Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितदमलेल्या नवऱ्याची कहाणी...

दमलेल्या नवऱ्याची कहाणी…

पराग गोडबोले

कधीकधी असं होतं ना की, तुमची सगळी मनोरथं एका क्षणात धुळीला मिळतात… पाहिलेल्या गोडगोड स्वप्नांचा अगदी पार चुराडा  होऊन जातो… माझंही मागे एकदा असंच झालं. छानपैकी कांदे नवमी होती. आदल्याच दिवशी बायकोनं बजावून सांगितलं होतं, ‘उद्या संध्याकाळी वेळेत घरी ये, कांदे नवमी आहे. कांद्याची भजी, मुगाच्या डाळीची खिचडी, कढी आणि पोह्याचा पापड असा साधासा बेत करणार आहे.’ मी तिला म्हटलं सुद्धा, ‘हा साधासा बेत? अगं, अंबानींच्या लग्नाची मेजवानी आणि तुझा हा साधासा बेत, यात निवड करायची झाली तर, डोळे मिटून मी तुझ्या या बेताची निवड करेन. नक्की वेळेवर घरी येईन, तू तयारी करून ठेव.’

दुसऱ्या दिवशी या आनंदातच मी तिला म्हणालो, ‘आज डबा नाही दिलास तरी चालेल, मी खाईन बाहेर…’ मनभर हसत, संध्याकाळच्या मेजवानीचे मांडे खात तिचा निरोप घेऊन निघालो. ऑफिसला पोहोचताच सोमवारची लगीनघाई सुरू झाली. गणितं, कोष्टकं, आठवड्याची जुळवाजुळव यात दिवस कसा कापरासारखा उडून गेला, हे कळलं सुद्धा नाही. सहा वाजता फोन वाजला. बायकोच्या फोनला वेगळी रिंगटोन आहे, त्यामुळे न बघताही फोन कोणाचा हे कळतं. मी नाही घेतला फोन, पण घड्याळात बघितलं तर सहा वाजत आले होते…

आदल्या दिवशीचं बोलणं आठवलं आणि मनात म्हटलं, ‘चला आवराआवरी करून तिला फोन करूया.’ लॅपटॉप बंद केला, थोडा आळसावलो आणि एक चहा मागवला. म्हटलं, ‘निघता निघता चार घोट घेतले की, बरं वाटेल.’ चहा संपवतच होतो आणि तेवढ्यात फोन वाजला. साहेबांचा फोन… घ्यावाच लागतोय, टाळून नाही चालत. म्हणाले, ‘जरा या, काम आहे.’

हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!

चरफडत निघालो. तीन-चार जण आधीच येऊन बसले होते. येऊ घातलेल्या संकटाची नांदी होती. महत्त्वाचं काम आलं होतं आणि आजच्या आज पूर्ण करणं भाग होतं. ढोबळ अंदाजाप्रमाणे तीन तासांची निश्चिती होती. सगळ्यांना कामाला लावून, ‘मला रिपोर्ट द्या,’ असं सांगून ते निघाले. सात वाजत आले होते. आता बायकोचा चेहरा समोर यायला लागला. थरथरत्या हातांनी फोन केला…

‘कुठपर्यंत आलास?’

आता काय सांगणार? मी म्हणालो, ‘थोडा उशीर होईल.’

‘थोडा म्हणजे?’

मी आवंढा गिळला, ‘दहा तरी वाजतील!’ तिचा सुस्कारा स्पष्ट ऐकू आला मला. ‘आपण काही ठरवलं की, काहीतरी विघ्न येणारच, नेहमीचं आहे तुझं… वगैरे नेहमीचंच बोलून तिने फोन ठेवला.’ मला अगदी कसंतरीच झालं.

मी कामाकडे वळलो आणि लक्षात आलं, हे निपटणं कठीण आहे. आठ वाजले, नऊ वाजले. आता रात्रीचं जेवण पण मागवण्याची वेळ आली. भजी, खिचडी आणि कढी फेर धरू लागली. नकळतच सलील कुलकर्णीची ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकू येऊ लागली. खाल-मानेनं तास तास निघून चालला होता. काम आटपत नव्हतं. एकदा तिला मेसेज केला, पण काही उत्तर नाही आलं. घड्याळात तास आणि मिनिट काटा बारावर पोहोचले. काम थोडं आवाक्यात आलं, असं वाटत होतं. थोडे पाय मोकळे करून, मशिनची कॉफी घेऊन परत बसलो. सिगरेट ओढणाऱ्यांनी आत्तापर्यंत आठ-दहाचा कांड्यांचा धूर काढून घेतला होता.

शेवटी, पहाटे साधारण चारच्या सुमारास काम आवरलं. थोडं हायसं वाटलं. सगळं परत एकदा तपासून घेईपर्यंत कोंबडे आरवायला लागून तांबडं फुटायला लागलं होतं. दहाव्या मजल्यावरून कोवळा सूर्योदय पाहायचं भाग्य आज नशिबात होतं. साडेसहा वाजता कामाचं दुकान बंद करून फोन घेतला हातात…

हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!

ती ऑनलाइन होती. ‘सुप्रभात’चा मेसेज टाकला. दोन निळ्या खुणा दिसल्या आणि फोन वाजलाच. आता स्वरात काळजी होती तिच्या. रात्रीचा रागाचा लाल रंग निवळून थोडा गुलाबी होताना दिसत होता. रात्री काय जेवलास वगैरे चौकशी केली आणि ‘काम झालं असेल तर निघ, दगदग करून घेऊ नकोस. कॅब करून आरामात ये,’ म्हणाली. रात्रीच्या जगदंबेनं आता मायाळू शारदेचं प्रेमळ रूप धारण केलं होतं. फरक जाणवत होता अगदी!

निघालो आणि तसा मेसेज केला.

‘आल्यावर खाऊन झोप, छान थालीपीठ करते…’ उत्तर आलं.

कंठ दाटला माझा. कॅबमध्ये थोडी डुलकी काढली आणि तासाभरात घरी पोहोचलो. ‘आंघोळ करून घे, तोवर थालीपीठ होतंय,’ ती म्हणाली. मी आंघोळ करून येईपर्यंत थालीपीठाचा सुवास दरवळत होता. एकीकडे चहा उकळत होता. रात्रभराचा शीण आणि थकवा नाहीसा झाल्याचा भास होत होता. मी खाऊन घेतलं.

‘आता आत निवांत झोप, मोलकरणीला आज फक्त भांडी घासून जायला सांगेन म्हणजे नीट झोप होईल.’

मी चिमटा काढून बघितला एकदा, पण स्वप्न नव्हतं सत्य होतं! खाऊन झोपलो तो थेट एक वाजता उठलो.

‘कालची तुझी हुकलेली भजी तळून देते…’

 मी अगदी कडेलोटाच्या टोकावर होतो. पण घडत होतं ते खरंच होतं. कालचा त्रास आणि थकवा या मायेमुळे आता अगदी पार पळून चालला होता. खरोखर, बायकोची ही खासियत आणि तिचा हा समजूतदारपणा मनाला स्पर्श करून गेला माझ्या. बायकांच्या या अशा स्वभावामुळेच बहुसंख्य संसार टिकतात आणि बहरतात, हे माझं स्पष्ट मत आहे. स्वतःचा  हिरमोड होऊन सुद्धा नवऱ्याला होणारा त्रास समजून घेऊन त्याप्रमाणे बदलणाऱ्या लवचिक स्वभावाच्या या स्त्रियांना माझा मनोमन प्रणाम!

वटपौर्णिमेच्या धर्तीवर, हीच आणि अशीच बायको प्रत्येक जन्मात लाभावी असं काही व्रत शास्त्रात असेल तर, मी ते लगेच करायला तयार आहे… अगदी मनापासून…


मोबाइल – 9323277620

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!