याची कला होती. त्याची बुद्धिमत्ता त्यांनी ओळखली. त्याला शाळेत पाठवले. शाळेत नाव ‘कार्व्हरांचा जॉर्ज’ असे सांगितले. कारण गुलामाला कुठले आडनाव? शेवटी तेच आडनाव झाले.

दुसऱ्या गावात याच नावाचा एक गोरा माणूस राहत होता. गोंधळ होऊ नये म्हणून याने नावात W अक्षर घुसवले ज्याचे झाले वॉशिंग्टन. त्याच्यात चित्रकला, गायनकला हे गुण उपजत होते. हे गुण ओळखणारे लोक, त्याचा प्रेमाने सांभाळ करणारे लोक त्याला मिळत गेले. एका कॉलेजने तो निग्रो आहे म्हणून प्रवेश नाकारला. पुढे सिम्पसन कॉलेजने प्रवेश दिला, पदवी मिळाली. पुढे प्राध्यापकी, पदव्युत्तर शिक्षण मिळाले. वीणा गवाणकरांनी त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींना भारतीय साज चढवत सुझन बाई, मोझेस बाबा, मारिया आत्या असे संबोधले आहे, त्यामुळे चरित्राबद्दल आपलेपणा वाटू लागतो. कथेसारखे सांगितल्यामुळे लालित्य आले आहे. सतत आश्चर्यचकित करणारी माहिती समोर येत राहते.

हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!

अलाबामा राज्यात बुकर टी. वॉशिंग्टन आणि जॉर्ज कंम्बल यांनी मिळून सुरू केलेल्या निग्रोंच्या शाळेत शिकवण्यासाठी बोलावणे आल्यावर बाकी मोठ्या वेतनाची प्रलोभने दूर ठेवून आपल्या लोकांसाठी हे काम स्वीकारले. पीएच डी सुद्धा केले नाही. अलाबामाची जमीन कपाशीच्या पिकांमुळे नापिक झाली होती. कार्व्हर म्हणाले, माझ्यापुढे दोन पर्याय होते – रडत बसायचं नाहीतर, जमीन सुधारायची. मी दुसरा पर्याय निवडला. त्यांनी शेतकर्‍यांना वेगवेगळी पिके घ्यायला शिकवलं आणि त्या पिकांपासून शेकडो पदार्थ तयार करून बाजारपेठ मिळवून दिली. मातीतून गडद निळा रंग मिळवला. कचऱ्यातल्या वस्तूंमधून प्रयोगशाळा तयार केली. त्यांचे विद्यार्थी यातून शिकले की, साधनसुविधांच्या कमतरतेवर मात करायला हवी.

ते म्हणत, प्रत्येकाच्या ताटात अन्न कसे पडेल याचा विचार व्हायला हवा. त्यांनी कधीही आपल्या शोधांचे पेटंट घेतले नाही, कारण अत्यल्प दरात सर्वांना वस्तू मिळून फायदा व्हायला हवा. पृथ्वीवरचे प्रत्येक बीज कशा न कशासाठी वापरता येते, असे ते म्हणत. निसर्ग प्रक्षेपण करत असतो, आपण समजून घ्यायला हवे.

त्यांना मित्रांनी दिलेला कोट त्यांनी अठ्ठावीस वर्षं वापरला. त्यांना वेतनवाढ दिली तर ती नाकारली. साठाव्या वर्षी सुद्धा ते सामान उचलून सगळीकडे जात. त्यांच्या गबाळ्या कपड्यांमुळे नवखे लोक त्यांना ओळखत नसत. इतक्या वर्षांच्या शाळेच्या सेवेत त्यांनी फक्त दोन दिवस राजा घेतली – एकदा त्यांच्या प्रेमिकेबरोबर विवाह न करण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी आणि एकदा तिच्या मृत्यूची बातमी आली त्या दिवशी. कुठेही मानसन्मान मिळाला, भाषणासाठी बोलावले की माझ्या गरीब बांधवांना यातून काय फायदा मिळेल, याचा विचार करत आणि कधी एकदा परत प्रयोगशाळेत जातो, असे त्यांना होत असे. काळ्या रंगामुळे काही वेळा अपमानास्पद वागणूक मिळे, काही वेळा रस्त्यातील हॉटेल्स निग्रोना प्रवेश नाकारत, त्यामुळे खाण्याचे हाल होत असत. पण त्यांनी हे टाकीचे घाव शांतपणे सोसले. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कार्व्हरना त्यांच्या शिक्षकांनी विल्सन यांनी संगीत शिकायला सांगितले होते, तेव्हा ते म्हणाले, “माझ्या ज्ञानाचा माझ्या बांधवाना उपयोग होईल तेच करेन. कृषिविद्या शिकेन.” पुढे डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांनी त्यांना शिकवायच्या जबाबदारीतून मुक्त करून केवळ संशोधन करायला मुक्त केले, तेव्हा त्यांना अत्यानंद झाला.

त्यांना निसर्गाने अनेक देणग्या दिल्या होत्या, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा आपल्या बांधवांना करून दिला. त्यांच्याकडची सर्वात मोठी देणगी होती सहृदयतेची, विनम्रतेची आणि ज्ञानलालसेची. केमर्जी ही शाखा त्यांनी सुरू केली. रसायनशास्त्राचा व्यावहारिक जगात वापर, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. कार्व्हर यांनी महात्मा गांधींना काही वनस्पतीजन्य औषधे सुचवली होती, जी भारतात सहज मिळतील.

कार्व्हर यांना माहीत नसलेले झाड नसेलच! त्यांनी कवकशास्त्राचा अभ्यास केला होता. एकदा वाणसामानाला गुंडाळलेल्या दोऱ्यात त्यांना बुरशी आढळली. ती पिकांसाठी अत्यंत घातक आहे, असे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना उत्तम मालिश करता येत असे. दुखरी नस पकडता येत असे. त्यांनी पोलिओ झालेल्या मुलाच्या पायात ताकद भरली, त्याला उभे केले. त्यानंतर अशा रुग्णांची त्यांच्याकडे रीघ लागली. असे कसे करता आले? याचे उत्तर वैद्यकीय स्नातकांना सापडले नाही, पण परिणाम डोळ्यासमोर दिसत असल्याने मान्य करावे लागले. भुईमुगाचे तेल ते मालिशसाठी वापरत.

सर्व संशोधनांचे श्रेय ते बायबलला देत. “तुम्ही समाजासाठी खूप केले आहे…” असे कोणी म्हणाले की, त्यांचे उत्तर असे, “देवाला हे करून घ्यायचे होते. त्याने मला निवडले इतकेच.” इतकी निगर्वी वृत्ती कुठून येते?

खरेतर, किती सांगावे त्यांच्याबद्दल! अर्जुनाने भगवंतांना ‘’स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे?’’ असा प्रश्न विचारला होता. याचे उत्तर कदाचित त्यांना कार्व्हरकडे पाहून मिळाले असते. “जेव्हा सारे जग साखरझोपेत असे तेव्हा ते निसर्गाच्या सानिद्ध्यात त्याची रहस्य जाणून घेत असत,” असे लेखिका म्हणते. हेही एका स्थितप्रज्ञाचे लक्षण आहे. असे एक डझन कार्व्हर देशाला मिळाले तर… असे डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन म्हणाले होते. अशी माणसे देश घडवतात, वसुधैव कुटुंबकम मानतात. त्यांनी शेवटी जाण्यापूर्वी सगळी कमाई राष्ट्राला दान दिली. त्यांनी पेटंट घेतले असते तर, कितीतरी पैसा जमा झाला असता, तोही राष्ट्रासाठी वापरता आला असता, अशीही टीका झाली होती. जे असे बोलले त्यांना कार्व्हर कळलेच नाहीत, असे म्हणावे लागेल.

हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’

पुस्तकाला इतका वेग आहे की, एका बैठकीत वाचावेसे वाटते. मला हा सारांश सुद्धा फार तोकडा वाटतोय इतके काही पुस्तकात लिहिलेले सांगण्यासारखे महत्त्वाचे राहून गेले. लेखिकेने त्यांची ओळख आपल्याला करून दिली यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार.

बा. भ. बोरकर म्हणतात,

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती

वाळवंटातूनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

जॉर्ज वॉन्शिन्ग्टन कार्व्हर या विलक्षण विज्ञानवंतांचेच जणू हे वर्णन आहे. पुस्तक वाचल असेलच… नसेल तर नक्की वाचा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!