सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
परि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधान कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥24॥ कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥25॥ सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥26॥ अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥27॥ म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥28॥ अहो चंद्रकांतु द्रवता करि होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नोहे । श्रोतेनविण ॥29॥ परी आतां आमुतें गोड करावें । ऐसें हें तांदुळीं कासया विनवावें । साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ॥30॥ काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥31॥ तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगें जें निरोपिलें । नारायणें ॥32॥ येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें । अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥33॥
हेही वाचा – Dnyaneshwari : प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो…
अर्थ
तर, आता चंद्रापेक्षाही शांत करणारे आणि अमृताहूनही जीवित वाढविणारे, असे जे आपले लक्ष, त्य़ा लक्षाने माझ्या मनोरथाची वाढ करावी. ॥24॥ कारण की, जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील, पण जर तुम्ही उदास राहाल तर, अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल. ॥25॥ तरी ऐका, की, सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर, वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील ॥26॥ (आणखी दुसरे असे की,) वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल, याची अर्थ वाट पाहात असतो आणि तेथे (त्यावेळी) एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. (बुद्धीमधे अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात). ॥27॥ म्हणून उत्साहाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटाला तर, हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाटतील आणि श्रोता दुश्चित असेल तर, व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. ॥28॥ म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा, तो सुटाला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. ॥29॥ अहो, चंद्रकांतमणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे, (त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलायला लावण्याची हातोटी श्रोत्यांमध्ये आहे.) म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. ॥30॥ परंतु आता ‘आम्हाला गोड करा’ अशी ही तांदळांनी (स्वयंपाक करणाऱ्यास) प्रार्थना कशाकरिता करावयाची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची? ॥30॥ (सूत्रधार) बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवितो काय? (तर नाही, मग) बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवीत असतो. म्हणून ‘अवधान द्या’ अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? ॥31॥ तेव्हा श्रीगुरू निवृत्तिनाथ म्हणाले, ‘अरे, झाले तरी काय? तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले, ते सांग. ॥32॥ यावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. ॥33॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : बाळक बापाचिये ताटीं रिगे, रिगौनि बापातेंच जेवऊं लागे…


