सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय नववा
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसें भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल कीं ॥14॥ बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ॥15॥ तैसा मी जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी तुम्हीं तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥16॥ आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥17॥ अहो तान्हयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥18॥ म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें । ते चेइलें हें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥19॥ एऱ्हवीं चांदिणे पिकविजत आहे चेपणीं । कीं वारया धापत आहे वाहणी । हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ॥20॥ आइकां पाणी वोथिजावे न लगे । नवनीतीं माथुला न रिगे । तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांतें ॥21॥ हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥22॥ परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटींवा करूनि भवादृश्यां । पढियंतया होआवें ॥23॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मग तया सुखाची किरीटी, करूनियां गा पाउटी…
अर्थ
महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर अहात आणि मी दुर्बल मनुष्य भक्तीने पूजा करत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहात आहे तरी, तिचा आपण बेल समजूनच स्वीकार कराल. ॥14॥ लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेवू घालावयास लागते, पण बाप (न रागावता उलट) आनंदाच्या भरात आपले तोंडच त्याच्यापुढे करतो. ॥15॥ त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी, त्यामुळे तुम्ही ‘आनंदीच व्हावे’, असा या प्रेमाचा स्वभाव आहे. ॥16॥ आणि (ज्ञानोबा आमचा आहे अशा) त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात. म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही. ॥17॥ अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर, त्या योगाने तिला जास्तच पान्हा फुटतो. (कारण) आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. ॥18॥ म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले, महाराज, याकरिता अवधान द्या, असे मी बोललो. ॥19॥ वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत (घालून) पिकवितात काय? किंवा वार्याला कोणी गती दिली आहे काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? ॥20॥ ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. ॥21॥ हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता, ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा, ही माझी योग्यता आहे काय? ॥22॥ परंतु असे असूनही ही जी मला (गीतार्थ मराठीत सांगण्याची) तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की, (अशी) धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. ॥23॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो…


