Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » निमित्त बँक अकाऊंटचे… राज आणि नेहाच्या भेटीचे!
    ललित

    निमित्त बँक अकाऊंटचे… राज आणि नेहाच्या भेटीचे!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 3, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, राज नेहा, राज रीना, कॉलेजचे प्रेम, कॉलेजचे मित्र, कॉलेज मित्रांचे गेटटुगेदर, राजची फसवणूक, नेहाचा घटस्फोट, रीनाचा घटस्फोट,
    फोटो सौजन्य - AI निर्मित
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर, पुणे

    सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी रीना बँकेत आली. अकाऊंट उघडण्याचा फॉर्म तिने भरला आणि महत्त्वाचं काम असल्याने ती घाईघाईत बँकेतून बाहेर पडली. रीनाचा फॉर्म चेक करताना मॅनेजर साहेबांचे लक्ष तिच्या जन्मतारखेकडे वेधले गेले, कारण रीनाची आणि त्यांची जन्मतारीख एकच होती.

    मॅनेजर साहेबांनी रीना मॅमला फोन केला आणि सांगितले की, “मी बँकेतून बोलतोय. मॅम, तुम्ही तुमच्या सोसायटीचे नाव दिले आहे, पण फ्लॅट नंबर दिला नाही.”

    “साहेब, मी बँकेत येऊन फॉर्म अपडेट करून देऊ का?”

    “नको नको, मी ॲड करतो. तुम्ही फ्लॅट नंबर सांगा.”

    “फ्लॅट नंबर 21.”

    “ऑनलाइन बँकिंगसाठी मला तुमच्या आईंचे नाव सांगा.”

    “सावित्री जोशी.”

    “थॅंक्स. अकाऊंट डिटेल्स तुम्हाला एक-दोन दिवसांत मिळतील.”

    साधारणतः दोन महिन्यांनी रीनाला बँक मॅनेजर साहेबांचा फोन आला.

    “मॅम, पुढच्या रविवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही आमच्या निवडक कस्टमर्सना डिनरसाठी हॉटेल डायमंडला बोलावले आहे. तुम्ही याल का? संध्याकाळी साडेसहाला तुम्हाला घ्यायला तुमच्या घरी कार येईल आणि डिनरनंतर तुम्हाला घरी सोडले जाईल.”

    “मी अवश्य येईन,” रीना म्हणाली.

    निळ्या रंगाची सुंदर साडी नेसून रीना हॉटेल डायमंडला बरोबर सात वाजता पोहोचली. रिसेप्शनिस्टने मोगऱ्याचा गजरा देत रीनाचे स्वागत केले आणि तिला एका प्रशस्त हॉलमध्ये नेले. तिथे मांडलेल्या खुर्च्यांवर वेगवेगळी नावे लिहिली होती आणि मधल्या खुर्चीवर रीनाचे नाव होते. खुर्च्यांवरील पुरुषांची तसेच स्त्रियांचीही नावे रीनाला ओळखीची वाटली, एम.कॉम. करताना तिच्याबरोबर असलेल्या नाशिकच्या कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या नावांसारखीच. आपल्या कॉलेजमधील मैत्रिणींची आतापर्यंत नक्कीच लग्नं झाली असतील आणि त्यांची नावेही बदलली असतील. सारखी नावे हा योगायोग असावा. कदाचित, यातील काही आपले मित्र-मैत्रिणी असतील. बघूया, थोड्याच वेळात समजेल.

    हेही वाचा – आभास… की वास्तव?

    “ही मंडळी कुठे आहेत? अजून आले नाहीत का?” रीनाने विचारले.

    “रीना मॅम, या लिहिलेल्या नावांपैकी बहुतेक सर्व येतील. तोपर्यंत तुम्ही ऑरेंज ज्यूस घ्या ना.”

    पुढच्या पाच मिनिटांत चार पुरुष आले आणि काय तो योगायोग! सर्व रीनाचे वर्गमित्र. मस्त गप्पा रंगल्या.

    “रीना, तू तर पूर्वाश्रमीची नेहा ना? लग्नानंतर नवऱ्याने नाव बदललेले दिसते. अगदी तेव्हासारखीच सुंदर दिसतेस, काहीच बदल नाही. इतकी वर्षे कुठे गायब होतीस? नवरा काय करतो?”

    नेहा काहीच बोलली नाही.

    नंतर एकेक करत चार जणी आल्या आणि त्याही रीनाच्या वर्गमैत्रिणीच!

    “ए, तुम्ही अजून लग्न केले नाही?” रीनाने आश्चर्याने विचारले.

    “आमचे लग्न झाले आहे,” सर्वजणी एकसुरात म्हणाल्या.

    “मग लग्नानंतर नाव बदलले नाही?”

    “हो, बदलले की. पण आम्ही मॅनेजर साहेबांना आमची लग्नाआधीची नावे लिहायला सांगितले.”

    “आम्ही तुला नेहाच म्हणू चालेल ना?”

    “चालेल नाही, पळेल,” नेहा म्हणाली.

    “एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, आपल्या सगळ्यांची अकाऊंट्स एकाच बँकेत आहेत आणि मॅनेजर साहेबांनी बरोबर आपल्यालाच आमंत्रित केले. आपले होस्ट कुठे आहेत?” नेहाने विचारले.

    “ते येतीलच थोड्या वेळात. तोपर्यंत आपण एम.कॉम. नंतर काय केले, कुठे सर्व्हिस केली, लग्न केले का, कधी केले, जोडीदार कोण, काय करतात वगैरे सांगूया. नेहा, सुरुवात तुझ्यापासून करूया,” वरद म्हणाला.

    “कॉलेजनंतर आपण आठ वर्षांनी प्रथमच भेटतोय. मला तुम्हा सर्वांबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी सगळ्यांत शेवटी बोलेन,” नेहाने सांगितले.

    सगळ्यांचे सांगून झाल्यावर त्यावेळची कॉलेजक्वीन नेहा बोलायला उठली.

    “मित्रांनो, आपल्या वर्गातील सर्वात हुशार मुलगा राज कुठे असतो? काय करतो तो? त्याने लग्न केले का?”

    “नेहा, कॉलेज संपल्यावर राज एकदा भेटला होता आणि तुझ्याशी लग्न करणार असे म्हणाला होता. तुझ्या आई-बाबांनी लग्नाला परवानगी दिल्याचे त्याने मला सांगितले होते. पण तू तर दुसऱ्याच मुलाशी लग्न केलेस. का? काय झाले? राजशी काही बिनसले का? की त्याने फसवले तुला?”

    “राज कुणाला फसवू शकेल का रे? किती साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा आहे तो. त्याने नाही, पण माझ्या आई-बाबांनी त्याला फसवले. ‘राज, तू नोकरी मिळव, स्थिरस्थावर हो आणि दोन वर्षांनी तू आणि नेहा लग्न करा,’ असे त्यांनी सांगितले होते. पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. फारशी चौकशी न करता घाईघाईत माझे लग्न अमेरिकेतील एका मुलाशी लावून दिले.”

    हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

    “मी अमेरिकेत गेले आणि लवकरच मला माझ्या नवऱ्याच्या गैरवर्तनाची आणि व्यसनांची माहिती मिळाली आणि आम्ही वेगळे राहू लागलो. त्यानंतर त्याने माझी कधीही चौकशी केली नाही. तीन महिन्यांपूर्वी मी अमेरिका सोडली आणि मागच्याच आठवड्यात तो भारतात आला असताना आम्ही विभक्त झालो. अजून मी कागदोपत्री नाव बदललेले नाही. पण आता मी रीना कुलकर्णी नाही, तर मी आहे नेहा जोशी.”

    “नेहा, मी ऐकले आहे की राजने अजूनही लग्न केलेले नाही आणि तुझ्याशिवाय इतर कोणाचा तो विचारही करू शकत नाही,” वरद म्हणाला.

    “वरद, मला राजला भेटायची तीव्र इच्छा आहे. मला त्याची माफी मागायची आहे. तो जर अविवाहित असेल आणि माझा स्वीकार करायला तयार असेल, तर मी आनंदाने त्याची होईन,” असे म्हणताना नेहाचे डोळे पाणावले.

    “नेहा, तुझ्या नवऱ्याने काही आक्षेप घेतला तर?” वरदने खात्री करून घेण्यासाठी विचारले.

    “वरद, माझे आणि त्याचे आता कसलेही नाते नाही. मी लग्न करायला पूर्णपणे मुक्त आहे.”

    नेहा हे म्हणत असतानाच बँक मॅनेजर आत शिरले.

    “नमस्कार मंडळी, कसे आहात?” असे विचारताना ते रीनाकडे टक लावून पाहत होते.

    “रीना मॅम, मी आत येताना ऐकले की, तुम्ही लग्न करायला मुक्त आहात. मी अविवाहित असून योग्य वधूच्या शोधात आहे. मी कसा वाटतो तुम्हाला? कराल का तुम्ही माझ्याशी लग्न?”

    “मॅनेजर साहेब, माफ करा मला. मी माझ्या मित्राला, म्हणजे राजला, शोधतेय, ज्याच्यावर माझे अतोनात प्रेम आहे. साहेब, त्याचेही अकाऊंट आहे का तुमच्या बँकेत?”

    “तुमच्या मित्राचे पूर्ण नाव काय?”

    “राज मराठे,” नेहाने उत्तर दिले.

    “मी चेक करतो,” म्हणत मॅनेजर साहेब कुणाशी तरी बोलले आणि मोठ्या उत्साहात म्हणाले, “हो, आहे. पण एक सांगू का? त्यांनी बँकेला दिलेल्या माहितीनुसार त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.”

    “मॅनेजर साहेब, राज जसा असेल तसा चालेल मला. मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. तुम्ही त्यांचा नंबर द्या मला, मी लगेच फोन करते त्याला.”

    “मॅम, मी आधी त्यांना विचारतो. कस्टमरला विचारल्याशिवाय आम्ही त्यांची पर्सनल माहिती देऊ शकत नाही.”

    “ठीक आहे, विचारा. पण विचारताना ‘नेहा जोशीला नंबर देऊ का?’ असे विचारा.”

    “ही काय भानगड आहे? ही नेहा जोशी कोण?”

    पुढे येत वरदने रीना हीच नेहा कशी ते मॅनेजर साहेबांना समजावून सांगितले.

    “नेहा मॅम, तुमचा मित्र राज खूप भाग्यवान दिसतो.”

    “मॅनेजर साहेब, भाग्यवान तर मी आहे. मी त्याला फसवून लग्न केले, हे समजूनही त्याने लग्न केले नाही. वेड्यासारखा माझी वाट बघत राहिला.”

    “नेहा मॅम, तुम्ही म्हणाल तर मी त्यांना इथे बोलावू शकतो. पण ते आले तर आपला हा कार्यक्रम डिस्टर्ब होईल.”

    नेहाने तिच्या मित्र-मैत्रिणींना विचारले.

    “मॅनेजर साहेब, योगायोगाने आम्ही सगळे क्लासमेट्स आहोत. वी वाँट राज,” सर्वजण एकसुरात म्हणाले.

    “ठीक आहे, मी त्यांना बोलावतो. पण मी मात्र निघून जातो. तुम्हा मित्र-मैत्रिणींमध्ये मी कशाला हवा? मी आजच्या कार्यक्रमाचे पैसे आधीच भरले आहेत. एन्जॉय, आणि बाय,” असे म्हणत मॅनेजर साहेब निघून गेले.

    सगळेजण राजची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागले.

    राज, आत येताच नेहा म्हणाली, “राज, आय प्रपोज यू.”

    राज मात्र एक शब्दही बोलला नाही.

    “नेहा, रडतेस काय? अगं वेडाबाई…” राजचे ब्लेझर दूर करत आणि ब्लेझरच्या पॉकेटमधील नकली दाढी दाखवत वरद म्हणाला.

    “अगं, तो बँक मॅनेजर हाच आपला राज आहे. आपण इथे जे काही बोललो, ते सगळं राजला ऐकू येत होतं, कारण मी त्याला कॉल लावून मोबाईल खिशात ठेवला होता.”

    “तू या कार्यक्रमाला आलीस ती बँकेच्या गाडीने नव्हे, तर बँक मॅनेजर राजच्या गाडीने.”

    “येताना राज माझ्याबरोबर आला, पण जाताना तो तुझ्याबरोबर असेल,” वरद म्हणाला.

    “आम्ही काही बँकेचे कस्टमर नाही. मी आणि राजने खास तुझ्यासाठी प्लॅन केलेले हे गेट-टुगेदर आहे, आणि हा प्लॅन तुझ्याखेरीज सगळ्यांना माहीत होता.”

    “तुझा अकाऊंट ओपनिंगचा फॉर्म चेक करताना राजने जन्मतारीख पाहिली. त्याचा आणि तुझा वाढदिवस एकाच तारखेला आपण साजरा करायचो, आठवतंय ना? मग त्याने फोटो पाहिला. ही तर नेहाच आहे, पण फॉर्मवर नाव आहे रीना कुलकर्णी… मग त्याने तुला फ्लॅट नंबर विचारला. त्याला आवाज ओळखीचा वाटला. मग त्याने तुझ्या आईचे नाव विचारले. ‘जोशी’ आडनाव ऐकून त्याला खात्री पटली की रीना कुलकर्णी हीच नेहा जोशी. पूर्ण खात्री करून घ्यावी म्हणून त्याने तुझा पत्ता मला दिला. मी मास्क लावून ‘नेहा जोशी’ नावाचा बॉक्स आणला, तो तू स्वीकारलास, आठवतंय ना? आणि त्यानंतर आम्ही ही मीटिंग अ‍ॅरेंज केली! तू नक्की यावीस म्हणून राजची गाडी तुला आणायला पाठवली.”

    “चला, आता मस्त जेवणावर ताव मारूया,” राज आणि नेहा एकसुरात म्हणाले.

    “राज, त्या दिवशी मी नेहाच्या पार्सल बॉक्समध्ये अकरा हजार रुपयांची वस्तू टाकली होती. कधी देणार माझे अकरा हजार रुपये?” वरद हसत म्हणाला.

    राज आणि नेहाने वरदला मिठी मारली आणि ड्रायव्हरला वरदबरोबर पाठवून ते दोघे राजच्या गाडीने गेले; आठ वर्षांची वाट, गैरसमज आणि वेदना मागे टाकत. नियतीनेही अखेर शरणागती पत्करून त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणले होते आणि त्यांच्या प्रेमाचा प्रवास नव्या उमेदीने पुन्हा सुरू झाला होता.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn