Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जीव लावणारा संभाजी अन् नवसाची कंदुरी…
    ललित

    जीव लावणारा संभाजी अन् नवसाची कंदुरी…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 29, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, ग्रामीण कथा, गावातील मटण पार्टी, नवसाची पार्टी, नवसाची मटण पार्टी, नवसाची कंदुरी, नवसाची कंदुरी पार्टी, कंदुरी मटण,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राजू पाटील लच्छनकर

    मानवी जीवन सुख, दुःख, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांनी भरलेलं आहे. जीवन जगत असताना बरेचशा इच्छा मनात राहतात, कधी त्या पूर्ण होतात तर, कधी नाही! फार कमी लोक असतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून जाते.

    आमच्या भागात अशीच एक परंपरा आहे… तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली की, एक-दोन बकऱ्याची, पाच बकऱ्यांची, 11 बकऱ्यांची, 21 बकऱ्यांची दावत दिली जाते आणि त्या दावतला जेव्हा अन्य एखादा नवस करतो किंवा नवस बोलतो तो नवस फक्त त्यालाच माहीत राहावा लागतो आणि ज्या दिवशी मग ती नवसाची कंदुरी (मटण) होते, त्या दिवशी तो त्या नवसाच्या कंदुरीचे कारण सगळ्यांना सांगतो. अशा प्रकारे साधारण कंदुरी होतच असतात, पण नवसाच्या कंदुरीच काही वेगळेपण आणि एक विशेष असं स्थान आमच्या भागातील समाजात आहे.

    यावर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे खरीप काही झालंच नाही. रब्बी आता तरी चांगली वाटू लागली होती. सहज शेत शिवारात फिरत होतो आणि माझी माणसं माझ्यासोबत होती. परतीचा प्रवास सुरू झाला तशी चर्चा सुरू झाली… पीक पाण्याचे चर्चा संपली आणि मग बघता बघता माझ्या माणसांपैकी एक असलेला संभाजी म्हणाला, झालं आता रान मोकळी झाली की, कंदुरी दावती चालू होतात. तशी माझी माणसं म्हणाले, खरी दावत तर तुझी. काय कंदुरी झाली होती, तसा संभाजी खूश झाला, मी म्हणालो माणसाच्या मनाची इच्छा पूर्ण व्हायला ईश्वराच्या मनात यावं लागतं! नेमकं तुझे तसं झालं बघ… तुला वाटलं तसं झालं आणि नवसाची कंदुरी तुझ्या हातून घडली.

    हेही वाचा – नजर नजर की बात हैं!

    परतीची वाट कधी संपली कळलं सुद्धा नाही आणि मी आता ठिकाणावर आलो होतो. सूर्य मावळतीकडे गेला होता आणि जनावराचे दूध काढायचं आणि संध्याकाळची काही काम करायची होती म्हणून माणसेही पांगली. मी एकटाच माझ्या ठिकाणावर थांबलो आणि मग मी माझ्या तंद्रीत त्या जुन्या आठवणीत गेलो

    पंधरा ते वीस वर्षे झाली असतील… त्यावेळेस मी नवीन नवीन शेती करत होतो, माझ्या गावात उन्हाळ्यात पत्त्याचा डाव चालतो. सकाळी संध्याकाळी शेतात काम करायचं आणि दुपारी मग गावातल्या म्हैशाहीच्या लवणीच्या कडेला असलेल्या महावृक्षाच्या चिंच आणि लिंबाच्या सावलीला बरीचशी मंडळी पत्ते खेळायची. नाही म्हणलं तरी, मला पत्ते खेळण्याची आवड निर्माण झाली आणि मी इथला परमनंट मेंबरही झालो. ऊन डोक्यावर असायचं प्रचंड उकाडा आणि मग तो पत्त्याचा डाव पण बाजूला बसलेला एक माणूस हळूच कवळी आणि ताजी काकडी कापायचा… त्याच्यावर मीठ टाकून द्यायचा काकडी खाल्ले की बरं वाटायचं! त्या मोबदल्यात त्याला काही ना काही पैसे मिळायचे. बघता बघता डालभर असलेली काकडी संपून जायची.

    तो काकडी विकणारा हळूहळू माझा मित्र झाला त्याचं नाव संभाजी. मी शेतशिवारात मुक्कामी राहिलो की, तो आवर्जून अधुनमधून माझ्याकडे येऊन बसायचा. त्याच्याकडे बघितले की, मला त्याचं फार आश्चर्य वाटायचं दिवसभर काही ना काही कामात असायचा… दुपारी काकडी विकायचा, सकाळी भाजीपाला, संध्याकाळी दूध विकायचा. दोन बकऱ्या ठेवल्या होत्या. पण त्या बकऱ्यांची पिल्ले होती, त्या पिल्लांना चारा द्यायचा. मी म्हणायचो, ‘काय संभाजी, काय ही मरमर तुझी!’ तसा तो मला म्हणायचा, ‘काही नाही हो, महिन्याला लेकराला पैसे बांधावे लागतात. लेकरू शिकायला बाहेर ठेवलो…’

    मी बाजेवर निवांत पडलेला असायचा, तसा रात्रीच्या वेळी संभाजी निवांत यायचा आणि खांद्यावरचं उपरण डोक्याखाली घेत निवांत जमिनीवर पडायचा. दोन्ही पाय आणि दोन्ही हात लांब करत म्हणायचा, ‘दिवसभर लय मरमर झाली काही करून आज ‘नाय्टी’ पाहिजे.’ मी प्रेमानं ‘नाय्टी’ त्याला पाजवायचोही! तसा तो मला म्हणायचा, ‘काळजी करू नका, कधी ना कधी साऱ्या गोष्टीचं मी परतफेड करीन… पण मला एक सांगा लेकरू जर शिकलं आणि नोकरीला लागलं तर, एका औताला (पीक) मागे पडतं तितकी कमाई त्याला होईल का?’

    मी म्हणालो, ‘शिक्षण म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. लेकरू जर शिकलं तर, एका औताची काय दहा औताची कमाई करंल.’ संभाजी म्हणाला, ‘मनात एक नवसाची कंदुरी करायची आहे. त्या कंदुरीला तुम्हाला सांगतो की, मी.’

    कुठे कंदुरीला जेवायला गेलो का, कोणाच्या आमंत्रणाला आम्ही गेलो की, संभाजी सोबत राहायचा आणि वापस येताना आवर्जून म्हणायचा, ‘हे काय कंदुरी? कंदुरी करतो तर मी, बघाच.’ मी म्हणायचो, ‘कंदुरी करणार आहेस त्याचं कारण काय?’ तसा तो म्हणायचा, ‘नवसाची कंदुरी हाय, नवस पुरा झाल्याशिवाय  सांगता येणार नाही.’

    त्या दिवशी मी असाच निवांत शिवारात बाजेवर आडवा पडलो होतो, तसा संभाजी आला आणि थोडा नशेतच होता. किती करून फाटक्या संसाराला आता पुरत नव्हतं लेकराच्या शिक्षणासाठी आता पैसा पुरत नव्हता. त्याचा ताण कुठेतरी त्याच्या मनावर मला जाणू लागला होता. मी म्हणालो, ‘काय झाल? या महिन्याची झाली का तडजोड?’

    ‘अजून काही झाली नाही, पण काही ना काही करून करतो. आखरीला दोन शेळ्याची पिल्ले आहेत… ते काही नाही, करतो तडजोड… लेकरू जरा अभ्यासात, शिक्षणात हुशार आहे. एवढी एकच आशा आहे,’ तो म्हणाला.

    मी म्हणालो, ‘ही जिद्द तरी कुठून आणलीस बाबा?’

    तसा तो म्हणाला ‘हे काहीच नाही. या जगात असे कोणते व्यसन नाही, ते मी केलं नाही. सारे आगाऊ धंदे केले आणि दारू तर इतकी प्यायलो, इतकी प्यायलो की, दारूच्या नशेमध्ये लेकरं मोठं कसे झाले कळलं सुद्धा नाही. एके दिवशी असंच जास्त दारू झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध आणि बेबंद अवस्थेत पडलो होतो आणि माझ लेकरू मला हालवून उठवण्याचा प्रयत्न करत होतं. पण मी काही उठत नव्हतो, तेवढ्या दुसरी दोन माणसं आली, माझ्या तोंडावर पाणी मारलं आणि मला उठवलं. ते माझ्या मुलाचे शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं, लेकरू शिकायला हुशार आहे. बघ, त्याला जर शिकवलंस तर तुझं भलं होईल आणि त्याच्या जन्माचं सार्थक होईल… असं म्हणाले आणि तिथून निघून गेले. त्या नशेमध्ये मला त्या गोष्टीचं काय अर्थ कळला नाही, पण माझ्या डोळ्यातली झोप उडाली होती, मी बेचैन झालो होतो… बघता बघता आयुष्यात मी काय गमावलं याची मला जाणीव होऊ लागली होती… माझ्या बालपणीच्या त्या आठवणीत रममाण होऊ लागलो होतो… तरुणपणात मी एक पैलवान होतो, ती ताकद आता माझ्यात राहिली नव्हती दारूच्या व्यसनापाई मी आता संपलो होतो… पण या गोष्टीचा आता मला पश्चाताप होऊ लागला, वेदना होऊ लागल्या आणि मी व्याकुळ होऊ लागलो… दोन दिवस दोन रात्र असेच गेले, अन्न नाही, आंघोळ नाही असाच वेड्यापिशासारखा फिरलो आणि मग ठरवलं काही झालं तरी, लेकराला शिकवायचं सरळ मास्तरांना जाऊन भेटलो… त्या शाळेत तसेच हॉस्टेलवर शरीक करून निघून आलो. त्यादिवसापासून आजपर्यंत काही करून त्याला शिकवायचं. त्याच्या शिक्षणासाठीच जगायचं… ठरवून टाकलं!’

    संभाजीचे बोलणं माझ्या हृदयाला भिडत होतं, डोळे पाणावले होते. त्याचा निश्चय, त्याचे कष्ट मी बघत होतो आणि त्याच्या कंदुरीचा नवस काय आहे, हे आता मला कळून चुकलं होतं. तो बोलत बोलत तसाच निवांत उश्याखाली उपरण घेऊन माझ्या ठिकाण्यावर झोपी गेला आणि मी मात्र तसाच जागा राहिलो आणि मनोमन परमेश्वराची प्रार्थना करू लागलो, या गरीब माणसाची इच्छा पूर्ण कर. काय होणार ते माहीत नव्हतं, फक्त मनात एक आशा घेऊन तसाच निवांत पडून राहिलो.

    दिवसा मागून दिवस गेले तसेच संभाजी संघर्ष करीत राहिला आणि त्याच्या मुलाला शिक्षणात यश मिळत गेल. एके दिवशी असाच निवांतपणे शेतशिवारात होतो, तसा संभाजी आनंदाने आणि एक वेगळ्या वेग आणि अवेगात माझ्याकडे आला आणि माझ्या मुलाला नोकरी लागली, हे सांगू लागला. कोणती नोकरी, काय शिक्षण, काय पॅकेज हे काही त्याला माहीत नव्हतं. फक्त मुलाला नोकरी लागली, याच आनंदात तो होता त्याच्या मुलाचा नंबर घेतला विचारलं, तेव्हा मला आश्चर्याचा अन् आनंदाचा धक्का बसला… तो आता आयटी इंजिनियर झाला होता आणि त्याच सिलेक्शन अमेरिकेत एका कंपनीत झालं होतं! त्याला आता एका वर्षासाठी अमेरिकेत जायचं होतं.

    संभाजी मला म्हणाला, एक वर्षभर दुसऱ्या देशात त्याला जावं लागणार आहे आणि परत आला की, मग करतो त्याचं लग्न आणखी कंदुरीही!

    दिवसामागून दिवस गेले कंदुरीची तयारी संभाजी करू लागला, अंगात एक नवचैतन्य होतं. जीवनात आलेल्या प्रत्येकाला, मग ज्यांनी कोणी साथ दिली असेल किंवा कोणी विरोध केला असेल, त्या सर्वांनाच तो त्या कंदरीसाठी बोलावू लागला. सर्व मित्र, पाहुणे… सर्वांनाच तो आवर्जून आग्रह करून सांगू लागला… मला तर त्यांन अनेकदा सांगितलं, मी कंटाळून म्हणालो, अरे येतो की, इतकी काय काळजी करतोस. तसा तो म्हणाला, सगळं जग जमंल अन् आपलंच माणूस राहून जाईल, म्हणून काळजी करतो.

    हेही वाचा – नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे

    ठरल्याप्रमाणे कंदुरीचा दिवस उजाडला. तीनपारच्या वेळेला आम्ही कंदुरीकडे गेलो संभाजी सर्व मित्रमंडळ सर्वजण गोळा झाले होते, जेवणारी माणसं जेवत होती, मस्त मटणाचं जेवण होतं. मी संभाजीला शोधू लागलो, पण मला संभाजी कसा भेटेल त्याचे ते रूप ते मळकट धोतर तितकाच फाटलेला सदरा अन् कष्टानं घामानं मळलेलं उपरणं मी शोधू लागलो… पण काळ बदलला होता. आता संभाजी नवीन रूपात होता, त्याच्या नवीन रूपात मी त्याला ओळखलं नाही. त्यांनंच मला ओळखलं! जवळची मंडळी मला जेवणाचा आग्रह करू लागली, तसा संभाजी म्हणाला, ‘नाही, नाही झाडाखाली आम्ही थोडं बोलत बसतो आणि नंतर मग जेवतो.’

    मला काही कळलं नाही झाडाखाली सगळी व्यवस्था संभाजीने केली होती. महागाची विदेशी दारू त्यांनं मागवून ठेवली होती. ती विदेशी दारू तो मला आनंदाने देत होता, काही घोट घेतले… पोटभर त्या स्वादिष्ट मटणाचा आनंद घेतला आणि माझ्या माणसांसोबत माझ्या शेतशिवारातील ठिकाणाकडे निघालो आणि निवांतपणे बाजेवर पडून राहिलो.

    माझी माणसंही माझ्यासोबत होती, पण आता अंधार पडल्यामुळे घराकडे जायचे चुळबूळ चालू होती, तशी ती हळूहळू एक एक करून काही निघून गेली. मी बाजेवर तसाच निवांत पडून राहिलो आणि अनामिकपणे कोणाची तरी वाट बघत राहीलो. माझी काही माणसेही माझ्यासोबत तशीच होती…

    बराच वेळ झाला होता, अंधारातून एक आकृती माझ्याकडे येत होती… मनात सहज येऊन गेलं, हा संभाजी तर नसेल ना? पण एक मन म्हणालं, इतकं सारं गणगोत, इतकं सारं ऐश्वर्य, इतके सारे मित्रमंडळी सोडून तो कशाला येईल! पण थोड्या वेळात या अकृतीन पूर्ण रूप घेतलं तो संभाजी होता.

    नेहमीप्रमाणे मी बाजेवर निवांत होतो, काही माणसं माझ्या बाजूला होती. जमिनीवर खांद्यावरच उपरणं अंथरत संभाजी तसाच जमिनीवर पडला. दोन्ही हात दोन्ही पाय लांब करत म्हणाला, ‘दिवसभर खूप थकलो आता मला तुमच्याकडून नाय्टी पाहिजे.’

    संभाजीला आज नाय्टीची गरज नव्हती, तो खूप श्रीमंत झाला होता… त्याला माझी गरज राहिली नव्हती… पण त्याच्या मनाचा मोठेपणा म्हणून त्या जुन्या रूढीप्रमाणे तो वागत होता! सर्व यश, सर्व संपत्ती याही पलीकडे जाऊन आपलेपणा तो जपत होता… मी आपल्या जुन्याच पद्धतीने त्याला सांगितलं, जा मधे आणि एक बॉटल घेऊन ये. तिथे जमलेल्या माझ्या माणसांनी थोडीफार नशा केली आणि सहजपणे आनंदाने त्या मोकळ्या आकाशात आणि धरणी मातीच्या कुशीत झोपी गेले.

    मी मात्र बाजेवर तसाच जागी राहिलो… मनात अनंत विचार होते… आकाशात पडलेल्या चांदण्याकडे बघत म्हणालो,  

    ‘या शेतशिवाराच्या अडचणी, ही कोर्ट केसेस, अवकाळी पावसाने होणारे पिकाचे नुकसान, शेतीविरोधी सरकारी धोरणं आणि मग होणारं प्रचंड आर्थिक नुकसान… कधी कधी मन वैतागून जातं, पण मी माझ्या शेतशिवाराकडे आलो नसतो तर, अशी जीवापाड प्रेम करणारी अन् काहीच गरज नसतानाही मान ठेवणारी सोन्यासारखी माणसं मला भेटली नसती, याचाच आनंद…!

    मी एक आनंदयात्री…


    मोबाइल –  6304873724

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn