Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो...

Dnyaneshwari : प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो…

अध्याय नववा

तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होइजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥ परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥ कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ॥3॥ तुमचेया दिठिवेयाचिये वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥4॥ प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहों । येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ॥5॥ नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडां विचुकां पाउलीं । तें चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥6॥ तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करित ॥7॥ वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥8॥ अवधारां आवडे तेसणां धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं । अमृताचिया ताटी वोगरूं । ऐसी रससोय कैंची ॥9॥ अहो हिमकरासी विंजणे । कीं नादापुढें आइकवणें । लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥10॥ सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणे ठायीं नाहावें । हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥11॥ तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही ॥12॥ तरि विश्वप्रगटितया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती । कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥13॥

हेही वाचा – Dnyaneshwari : याकारणें पंडुसुता, तुवां होआवें योगयुक्ता…

अर्थ

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,  अहो श्रोते हो, तर तुम्ही एकवेळ (माझ्या बोलण्याकडे) लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. ॥1॥ परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी हे आढ्यतेने बोलत नाही. ‘लक्ष द्यावे’ ही माझी लडिवाळपणाची विनंती आहे. ॥2॥ कारण की, तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर, हट्ट धरणाऱ्यांचे लाड पुरतात आणि मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. ॥3॥ तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळे टवटवीत झाले, त्याची ती सावली पाहून महाराज, तेथे मी भागलेला लोळत आहे. ॥4॥ महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालो, तर आम्ही शांत कोठे व्हावे? ॥5॥ अथवा लेकरु बोबडे बोलत असले, अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले, तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, ॥6॥ त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे, अशी आमची फार इच्छा असल्यामुळे, महाराज, आम्ही सलगी करीत आहोत. ॥7॥ वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे ‘माझ्या बोलण्याकडे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल’, असे बोलण्याची माझी योग्यता काय आहे? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय? (तर नाही, सरस्वतीचा मुलगा स्वभावत:च सर्व जाणतो). ॥8॥ ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी, सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करावे? अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार? ॥9॥ अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नादब्रह्माला गाणे ऐकविणे, किंवा स्वत: अलंकारास दागिन्याने सजवणे, असे कोठे झाले आहे काय? ॥10॥ सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार? ॥11॥ त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की, ‘याला म्हणावे व्याख्यान’ आणि ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल, असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? ॥12॥ असे जरी आहे, तरी जग उजेडात आणणार्‍या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय? ॥13॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : मग तया सुखाची किरीटी, करूनियां गा पाउटी…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!